Sai Tamhankar : अचानक पाठीमागून हात आला… सई ताम्हणकरला आलेला बस प्रवासात विचित्र अनुभव
सई ताम्हणकरची एक जुनी मुलाखत सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यात तिने सुरुवातीच्या काळातील संघर्षाच्या दिवसांना उजाळा दिला. मुंबईला येताना बस प्रवासात तिला एका विचित्र अनुभवाला सामोरे जावे लागले, जेव्हा एका व्यक्तीने तिची छेडछाड करण्याचा प्रयत्न केला. पण सईने हिमतीने त्याला गप्प केले.

अभिनेत्री सई ताम्हणकरला तिच्या अगदी सुरुवातीच्या काळात अनेक संघर्ष करावा लागला. काही विचित्र अनुभवही आले होते. अगदीच सुरुवातीला ती कास्टिंग काउचचा शिकार होता होता राहिली होती. तिने खुद्द तो अनुभव सांगितला होता. जेव्हा ती सुरुवातीला सांगलीहून मुंबईला करिअर करण्यासाठी येत होती, तेव्हा तिला बसमध्ये एक विचित्र अनुभव आला होता. त्यामुळे तिला धक्काच बसला. पण तिने आपला खाक्या दाखवून त्या व्यक्तीला गप्प बसवलं होतं.
सई ताम्हणकरने एका पॉडकास्टला मुलाखत दिली होती. त्या मुलाखतीत तिने हा धक्कादायक किस्सा शेअर केला आहे. हा किस्सा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मी सुरुवातीच्या काळात मुंबईला बसने यायचे. सांगलीतून रात्री बस पकडायचे. सकाळी मुंबईत पोहोचायची. एकदा मी बसमध्ये बसलेले होते. रात्र झाली होती. मागे एक मुलगा बसला होता. मागच्या सीटवरून त्याचा हात आला. त्याने माझ्या खांद्याला हात लावला. मी तो हात हातात घेतला. खेचला आणि त्याला झापलं. म्हटलं, भावा, परत हा हात आला तर तुला हात वेगळा करून मिळेल. मला कुणाची भीती नाही. मी त्याला चांगलंच झापलं. हे होत असतं. मुंबई हे चांगलं शहर आहे. रात्री असं काही घडलं आणि तुम्ही मदत मागितली तर लोक मदतीला येतात. मी पाहिलं आहे, असं सई ताम्हणकर म्हणाली.
पीरिअडच्या काळात…
सईने घरातील वातावरणावरही या मुलाखतीत भाष्य केलं होतं. माजी पणजी खूप ट्रॅडिशनल होती. पीरिअड आल्यावर घरातल्या बायकांना पणजी दूर बसायला सांगायची. मी स्वत: हे पाहिलंय. त्यावर सुनांनीही पर्याय काय काढला. पीरिअड आल्याचं सांगायचंच नाही, असं सुनांनी ठरवलं होतं. आपल्या घरात हे होतंय याचं मला आश्चर्य वाटायचं. इलेक्ट्रिक बॅग्सचं आणि माझं नातं आहे. पीरिअड काळात मला त्याचा फायदा होतो. मुलींनी पेन किलर वारंवार घेऊ नये. ते योग्य नाही. नियमित व्यायाम केल्याने पीरिअडच्या त्रासातून फरक पडतो, असं सई म्हणाली.
हांजी हांजी करणारे मित्र नको
आणखी एका मुलाखतीत तिने मैत्रीवर भाष्य केलं आहे. मित्र हांजी हांजी करणारे असतील, कौतुक करणारे असतील तर तुमचा विकास खुंटतो. स्पष्ट बोलणारी माणसं जवळ केली पाहिजे. माणसांची इन्व्हेस्टमेंट ही सर्वात तगडी इन्व्हेस्टमेंट आहे. ती कधी लॅप्स होऊ शकत नाही. कधी त्यामुळे नुकसान होऊ शकत नाही. ना ती कुणी खेचून घेऊ शकतं. चांगले मित्र असणं खूप चांगलं आहे. तुमच्या मेंटल हेल्थसाठीपण आणि ओव्हरऑल हेल्थसाठीपण, असं ती म्हणाली.
ती आपली निवड असते
जेव्हा आपण मित्र मैत्रीण निवडतो, तेव्हा जज होण्याची भीती नसते. कारण ती निवड आपली असती. त्यावेळी आपण त्यांच्यासोबत अधिक मोकळेढाकळे असतो. जास्त फ्रि असतो. निर्लज्ज असतो कधी कधी. अशी लोकं आयुष्यात असायला हवी. मला खरं बोलणारी, आरसा दाखवणारी लोकं अधिक आवडतात. त्यामुळे तुम्ही रुटेड राहता, असंही तिने सांगितलं.
चेक असणं महत्त्वाचं…
कधी कधी तुमची चलती असते ना, तेव्हा तुमच्या कोणत्याही गोष्टीला लोकं ओके म्हणतात. तुमच्या कोणत्याही गोष्टीशी सहमत होता. तेव्हा हेच मित्र आरसा दाखवण्याचं काम करत असतात. हा चेक असणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे स्पष्ट बोलणारे मित्र जवळ असले पाहिजे. माझ्या आयुष्यात असे अनेक मित्र आहेत. मी स्वत:ही स्पष्टवक्ती आहे. कुणालाच मी कोणत्याही पातळीवर जज करत नाही. त्यामुळे माझ्या आयुष्यातही तसे लोक आले आहेत, असं तिने स्पष्ट केलं.
स्वावलंबी असणं याचा अर्थ…
स्वावलंबी असणं याचा अर्थ असं नाही की मला कुणाची गरज नाही. म्हणजे स्वत:ची काळजी घेऊ शकतो. पण असं नाही की मी आजारी पडल्यावर मला कुणाची गरज नाही. तुम्ही सामाजिक प्राणी आहात ना?त्यामुळे तुम्हाला पावलोपावली कुणाची तरी गरज लागतेच. तुम्हाला मानसिक आणि भावनिक सपोर्ट असेल तरच तुम्ही स्वावलंबी होता, असं ती म्हणते.
