ऑडिओ क्लिपमधली ती बाई…, अखेर मनोज जरांगेंकडून माहिती उघड, सगळंच सांगितलं
मनोज जरांगे पाटील यांनी आज पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेतली आहे. या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना त्यांनी पुन्हा एकदा मोठा खुलासा केला आहे. तसेच या प्रकरणात सत्य बाहेर आलं पाहिजे, अशी विनंती देखील त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केली आहे.

काही दिवसांपूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी एक पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी एक ऑडिओ क्लिप ऐकवली होती. या कथित ऑडिओ क्लिपमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जरांगे पाटील यांना देण्यासाठी भाजपकडून 500 कोटी रुपये घेतल्याचं म्हटलं होतं. दरम्यान यावरून आता वातावरण चांगलंच तापलं आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये एका महिलेचा देखील आवाज आहे. याबाबत बोलताना आता मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषदेमध्ये बोलताना मोठं विधान केलं आहे.
नेमकं काय म्हणाले जरांगे पाटील?
हे सगळं प्लॅनिग देवेंद्र फडणवीस यांना माहिती नाही अशी चर्चा आहे. मात्र या ऑडिओ क्लिपमुळे अनेकांचं राजकीय करिअर पणाला लागलं आहे. एकनाथ शिंदे यांनी पैसे घेतले नाहीत, त्यामुळे आता ते पण सोडणार नाहीत. मग ती ऑडिओ क्लिपमधील बाई असं म्हणलीच कसं काय? अशी माहिती मिळतीये की ती बाई पण लहान नाहीये. ती पण मोठ्या नेटवर्कमधील आहे, ती पण खोटं बोलणार नाही, अशी चर्चा आहे. मग जर शिंदे साहेंबानी पैसे घेतले नाहीत तर शिंदे साहेब त्या बाईंना पण सोडणार नाहीत कारण या प्रकरणामुळे एकनाथ शिंदे यांना त्रास झाला आहे.
उलट त्यांनी मराठा समाजाचे आभार मानले पाहिजेत, आम्ही हे सर्व बाहेर काढलं त्यामुळे त्यांची प्रतिष्ठा वाचली. जर आम्ही हे सगळं उघडं पाडलं नसतं तर यांनी पाठीमागे किती प्लॅन रचले असते. आता ते त्यांच्यातल्या त्यांच्यात एकमेकांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र हे सगळं खरं आहे, मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देखील विनंती करतो की, हे सगळं सत्य समोर आलं पाहिजे, आणि आता या प्रकरणात फडणवीस यांचा देखील कस लागणार आहे. कारण हे सोपं नाहीये, त्यांना त्यांच्याच लोकांविरोधात लढायचं आहे, ते चुकीच्या लोकांविरोधात लढणार का? ते जर चुकीच्या लोकांविरोधात लढले तर तो खरा खमक्या माणूस असं मी म्हणेन, असंही यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.