…आणि धनंजय मुंडेंनी सरकारी अधिकाऱ्याला भर बैठकीतून हाकलले!

| Updated on: Feb 02, 2021 | 10:18 PM

उत्कर्ष गुट्टे हे बीड नगरपालिकेत मुख्याधिकारी म्हणून कार्यरत आहेत. गेल्यावेळी नियोजन समितीच्या बैठकीत गुट्टे यांना नगरपालिकेतील कामकाजाचा अहवाल तात्काळ सादर करण्याचे आदेश नियोजन समितीने दिले होते. | Dhananjay Munde

...आणि धनंजय मुंडेंनी सरकारी अधिकाऱ्याला भर बैठकीतून हाकलले!
गुट्टे यांच्या कामाचा पाढा इतर सदस्यांनी देखील वाचून दाखविला. इथं कोणाचीही गय केली जाणार नसल्याचे खडेबोल धनंजय मुंडे यांनी सुनावीत मुख्याधिकारी गुट्टे यांना भर बैठकीतून अक्षरशः हाकलून दिले.
Follow us on

बीड: पालकमंत्री धनंजय मुंडे (Dhanajay Munde) यांनी मंगळवारी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीतून नगरपालिकेचे मुख्याधिकारी उत्कर्ष गुट्टे (Utkarsh Gutte) यांना हाकलवून दिल्याचा प्रकार समोर आला आहे. या बैठकीला सर्वच विभागातील अधिकारी उपस्थित होते. बीड नगरपालिकेचे मुख्याधिकारी उत्कर्ष गुट्टे यांना अहवाल मागवून देखील सादर केला नाही. त्यामुळे संतापलेल्या धनंजय मुंडे आणि नियोजन समितीवरील सदस्यांचा पारा चढला. येथे कोणाचीही गय केली जाणार नसल्याचे खडे बोल सुनावत धनंजय मुंडे यांनी गुट्टे यांना भर बैठकीतून हाकलून दिले. जिल्हाधिकाऱ्यांनी सदर अधिकाऱ्यावर तातडीने निलंबन करण्याबाबत संबंधित यंत्रणेला सूचित केले आहे. या सर्व प्रकारामुळे बीड जिल्ह्यातील अधिकाऱ्यांची पाचावर धारण बसली आहे. (NCP leader Dhananjay Munde fired government officials in meeting)

उत्कर्ष गुट्टे हे बीड नगरपालिकेत मुख्याधिकारी म्हणून कार्यरत आहेत. गेल्यावेळी नियोजन समितीच्या बैठकीत गुट्टे यांना नगरपालिकेतील कामकाजाचा अहवाल तात्काळ सादर करण्याचे आदेश नियोजन समितीने दिले होते. आज नियोजन समितीच्या बैठकीत मुख्याधिकारी गुट्टे यांना अहवालाविषयी विचारणा केली असता कामाचा अहवाल जिल्हा प्रशासनाकडे सुपूर्द केल्याची खोटी माहिती दिली.

जिल्हा प्रशासनाकडून कसलाच अहवाल प्राप्त झाला नसल्याचे उघड झाल्यावर मुख्याधिकारी गुट्टे यांचा खोटारडेपणा उघड झाला. यावेळी नियोजन समितीचे अध्यक्ष तथा पालकमंत्री धनंजय मुंडे हे चांगलेच भडकले. गुट्टे यांच्या कामाचा पाढा इतर सदस्यांनी देखील वाचून दाखविला. इथं कोणाचीही गय केली जाणार नसल्याचे खडेबोल धनंजय मुंडे यांनी सुनावीत मुख्याधिकारी गुट्टे यांना भर बैठकीतून अक्षरशः हाकलून दिले. त्यानंतर गुट्टे यांच्या निलंबनाच्या कारवाईसाठी एकमुखी ठराव देखील पारित करण्यात आला.

मुख्याधिकारी उत्कर्ष गुट्टे वादग्रस्त

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदीच्या काळात सात ते साडेनऊ वाजेपर्यंत संचारबंदी शिथिल करण्यात आली होती. यावेळी गुट्टे यांनी एका मेडिकल चालकास काठीने अमानुष मारहाण केली होती. मेडिकल दुकानदारांनी संप घोषित करून गुट्टे यांचा निषेध केला होता. एवढेच नाही तर गुट्टे यांनी शेतकऱ्यांना मारहाण करून त्यांचा भाजीपाला कचरा गाडीत भरून नेला.

त्यामुळे दोन दिवस शेतकऱ्यांनी भाजीपाला बंद केल्याने बीडकरांची मोठी गैरसोय झाली होती. खासबाग परिसरातील एका आडत व्यापाऱ्याला मारहाण केल्याने व्यापारी महासंघाकडून आडत आणि भाजीपाला मंडी बंद केली होती. शेतकऱ्यांचा भाजीपाला उचलून नेल्यानंतर काहीवेळात नातेवाईक मित्र आणि कर्मचाऱ्यांना मोफत भाजीपाला दिल्याचा देखील त्यांच्यावर आरोप होता. अशा अनेक गोष्टींमुळे मुख्याधिकारी गुट्टे हे सतत वादग्रस्त ठरले आहेत.

मुंडे, अधिकाऱ्यांसाठी मंगळ..?

गेल्या मंगळवारी म्हणजेच 26 जानेवारी रोजी पालकमंत्री धनंजय मुंडे हे प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहणासाठी बीडमध्ये उपस्थित होते. कथित वादानंतर धनंजय मुंडे हे पहिल्यांदाच बीड दौऱ्यावर आले होते. यावेळी नागरिकांनी अधिकाऱ्यांच्या कामाचा पाढा वाचला. यावेळी गाडी थांबवून भर रस्त्यात मुंडे यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले होते. आज नियोजन समितीची बैठक देखील मंगळवारी पार पडली. आज देखील मुंडे यांनी अधिकाऱ्यांना पुन्हा चांगलेच फैलावर घेतले आणि आजही वार होता मंगळवार.. त्यामुळे मुंडे हे अधिकाऱ्यांसाठी मंगळ ठरल्याची चर्चा शहरात सुरू होती.

(NCP leader Dhananjay Munde fired government officials in meeting)