Dhananjay Mahadik | राष्ट्रवादीला धक्के सुरुच, धनंजय महाडिक तिसऱ्या पक्षात प्रवेश करणार?

राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) हे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. इतकंच नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत ते  (Dhananjay Mahadik) 31 ऑगस्टला भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

Dhananjay Mahadik | राष्ट्रवादीला धक्के सुरुच, धनंजय महाडिक तिसऱ्या पक्षात प्रवेश करणार?

कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) हे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. इतकंच नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत ते  (Dhananjay Mahadik) 31 ऑगस्टला भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं सांगण्यात येत आहे. मोदी 31 ऑगस्टला सोलापूर दौऱ्यावर येत आहेत. त्यावेळी हा पक्षप्रवेश होण्याची शक्यता आहे. धनंजय महाडिक हे आधी शिवसेनेत होते, मग त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. राष्ट्रवादीकडून ते खासदार झाले. मात्र यंदाच्या पराभवानंतर ते आता भाजप प्रवेशाच्या तयारीत आहेत. भाजपमध्ये प्रवेश केला तर तो त्यांचा तिसरा पक्ष असेल.

संसदरत्न अशी ख्याती मिळवलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या धनंजय महाडिक यांचा कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात दारुण पराभव झाला. शिवसेनेच्या संजय मंडलिक यांनी त्यांच्यावर जवळपास 2 लाख मतांनी विजय मिळवला.  लोकसभा निकालाच्या पाचच दिवसानंतर महाडिक मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी वर्षा बंगल्यावर गेले होते. त्याचवेळी त्यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा सुरु होती.

चंद्रकांत पाटलांशी मैत्रीचे संबंध

धनंजय महाडिक आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे मैत्रीचे संबंध आहेत. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावेळीही चंद्रकांत पाटलांनी अनेकवेळा या मैत्रीबद्दल जाहीर भाष्य केलं होतं. त्यावेळी चंद्रकांत पाटलांच्या जाहीर वक्तव्यामुळे ते महाडिकांना मदत करतात की काय असाही प्रश्न उपस्थित झाला होता. मात्र त्या निवडणुकीत धनंजय महाडिक यांचा पराभव झाला.

धनंजय महाडिक यांच्या एका घरात 3 पक्ष

धनंजय महाडिक यांच्या एकाच कुटुंबात तीन-तीन पक्ष असल्याचं यापूर्वीच राज्याने पाहिलं आहे. त्यांचे काका महादेवराव महाडिक हे काँग्रेसचे विधानपरिषदेचे आमदार होते. मात्र त्यांनी काँग्रेस आमदार सतेज पाटील यांच्याविरोधात काम केल्याने त्यांच्यावर काँग्रेसने कारवाई केली. काका काँग्रेसचे, तर धनंजय महाडिक स्वत: राष्ट्रवादी खासदार होते. त्यांचा चुलत भाऊ अमल महाडिक हे भाजपचे विद्यमान आमदार आहेत. त्यामुळे महाडिक कुटुंबात एकाच घरात तीन तीन पक्ष एकेकाळी पाहायला मिळाले.

तर धनंजय महाडिक तिसऱ्या पक्षात

धनंजय महाडिक हे सध्या राष्ट्रवादीत असले तरी तो त्यांचा मूळ पक्ष नाही. धनंजय महाडिक यांनी यापूर्वी शिवसेनेकडून कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लढवली होती. 2004 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा विद्यमान खासदार संजय मंडलिक यांचे वडील सदाशिवराव मंडलिक यांनी पराभव केला होता. त्यावेळी सदाशिवराव मंडलिक हे राष्ट्रवादीकडून तर धनंजय महाडिक हे शिवसेनेकडून मैदानात होते.

काही वर्षानंतर सदाशिवराव मंडलिक आणि शरद पवार यांच्यात बिनसले. त्यामुळे मंडलिकांनी राष्ट्रवादी सोडली. त्यामुळे धनंजय महाडिक यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करत, कोल्हापूरच्या जागेवर दावा सांगितला. मात्र 2009 मध्ये त्यांच्याऐवजी राष्ट्रवादीने छत्रपती संभाजीराजेंना तिकीट दिलं.  त्यावेळी संभाजीराजेंचाही पराभव झाला. यानंतर राष्ट्रवादीने 2014 मध्ये  धनंजय महाडिक यांना तिकीट दिलं आणि ते पहिल्यांदा लोकसभेवर निवडून गेले.

धनंजय महाडिक यांनी जर भाजपमध्ये प्रवेश केला तर आता त्यांचा तो तिसरा पक्ष ठरेल. शिवसेना, राष्ट्रवादी आणि आता भाजप असा प्रवास धनंजय महाडिक हे करतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

संबंधित बातम्या 

राष्ट्रवादीला झटका बसण्याची चिन्हं, धनंजय महाडिक-मुख्यमंत्र्यांची भेट   

मदत नाही तर नाही, विरोध तर करु नका, धनंजय महाडिक हतबल 

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *