भाजप-राज ठाकरेंमध्ये नेमकं काय चाललंय? युती होणार की नाही? मुंबईपुरतीच होणार की पुणे, नाशकातही?; वाचा सविस्तर

(Will Raj Thackeray and BJP turn allies?, read inside story)

भाजप-राज ठाकरेंमध्ये नेमकं काय चाललंय? युती होणार की नाही? मुंबईपुरतीच होणार की पुणे, नाशकातही?; वाचा सविस्तर
maharashtra political leader
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: भीमराव गवळी

Jul 26, 2021 | 4:38 PM

मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी परप्रांतियांबाबतच्या त्यांच्या भूमिकांचे व्हिडीओ भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना पाठवले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा मनसे-भाजपच्या युतीची चर्चा सुरू झाली आहे. पण, त्याचवेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी युतीची शक्यता फेटाळून लावली आहे. मात्र, तरीही भाजप-मनसे युती होणार की नाही? झाली तर ती केवळ मुंबईपुरतीच असेल की नाशिक आणि पुण्यातही होईल, अशा चर्चा रंगल्या आहेत. (Will Raj Thackeray and BJP turn allies?, read inside story)

राज यांच्या मुलाखतीचे व्हिडीओ पाटलांकडे

राज ठाकरे आणि चंद्रकांत पाटील यांची काही दिवसांपूर्वीच नाशिकच्या पार्किंग लॉटमध्ये ओझरती भेट झाली होती. त्याचवेळी राज ठाकरे यांनी परप्रांतीयांविषयी माझी नेमकी काय भूमिका आहे, याच्या क्लिप्स तुम्हाला मी पाठवतो, असे राज ठाकरे यांनी चंद्रकांत पाटील यांना सांगितले होते. त्यानुसार मनसेकडून या क्लिप्स चंद्रकांत पाटील यांच्यापर्यंत पोहोचवण्यात आल्या. त्यामुळे राज ठाकरे आगामी पालिका निवडणुकीत भाजपशी युती करण्यासाठी उत्सुक आहेत का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. सध्याची घडामोड पाहता या दिशेने आणखी एक सकारात्मक पाऊल पडले आहे. आता चंद्रकांत पाटील लवकरच भाजप आणि मनसेच्या युतीसंदर्भात घोषणा करतील, असे सांगितले जात आहे.

फडणवीस काय म्हणाले?

देवेंद्र फडणवीस यांनी आज मनसेसोबतच्या युतीवर भाष्य केलं. मनसेसोबत कोणतीही चर्चा करण्यात आली नाही. चंद्रकांत पाटील यांना मनसेसोबत युती करण्याबाबत पत्रकारांनी विचारलं होतं. त्यावेळी त्यांनी भूमिका स्पष्ट केली होती. मनसे आमचा शत्रू पक्ष नाही. पण त्यांचे विचार आणि भूमिका आम्हाला मान्य नसल्याचं पाटील म्हणाले होते. भाजपला भाषेच्या आधारावर होणारा भेदभाव मान्य नाही. मनसेने त्यांची भूमिका बदलायला हवी. त्यांनी अलिकडच्या काळात हिंदुत्वाद स्विकारला आहे. पण त्यांनी मूळ भूमिका बदलली असती तर विचार केला असता. पण आज युतीची कोणतीही चर्चा नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.

मुनगंटीवारांचा गौप्यस्फोट

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि राज ठाकरे यांच्या नाशिकमधील भेटीनंतर भाजप-मनसे युतीच्या चर्चांनी जोर धरला आहे. राज ठाकरे यांच्या परप्रांतियांबाबतच्या वक्तव्याच्या क्लिप्स चंद्रकांत पाटलांना पाठवण्यात आल्याचं वृत्त आहे. त्यातच आता भाजपचे पहिल्या फळीतील नेते सुधीर मुनंगटीवार यांनी भाजप- मनसे युतीवर मोठं विधान केलं आहे. भविष्यात आमची युती झाली तर त्यात गैर काय, असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले. राज यांचा मलाही फोन आला होता. येत्या काही दिवसात मी त्यांची भेट घेईन, असं मुनगंटीवार यांनी सांगतिलं. मुनगंटीवार यांच्या या विधानाने भाजप-मनसे युतीच्या चर्चांना आणखी बळ मिळालं आहे.

