
नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यातून एक अत्यंत मोठी बातमी समोर आली आहे. गडचिरोली जिल्ह्यातील तब्बल ६१ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी टीव्ही ९ मराठीला दिली आहे. विशेष म्हणजे, या आत्मसमर्पण करणाऱ्यांमध्ये नक्षलवादी चळवळीतील एक महत्त्वाचे आणि केंद्रीय समितीचे मोठे सदस्य सोनू ऊर्फ भुपती यांचा समावेश आहे. यामुळे नक्षलवादी चळवळ कमालीची खिळखिळी झाल्याचे बोलले जात आहे.
गेल्या काही वर्षात गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलवाद्यांचे हे सर्वात मोठे आणि महत्त्वपूर्ण आत्मसमर्पण ठरले आहे. या आत्मसमर्पण केलेल्या ६१ नक्षलवाद्यांमध्ये गडचिरोली जिल्ह्यातील जवळपास सर्वच मोठ्या नक्षलवादी कॅडरचा समावेश आहे. यामुळे या भागातील नक्षलवादी कारवायांना आणि त्यांच्या मनुष्यबळाला मोठा धक्का बसला आहे.
भूपती हा माजी महासचिव बसवराजू यांच्या मृत्यूनंतर तो पक्षाच्या सर्वोच्च पदाचा एक संभाव्य दावेदार मानला जात होता. त्याचा धाकटा बंधू किशनजी (मल्लोजुला कोटेश्वर राव) २०११ मध्ये कोलकात्याजवळ झालेल्या चकमकीत मारला गेला होता. भुपतीची पत्नी तारक्का हिने गेल्या वर्षीच गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले होते. ती सध्या पोलीस पुनर्वसन शिबिरात राहत आहेत. काही दिवसांपूर्वीच भुपतीने केंद्र सरकारला शांतता वार्ताच्या चर्चेसाठी तसेच तात्पुरत्या शस्त्रसंधीसाठी पत्र लिहिले होते.
दरम्यान सध्या आत्मसमर्पण केलेल्या या सर्व माओवाद्यांवर कोणकोणत्या पोलीस स्टेशनमध्ये किती गुन्हे दाखल आहेत आणि प्रत्येकावर किती बक्षीस आहे, याची सखोल माहिती गडचिरोली पोलीस विभाग पोलीस अधीक्षक कार्यालयातर्फे घेत आहे.