माझं आणि जरांगेचं काहीही वैर नाही, उलट मी मराठ्यांसाठी… धनंजय मुंडे स्पष्टच बोलले

मनोज जरांगे-पाटील यांनी धनंजय मुंडे यांच्यावर हत्येचा कट रचल्याचा आणि अडीच कोटींची सुपारी दिल्याचा गंभीर आरोप केला. यानंतर मुंडेंनी पत्रकार परिषद घेऊन आरोप फेटाळले.

माझं आणि जरांगेचं काहीही वैर नाही, उलट मी मराठ्यांसाठी... धनंजय मुंडे स्पष्टच बोलले
| Updated on: Nov 07, 2025 | 3:58 PM

मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते  धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. मनोज जरांगे यांनी धनंजय मुंडे यांनीच आपल्या हत्येचा कट रचल्याचा आणि त्यासाठी अडीच कोटी रुपयांची सुपारी दिल्याचा थेट आणि गंभीर आरोप केला आहे. यावरुन सध्या राज्यातील राजकारण तापले आहे. त्यावर आता धनंजय मुंडे यांनी भाष्य केले आहे.

धनंजय मुंडे यांनी नुकतंच पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी माझं आणि जरांगेचं काहीही वैर नाही. मनोज जरांगेंच्या विरोधात मी एक शब्दही बोललेलो नाही. एक आरोपही केलेला नाही. मी मराठा आंदोलनाला मदत केली आहे, असे स्पष्टीकरण दिले.

प्रत्येक आंदोलनात मी सहभागी

गेली ३० वर्ष मी समाजकारण आणि राजकारणात आहे. जसं जमेल तसं सामाजिक घटकाची जेवढी काम मला करता येतील तेवढी मी आतापर्यंत केलेली आहेत. गोपीनाथ मुंडे आणि अण्णांच्या संस्काराने मी घडलो आहे. जात पात धर्म हे पाहून राजकारण केलेले नाही. मी ज्या जातीत जन्माला आलोय त्यापेक्षा इतर जातीतील माझे सहकारी आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मी सर्वप्रथम बीड जिल्हा परिषदेत ठराव मांडला होता. यामुळेच ठिकठिकाणी एक नवीन चळवळ उभी राहिली. यानंतर मग मराठा आरक्षणाचे ठराव सर्व ठिकाणी होऊ लागले. ज्या ज्यावेळी मराठा समाजाचे आंदोलन झाले, त्या प्रत्येक आंदोलनात मी सहभागी होतो, असे धनंजय मुंडे म्हणाले.

लोकसभेच्या निवडणुकीनंतर परळीत जे जरांगेचे आंदोलन झालं, त्याला जागा देण्यापासून पाणी देण्यापर्यंतच, आंदोलनला येणाऱ्याला वाहनं देण्यापर्यंत मी मदत केली. माझ्या सहकाऱ्यांनीही केली. अण्णासाहेब जावळे, विनायक मेटे, छत्रपती संभाजी महाराज यांच्या खांद्याला खांदा लावून मी मराठा समाजाच्या लढाईत उतरलो आहे. जगात ५८ मोर्चे निघाले. त्यांनी एक आदर्श जगाला दिला. त्या मोर्चात मुंबईच्या मोर्चात मला सहभागी होता आला. त्या मोर्चात मला बोलण्याची संधीही मिळाली. मी ५ वर्ष राज्याचा विरोधी पक्षनेता म्हणून काम केलं. पाच वर्षाच्या त्या काळात जेवढी आंदोलन झाले, तेवढे दिवस मी सभागृह बंद केले. फक्त एवढंच नाही तर नरड्यातून रक्त पडेपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, यासाठी आवाज उठवला, असेही धनंजय मुंडेंनी सांगितले.

मी एक शब्दही बोललेलो नाही

नगरमध्ये एक बलात्कार झाला. मी स्वत तिकडे गेलो. आरोपीला पकडून देण्याचं काम केलं. मी पालकमंत्री होतो, तेव्हा कुणबीचे प्रमाणपत्र देण्याचा सरकारने निर्णय घेतला. त्यावेळी ८० हजार कुणबी प्रमाणपत्र बीड जिल्ह्यात मिळालेले आहेत. मंत्री म्हणून मी एकदा जरांगेंचं उपोषणही सोडलं होतं. त्यावेळी माझ्या हाताने त्यांनी उपोषणही सोडलं आहे. माझं आणि त्यांचं तसं काही वैर नाही. जीवनात कधीच फक्त १७ तारखेची सभा वगळता मनोज जरांगेंच्या विरोधात मी एक शब्दही बोललेलो नाही. एक आरोपही केलेला नाही, असेही त्यांनी म्हटले.