राष्ट्रवादीच्या खासदार, आमदारापासून ते मंत्र्यापर्यंत, एक महिन्याचे वेतन पूरग्रस्तांच्या मदतीला देणार, नवाब मलिक यांची माहिती

| Updated on: Jul 26, 2021 | 5:47 PM

आगामी एक- दोन दिवसात नेमकी काय मदत केली जाईल हे पक्षाच्या माध्यमातून जाहीर करण्यात येईल, असे मलिक यांनी सांगितले आहे.

राष्ट्रवादीच्या खासदार, आमदारापासून ते मंत्र्यापर्यंत, एक महिन्याचे वेतन पूरग्रस्तांच्या मदतीला देणार, नवाब मलिक यांची माहिती
ncp help
Follow us on

मुंबई : राष्ट्रवादीचे मंत्री, राज्यमंत्री सर्व खासदार तसेच आमदार एका महिन्याचे वेतन मुख्यमंत्री रिलीफ फंडात पूरग्रस्त लोकांसाठी देणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी जाहीर केले. त्यानंतर या घोषणेबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी अधिक माहिती दिली. अजित पवार यांनी वेतन देण्यासंबंधीची घोषणा केली आहे. तसेच आगामी एक- दोन दिवसात नेमकी काय मदत केली जाईल हे पक्षाच्या माध्यमातून जाहीर करण्यात येईल, असेही मलिक यांनी सांगितले आहे. (NCP MLA minister MP will give its one month salary to cm relief fund for help of flood victims)

एक- दोन दिवसात नेमकी काय मदत केली जाईल हे जाहीर करणार 

पत्रकार परिषदेत बोलताना, “सरकार आपल्या परीने मदत करेल. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून आणखी मदत देता येईल का याबाबतची माहिती राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार सर्वांशी चर्चा करुन घेत आहेत. त्यामुळे एक- दोन दिवसात नेमकी काय मदत केली जाईल, हे पक्षाच्या माध्यमातून जाहीर करण्यात येईल,” असे नवाब मलिक म्हणाले.

कोकण, सातारा, सांगली याठिकाणी अपरिमित हानी

तसेच आठ दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे महापूराने कोकण, सातारा, सांगली याठिकाणी अपरिमित हानी झाली आहे. दरड कोसळून जवळपास 251 लोकांनी आपला जीव गमावला आहे. तर 100 पेक्षा जास्त लोक बेपत्ता आहेत. यासह मुंबई, पुणे, अमरावती याठिकाणीही पुराने परिस्थिती अवाक्याबाहेर गेली होती. या नुकसानग्रस्त लोकांना एसडीआरएफच्या नियमानुसार मदत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केली आहे,” असे मलिक यांनी सांगितले. तसेच पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार हे सुद्धा पूरग्रस्त दौर्‍यावर आहेत. लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येत आहे. एनडीआरएफ, नेव्ही, आर्मी यांची मदत घेऊन बचाव कार्य सुरू आहे, असेही नवाब मलिक म्हणाले.

महापुराने घरं उध्वस्त झाली, शेतकर्‍यांचे प्रचंड नुकसान झाले

या घटनेत ज्यांचा जीव गेला आहे त्यांना 5 लाख रुपयांची घोषणा राज्य सरकारच्यावतीने करण्यात आली आहे. मुंबईत जीव गमावलेल्या लोकांच्या नातेवाईकांनाही पैसे वाटप झाले आहेत. या महापुराने घरं उध्वस्त झाली. शेतकर्‍यांचे प्रचंड नुकसान झाले शिवाय शेतकऱ्यांची जनावरेही वाहून गेली. येत्या कॅबिनेटमध्ये यावर निर्णय घेऊन घोषणा करण्यात येईल, असेही नवाब मलिक म्हणाले.

भाजपचे नेते नको ती भाषा करत आहेत 

संकटे येतात त्यावेळी सर्व राजकीय पक्षांची जबाबदारी असते एकसंघ येऊन मदत करण्याची. मुख्यमंत्री केंद्र सरकार मदत करत आहे हे सांगत आहेत. यामध्ये ते कोणतेही राजकारण करत नाहीत. मात्र भाजपचे नेते नको ती भाषा करत आहेत. केंद्रीयमंत्री नारायण राणे व त्यांचे चिरंजीव ट्वीट करुन जी भाषा वापरत आहेत ते योग्य नाही असेही नवाब मलिक म्हणाले. नारायण राणे हे पूरग्रस्त ठिकाणी पत्रकार परिषद घेऊन आम्ही मुख्यमंत्रिपदाच्या वेटींगमध्ये आहोत असे वक्तव्य करत आहेत. सर्वांनी संकटकाळात मदत केली पाहिजे. मात्र भाजपचे केंद्रीयमंत्री जे बोलतात ते योग्य नाही,” अशी टीकादेखील मलिक यांनी भाजपवर केली.     .

इतर बातम्या :

मीराबाई चानूचं रौप्य पदक सुवर्णमध्ये बदलण्याची शक्यता, चीनची वेटलिफ्टर डोपिंगमध्ये दोषी?

औरंगाबादेतील कचऱ्याचा प्रश्न सोडवा, अन्यथा पालिका प्रशासकांच्या घरासमोर कचरा टाकू, एमआयएमचा अल्टिमेटम

भाजप-राज ठाकरेंमध्ये नेमकं काय चाललंय? युती होणार की नाही? मुंबईपुरतीच होणार की पुणे, नाशकातही?; वाचा सविस्तर

(NCP MLA minister MP will give its one month salary to cm relief fund for help of flood victims)