नेपाळमध्ये हिंसाचाराचा उद्रेक, महाराष्ट्रातील शेकडो पर्यटक अडकले, तुमच्या जिल्ह्यातील कोण?

नेपाळमध्ये जेन झेड तरुणांच्या हिंसक आंदोलनामुळे १५० पेक्षा जास्त भारतीय पर्यटक अडकले आहेत. यात महाराष्ट्रातील ६५ पर्यटक ठाणे जिल्ह्यातील आहेत. राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्षा आणि भारतीय दूतावास अडकलेल्या पर्यटकांच्या मदतीसाठी प्रयत्नशील आहेत.

नेपाळमध्ये हिंसाचाराचा उद्रेक, महाराष्ट्रातील शेकडो पर्यटक अडकले, तुमच्या जिल्ह्यातील कोण?
| Updated on: Sep 11, 2025 | 9:22 AM

भारताच्या शेजारी असलेल्या नेपाळमध्ये ‘जेन झी’ तरुण वर्ग रस्त्यावर उतरल्याने सरकारविरोधात दोन दिवस हिंसक आंदोलने सुरु आहे. नेपाळच्या बहुतांश भागात जाळपोळ, तोडफोड अशा आक्रमक घटना घडताना दिसत आहेत. नेपाळमध्ये सुरू असलेल्या राजकीय अस्थिरता आणि हिंसक आंदोलनामुळे राज्यातील सुमारे १५० हून अधिक पर्यटक या ठिकाणी अडकल्याचे दिसत आहे. यामध्ये सर्वाधिक ६५ पर्यटक ठाणे जिल्ह्यातील असून सर्व पर्यटक सुखरुप आहेत, अशी माहिती राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली आहे. सध्या या पर्यटकांच्या मदतीसाठी भारतीय दूतावास आणि राज्य सरकार प्रयत्न करत आहेत.

नेपाळमध्ये ‘जेन झी’ (Gen Z) तरुण वर्गाने पुकारलेल्या हिंसक आंदोलनांमुळे नेपाळमधील रस्ते आणि विमान वाहतूक ठप्प झाली आहे. यामुळे महाराष्ट्रातून पर्यटनासाठी गेलेले सर्व पर्यटक वेगवेगळ्या हॉटेल्समध्ये अडकले आहेत. या अडकलेल्या पर्यटकांमध्ये ठाणे, पुणे, मुंबई, नाशिक, अकोला, यवतमाळ, लातूर, आणि कोल्हापूर या जिल्ह्यांमधील नागरिकांचा समावेश आहे. आता याबद्दल राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्षाने पर्यटकांची आकडेवारी समोर आली आहे.

राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिलेल्या माहितीनुसार, नेपाळमध्ये अडकलेल्या १५० पर्यटकांपैकी ६५ पर्यटक ठाणे जिल्ह्यातील आहेत. याशिवाय पुणे जिल्ह्यातील ५, मुंबईतील ६, अकोल्यातील १०, यवतमाळमधील १ आणि लातूरमधील २ पर्यटक अडकले आहेत. तसेच नाशिक शहरातील चार पर्यटक आणि कळवणमधील काही पर्यटक देखील नेपाळमध्ये अडकल्याची माहिती मिळाली आहे. याव्यतिरिक्त, पुणे आणि मुंबईमधील २३ ज्येष्ठ नागरिकांचा एक गटही नेपाळमध्ये अडकला आहे. हे सर्व पर्यटक ४ दिवसांपासून हॉटेलमध्ये थांबले आहेत. नेपाळमधील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी भारत सरकारकडे मदतीची विनंती केली आहे.

कैलास मानसरोवर यात्रेकरू देखील अडकले

नेपाळमध्ये अडकलेल्यांमध्ये १२ कैलास मानसरोवर यात्रेकरूंचाही समावेश आहे. हे यात्रेकरू चीन सीमेजवळील कुरांग प्रांतात अडकले आहेत. भारतीय दूतावासाने सर्व पर्यटकांना सुरक्षित ठिकाणी राहण्याचे आणि हॉटेलबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. तसेच, स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे निर्देश दिले आहेत. राज्यातील पर्यटक ६ टूर ऑपरेटरच्या माध्यमातून नेपाळमध्ये पर्यटनासाठी गेले होते. मात्र तिथे उद्भवलेल्या हिंसक परिस्थितीमुळे अनेक पर्यटक भयभीत झाले आहेत.

पर्यटकांना सुखरूप परत आणण्याचे प्रयत्न सुरू

तर दुसरीकडे बीड जिल्ह्यातील नेपाळमध्ये अडकलेले ११ पर्यटक बसने उत्तर प्रदेशात सुखरूप पोहोचले आहेत. सध्या नेपाळमधील विमान सेवा शुक्रवारपर्यंत पूर्ववत होण्याची शक्यता आहे, त्यानंतर पर्यटकांना सुखरूप परत आणण्याचे प्रयत्न सुरू होतील. राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे संचालक डॉ. भालचंद्र चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार नेपाळमध्ये अडकलेल्या राज्यातील पर्यटकांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. पुण्यात अडकलेल्या ज्येष्ठ नागरिकांनी त्यांच्या नातेवाईकांशी संपर्क साधला असून, भारत सरकारने तातडीने मदत करावी अशी विनंती केली आहे.