मलिकांच्या समर्थनार्थ मंत्रालयाबाहेर सत्ताधारी ‘मविआ’चे आंदोलन सुरू; आदित्य-राऊत यूपीमध्ये…!

| Updated on: Feb 24, 2022 | 11:48 AM

मंत्री नवाब मलिक यांच्या अटकेच्या निषेधार्थ उद्यापासून महाविकास आघाडीतील नेते आणि कार्यकर्ते राज्यभर आंदोलन करतील, असा इशारा आज आंदोलनस्थळी आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांनी दिला आहे.

मलिकांच्या समर्थनार्थ मंत्रालयाबाहेर सत्ताधारी मविआचे आंदोलन सुरू; आदित्य-राऊत यूपीमध्ये...!
मलिकांच्या समर्थनार्थ मंत्रालयाबाहेर महाविकास आघाडीचे आंदोलन सुरू झाले आहे.
Follow us on

मुंबईः महाविकास आघाडीचे कॅबिनेट मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांच्या समर्थनार्थ गुरुवारी सकाळी मंत्रालयाबाहेर सत्ताधारी पक्षांनी आंदोलन सुरू केले आहे. सध्या आंदोलन स्थळी राष्ट्रवादी काँग्रेसकडून उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री छगन भुजबळ, जयंत पाटील, धनंजय मुंडे, सप्रिया सुळे आदी नेते दाखल झाले आहेत. शिवसेनेचे सुभाष देसाईही आंदोलन स्थळी आहेत. मात्र, दुसरीकडे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि संजय राऊत हे यूपी (UP) दौऱ्यावर गेल्यामुळे या आंदोलनात सहभागी नसल्याचे समजते. यापूर्वी विविध आरोपांमुळे शिवसेनेच्या संजय राठोड यांचा राजीनामा घेण्यात आला. आता अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचा आरोप असूनही मलिकांचा राजीनामा का नाही, असा सवाल विरोधकांनी केलाय.

उद्यापासून राज्यभर आंदोलन

मंत्री नवाब मलिक यांच्या अटकेच्या निषेधार्थ उद्यापासून महाविकास आघाडीतील नेते आणि कार्यकर्ते राज्यभर आंदोलन करतील, असा इशारा आज आंदोलनस्थळी आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांनी दिला आहे. मंत्री जयंत पाटील म्हणाले की, ज्या ठिकणी केंद्राला विरोध केला जातो तिथे अशी परिस्थिती आहे. नवाब मलिकांवर केलेले आरोप चुकीच आहेत. जागा खरेदी केली म्हणून त्यांना आत टाकणे हे अत्यंत चुकीचे आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. त्यामुळे मी काहीही बोलणार नाही. नवाब मलिक यावर सविस्तर उत्तर देतील. त्यांचा राजीनामा घेण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचेही ते म्हणाले.

बॉम्बस्फोटाशी संबंध नाही

नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची शक्यता मंत्री छगन भुजबळ यांनीही फेटाळून लावली. ते म्हणाले की, कोणत्याही मंत्र्याचे नाव दाऊदसोबत जोडले की त्याची बदनामी करायला सुरुवात करतात. नवाब मलिक मुस्लीम. त्यामुळे त्यांची बदनामी करणे सोपे होते. नवाब मलिकांनी काहीही चुकीचे केलेले नाही. भाजप अनेक नेत्यांना धमकावत आहे. दाऊदचे संबंध मुद्दाम मलिकांसोबत जोडले जात आहेत. त्यांचा बॉम्बस्फोटाशी अजिबात संबंध नाही, असा दावाही त्यांनी केला.

बहीण ईडी कार्यालयत

दरम्यान, दुसरीकडे अटकेत असलेले मंत्री नवाब मलिक यांची भेट घेण्यासाठी त्यांची बहीण सईदा या ईडी कार्यालयात दाखल झाल्यात. यावेळी डॉ. सईदा खान म्हणाल्या की, माझ्या भावावर सरकार सूडबुद्धीने कारवाई करत आहे. कुठलीही प्रक्रिया पूर्ण न करता त्यांना ताब्यात घेतले होते. नवाब मलिक हे लढवय्ये आहेत. सत्य परेशान हो सकता, है लेकिन पराजित नही. न्यायालयाकडून आपल्याला न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे. काही झाले तरी देखील आम्ही लढा देऊ. हटणार नाही, हरणार नाही. चार महिन्यांपासून सगळ्यांना ठाऊक होते की, घरी ईडी येणार आहे. आम्ही लढा सुरू ठेवू, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

इतर बातम्याः

Birth Anniversary | पोरकी लेक, प्रसिद्ध अभिनेत्री, 5 वेळा मुख्यमंत्री; जयललितांचा रोमहर्षक प्रवास…!

महापालिकेत घराणेशाहीचा झेंडा; नाशिकमध्ये नेत्यांच्या एका-एका घरातून तिघा-तिघांना हवे तिकीट!

नाशिकमध्ये 7 नगरपरिषदांच्या निवडणुका; प्रभाग रचना 5 एप्रिलला होणार प्रसिद्ध, कसा आहे कार्यक्रम?