NEET Paper Leak : नीट पेपरफुटीप्रकरणी मोठी कारवाई, लातूरमधील कोट्यवधींची कोचिंग इन्स्टिट्युट CBIच्या रडारवर, काय-काय सापडलं ?

नीट पेपरफुटी प्रकरणामुळे देशभरात खळबळ माजली आहे. या प्रकरणाच्या तपासाला वेग आला असून, लातूरमधील १०० कोटींहून अधिक उलाढाल असलेल्या एका मोठ्या कोचिंग संस्थेवर सीबीआयची नजर आहे. संस्थेचे मालक आणि पेपरफुटीचा सूत्रधार यांच्यातील संबंधांची चौकशी सुरू आहे. संस्थेच्या मॉक टेस्ट व प्रत्यक्ष परीक्षेतील प्रश्नांच्या साम्यतेमुळे संशय बळावला आहे. यामुळे लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आले आहे.

NEET Paper Leak : नीट पेपरफुटीप्रकरणी मोठी कारवाई, लातूरमधील कोट्यवधींची कोचिंग इन्स्टिट्युट CBIच्या रडारवर, काय-काय सापडलं ?
Image Credit source: प्रातिनिधिक फोटो
| Updated on: May 18, 2026 | 8:29 AM

देशातील सर्वात मोठी वैद्यकीय प्रवेश परीक्षा असलेल्या NEET UG पेपरफुटी प्रकरणामुळे मोठी खळबळ माजली. यामुळे लाखो विद्यार्थ्यांचे स्वप्न एका झटक्यात उद्ध्वस्त झालं. आता फेरपरीक्षा 21 जूनला होणार असली तरी विदयार्थी अजूनही टेन्शनमध्येच आहेत. दरम्यान या पेपरफुटीप्रकरणी सुरू असलेल्या तपासाला वेग आला असून आता एक मोठा खुलासा झाला आहे.

लातूर येथील 100 कोटी रुपयांपेक्षा जास्त वार्षिक उलाढाल असलेल्या एक मोठी कोचिंग संस्थेवर आता सीबीआयची नजर पडली असून त्याची चौकशी सुरू आहे. पेपर फुटीच्या या धक्कादायक घटनेनंतर, सीबीआयने या संस्थेच्या कार्यालयावर छापा टाकून अनेक कागदपत्रे आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणांची तपासणी केली.

यामुळे, रेणुकाई केमिस्ट्री क्लासेस (आरसीसी) करिअर सेंटर इन्स्टिट्यूटचे मालक शिवराज मोटेगावकर हे आता या मोठ्या कारवाईच्या रडारवर आले आहेत. तपास यंत्रणेच्या एका विशेष पथकाने रविवारी मोटेगावकर यांना चौकशीसाठी पुण्यात बोलावले होतं, तिथेच संध्याकाळपर्यंत त्यांची चौकशी करण्यात आली. यापूर्वी शुक्रवारी, पथकाने त्यांची 11 तास चौकशी केली आणि त्यानंतर पुढील तपासासाठी पुण्यात परत येण्याची नोटीस बजावली होती.

नीट पेपरफुटी प्रकरणाचा सूत्रधार प्राध्यापक पी. व्ही. कुलकर्णी हा देखील लातूरचाच असल्याचे तपासात उघड झाल्यावर हे प्रकरण गंभीर बनले. तो NTAशी संबंधित होता आणि त्याला आधीच अटक करण्यात आली आहे. स्थानिक सूत्रांनुसार, कुलकर्णी आणि मोटेगावकर हे एकमेकांना ओळखत होते. मात्र काही वर्षांपूर्वी एका गोष्टीवरून त्यांच्यात मतभेद झाले होते, पण नंतर त्यांच्यात समेट झाला. या संबंधाची चौकशी करण्यासाठी सीबीआयने रविवारी पुन्हा लातूरमधील मोटेगावकर यांच्या कार्यालयाला भेट दिली. तेथील कॉम्प्युटर, लॅपटॉप आणि आयपॅड यांसारखी इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त करून त्यांची तपासणी करण्यात आली.

मॉक टेस्ट आणि खऱ्या पेपरमधील प्रश्न सेम, शंका वाढली

सीबीआयला एक गंभीर तक्रार मिळाली होती, त्यानंतर या कोचिंग सेंटरबद्दलचा संशय अधिकच बळावला. आरसीसी इन्स्टिट्यूटच्या सराव परीक्षेतील अनेक प्रश्न नीट 2026 च्या प्रत्यक्ष प्रश्नपत्रिकेशी मिळतेजुळते होते असा दावा या तक्रारीत करण्यात आला होता की. याचदरम्यान, सोशल मीडियावर एक व्हिडिओ समोर आला. सराव परीक्षेतील किती प्रश्न हे प्रत्यक्ष परीक्षेत आले, असा प्रश्न संस्थेचे प्रमुख विद्यार्थ्यांना विचारताना दिसले होते.. त्यावर विद्यार्थी होकारार्थी उत्तर देत असल्याचे दिसले.

मिळालेल्या माहितीनुसार, लातूरमधील या संस्थेची सुरुवात 1999 साली केवळ 10 विद्यार्थ्यांसह झाली आणि आता महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये तिच्या शाखा आहेत. दरवर्षी, नीट (NEET) आणि जेईई (JEE) परीक्षांची तयारी करण्यासाठी अंदाजे 40 हजार विद्यार्थी येथे प्रवेश घेतात. प्रति विद्यार्थी सरासरी50 ते 65 हजार रुपये फी आकारणाऱ्या, या कोचिंग संस्थेची वार्षिक उलाढाल 100 कोटी रुपयांपेक्षा जास्त असण्याचा अंदाज आहे.

नीट पेपरफुटीप्रकरणी सीबीआयच्या तपासाची व्याप्ती आता वाढली आहे. यापूर्वी, आपल्या मुलीसाठी नीट परीक्षेची कागदपत्रे मिळवण्यासाठी पैसे दिल्याचा आरोप असलेल्या नांदेडच्या एका व्यावसायिकाच्या घरीही छापे टाकण्यात आले होते. तपास यंत्रणा आता संपूर्ण नेटवर्क उलगडण्याचे काम करत आहेत.

Follow Us