Rohit Pawar: ‘…तर सर्व नेते मोर्चात उतरतील’, रोहित पवारांसमोर पक्षाची अट, राष्ट्रवादीच्या गोटातून मोठी बातमी समोर!

मोर्चावरुन रोहित पवार यांना पक्षातूनच विरोध होत असल्याची चर्चा होत आहे. रोहित पवार यांच्या मोर्चामध्ये सहभागी होऊ नये असे पक्षातील पदाधिकाऱ्यांना आदेश दिल्याचंही सांगण्यात आले. याबाबत आता प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे.

Rohit Pawar: ...तर सर्व नेते मोर्चात उतरतील, रोहित पवारांसमोर पक्षाची अट, राष्ट्रवादीच्या गोटातून मोठी बातमी समोर!
Rohit Pawar
| Updated on: Nov 23, 2026 | 8:41 PM

संतोष नलावडे, प्रतिनिधी: शेतकरी प्रश्नांवरुन सरकारला सवाल करण्यासाठी 4 ते 9 डिंसेंबरदरम्यान हिवाळी अधिवेशनावर न्यायहक्क ट्रॅक्टर मोर्चा काढण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी घेतला आहे. मात्र या मोर्चावरुन रोहित पवार यांना पक्षातूनच विरोध होत असल्याची चर्चा होत आहे. रोहित पवार यांच्या मोर्चामध्ये सहभागी होऊ नये असे पक्षातील पदाधिकाऱ्यांना आदेश दिल्याचंही सांगण्यात आले. याबाबत आता प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे.

रोहित पवारांच्या मोर्चाला विरोध? प्रदेशाध्यक्ष शिंदेंनी स्पष्ट केली भूमिका! 

Loading...

​रोहित पवार यांच्या शेतकरी आंदोलनाला पक्षातून विरोध होत असल्याच्या बातम्या पूर्णपणे निराधार आहेत. नेत्यांना असे कोणतेही आदेश दिलेले नाहीत. २६ तारखेच्या बैठकीला उपस्थित राहण्याच्या निरोपाचा कोणीतरी ‘ध चा मा’ केला आहे. यापूर्वी रोहित पवारांनी नाशिकसह जिथे-जिथे आंदोलने केली, तिथे स्वतः शरद पवार, सुप्रिया सुळे आणि पक्षाचे सर्व प्रमुख नेते सहभागी होऊन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आहेत, असं प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी स्पष्ट केले आहे.

‘हा शरद पवारांचा पक्ष…’

हा शरद पवारांचा पक्ष असून कोणताही निर्णय एकत्रित चर्चेतून झाला पाहिजे. सध्याचा ट्रॅक्टर मोर्चा दुष्काळ आणि टँकरच्या प्रश्नावर असला तरी विदर्भ-मराठवाड्याचे इतर प्रश्नही एकत्र घेतल्यास आंदोलनाची तीव्रता अधिक वाढेल. ​पक्षाची मंजुरी आणि चर्चा करून चिन्हावर आंदोलन केल्यास हरकत नाही. मात्र, चिन्हाशिवाय आंदोलन करण्याचा निर्णय त्यांचा वैयक्तिक आहे, असं महत्त्वाचे विधानही शशिकांत शिंदे यांनी केले.

तर सर्व नेते 100 टक्के मोर्चात उतरतील…! 

दरम्यान, यापूर्वीही त्यांनी मुख्यमंत्र्यांबाबत किंवा अजित पवारांच्या अपघाताबाबत वैयक्तिक पातळीवर भूमिका मांडली होती. त्यांना स्वतंत्रपणे काम करण्याचे स्वातंत्र्य आहे, त्यांच्यावर पक्षाचे बंधन नसावे. ​रोहित पवारांनी शरद पवार आणि आमच्याशी चर्चा करून पक्षाचा झेंडा व चिन्ह घेऊन मोर्चा काढल्यास, पक्षाचे सर्व नेते १०० टक्के त्यांच्यासोबत आंदोलनात उतरतील, असंही प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी स्पष्ट केले आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us