मुंबईत ताकद, पण नगरसेवक एकच

मुंबईत मनसेला मानणारा मोठा वर्ग आहे. मुंबईत राज ठाकरे यांच्या लाखालाखाच्या सभा होतात. मात्र, गेल्या दोन पालिका निवडणुकांपासून मनसेचा मतदानाचा टक्का कमी झाला आहे. तसेच त्यांची नगरसेवकांची संख्याही कमी होऊ लागली आहे. या महापालिकेत मनसेचे एकूण 7 नगरसेवक होते. मात्र, त्यातील सहा नगरसेवकांचा एक गट शिवसेनेला जाऊन मिळाला. या नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे महापालिकेत मनसेचा एकच नगरसेवक आहे. भाजपचे 83 नगरसेवक आहेत. त्यामुळे युती झाल्यास जागा वाटपात मनसेच्या वाट्याला अत्यल्प जागा येऊ शकतात, असं सूत्रांनी सांगितलं.

मुंबई महापालिकेतील पक्षीय बलाबल

शिवसेना – 97
भाजप – 83
काँग्रेस – 29
राष्ट्रवादी – 8
समाजवादी पक्ष – 6
मनसे – 1
एमआयएम – 1
अभासे – 1

नाशिकमध्येही ताकद घटली

नाशिक महापालिकेत महापौर बसविणाऱ्या मनसेची सध्या नाशिकमध्ये अत्यंत वाईट अवस्था आहे. नाशिकमध्ये सध्या मनसेचे फक्त सहा नगरसेवक आहेत. पालिकेत भाजपची सत्ता असून भाजपचे 65 नगरसेवक आहेत. मनसे आणि भाजपची नाशिक महापालिकेत यापूर्वी युती झाली होती. त्यावेळीही मनसेचा परप्रांतियांचा मुद्दा होताच. तरीही भाजप-मनसेची युती झाल्यानंतर त्याचं भाजपला राजकीय नुकसान झालं नव्हतं. त्यामुळे यावेळी मनसे-भाजप नाशिकमध्ये पुन्हा एकत्र येणार का? याबाबतची सर्वांचीच उत्सुकता लागली आहे.

नाशिक मनपामध्ये पक्षीय बलाबल

भाजप – 65
शिवसेना – 35
राष्ट्रवादी – 6
काँग्रेस – 6
मनसे – 6
रिपाइं – 1

पुण्यात नगण्य ताकद

पुणे पालिकेत एकूण 164 सदस्य आहेत. पुणे पालिकेत भाजप-रिपाइंची सत्ता आहे. पालिकेत भाजपचे 99 तर मनसेचे फक्त 2 नगरसेवक आहे. म्हणजे पालिकेत मनसेचं अस्तित्व जवळ जवळ नसल्या सारखं आहे. मात्र, पुण्यात मनसेची व्होटबँक मोठी आहे. ही व्होटबँक विखूरलेली आहे. त्यामुळे भाजप-मनसेची युती झाल्यास त्यांचं राष्ट्रवादीला सर्वात मोठं नुकसान होऊ शकतं, असं राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे.

पुणे महापालिका पक्षीय बलाबल

भाजप 99
काँग्रेस 09
राष्ट्रवादी 44
मनसे 2
सेना 9
एमआयएम 1
एकूण 164

ठाण्यात एकही नगरसेवक नाही

ठाणे महापालिकेत शिवसेनेची सत्ता आहे. महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस हा विरोधी पक्षात आहे. तर, 131 सदस्य संख्या असलेल्या पालिकेत भाजपचे 23 नगरसेवक आहेत. मात्र, ठाण्यात ताकद असूनही पालिका निवडणुकीत मनसेचा एकही उमेदवार निवडून आलेला नाही. ठाणे पालिकेत मनसे आणि भाजपची युती झाल्यास पालिकेची सत्ता खेचून आणण्यात या युतीला यश येऊ शकते, असं जाणकार सांगतात.

ठाण्यातील पक्षीय बलाबल

शिवसेना – 67
राष्ट्रवादी – 34
भाजप – 23
काँग्रेस – 3
एमआयएम – 2
अपक्ष – 2 (Will Raj Thackeray and BJP turn allies?, read inside story)

 

संबंधित बातम्या:

राज ठाकरेंचा मलाही फोन, ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात आम्ही भेटणार : सुधीर मुनगंटीवार

मुंबईतील भाजपच्या सर्व नगरसेवकांचे एक महिन्यांचे वेतन पूरग्रस्तांना; भाजपची घोषणा

उर्मिला मातोंडकर यांच्या पंकजा मुंडेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा, पंकजा म्हणतात, चला…

(Will Raj Thackeray and BJP turn allies?, read inside story)

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें