17000 हून अधिक कर्मचारी तैनात, पार्ट्यांवर बारीक नजर, राज्यभरात पोलीस अलर्ट मोडवर..

नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सर्वांमध्ये मोठा उत्साह बघायल मिळतोय. पोलिसांकडूनही जोरदार तयारी करण्यात आली असून पोलिसांची करडी नजर असणार असून मोठा पोलिस बंदोबस्त असणार आहे.

17000 हून अधिक कर्मचारी तैनात, पार्ट्यांवर बारीक नजर, राज्यभरात पोलीस अलर्ट मोडवर..
New Year
| Updated on: Dec 31, 2025 | 11:59 AM

संपूर्ण जग नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सज्ज आहे. देशभरात जोरदार तयारीही सुरू आहे. मुंबईही नवीन वर्षाच्या स्वागतासाठी तयार असून हॉटेल, शॉपिंग मॉल्स येथे खास सजावट करण्यात आली. मुंबई पोलिसांनीही आपली तयारी पूर्ण केली आहे. 31 डिसेंबर 2025 रोजी, नवीन वर्षाच्या स्वागतानिमित्त मुंबईत धार्मिक कार्यक्रमांसोबतच सार्वजनिक ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलंय. मुंबई पोलिसांनी नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येसाठी सुरक्षेची विशेष काळजी घेतली. 10 अतिरिक्त पोलीस आयुक्त, 38 पोलीस उपायुक्त, 61 सहायक पोलीस आयुक्त, 2, 790पोलीस अधिकारी आणि 14,200 पोलीस कर्मचाऱ्यांना तैनात करण्यात आले आहे. रात्रभर पोलिसांचा चाैख बंदोबस्त असणार आहे. यासोबतच शहराच्या संवेदनशील भागात एसआरपीएफ, क्यूआरटी पथके, बीडीडीएस, आरसीपी आणि होमगार्ड्सनाही तैनात करण्यात आली.

31 डिसेंबरच्या रात्री शहराच्या विविध भागांमध्ये नाकाबंदी केली जाईल. पर्यटन स्थळांवर आणि पार्टीच्या ठिकाणांवर पोलिसांची गस्त वाढवली जाईल. मावळत्या वर्षाला निरोप अन् येणाऱ्या वर्षाचे स्वागत करताना थर्टी फर्स्टला गोंदिया जिल्हा पोलिसांचा चोख बंदोबस्त राहणार असून गुन्हेगारांवर करडी नजर ठेवली जाणार आहे. पोलिस अधीक्षक, अपर पोलिस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनात जिल्ह्यातील चार उपविभागांतर्गत 16 पोलिस ठाणे व 11 सशस्त्र दूरक्षेत्र परिसरात कायदा सुव्यवस्था, शांतता अबाधित राहावी याकरिता आवश्यक उपाययोजना करण्याचे व कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाया केल्या जातील.

कार्यालयीन स्तरावर 65 अधिकारी, 750 पोलिस अंमलदारांचा चोख पोलिस बंदोबस्त नेमण्यात आला आहे. उपविभाग गोंदिया, तिरोडा, आमगाव, देवरी अंतर्गत प्रत्येकी एक अधिकारी, 10 अंमलदारांचे स्ट्राइकिंग फोर्स, 10 अंमलदारांचे रिझर्व फोर्स, प्रत्येक ठाणे स्तरावर महत्त्वाच्या चौकात तसेच वर्दळीच्या व गर्दीच्या ठिकाणी पॉईंट, गस्त पेट्रोलिंग, बंदोबस्त व नाकाबंदी केली जाणार आहे.

31 डिसेंबर आणि सांगली महापालिका निवडणुकीच्या आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर सांगली पोलीस अलर्ट मोडवर आहेत. सांगली पोलिसांकडून 31 डिसेंबर आणि सांगली महापालिका क्षेत्रात सुरू असलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात येत आहे. पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्याकडून स्वतः नाकाबंदीची तपासणी करण्यात येत आहे.

शहरात ठीक ठिकाणी सांगली पोलीस दलाकडून नाकाबंदी करत वाहनांची कसून तपासणी करण्यात येत आहे, आचारसंहितेचे काटेकोर पालन आणि 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने हे नाकाबंदी करण्यात येत असल्याची माहिती पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी सांगितली आहे. सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी रत्नागिरी जिल्ह्यात पर्यटकांची मोठी मांदियाळी कोकणात जमली आहे. या पार्श्वभूमीवर वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवणाऱ्यांविरुद्ध रत्नागिरी आरटीओ विभागाने धडक मोहीम हाती घेतली आहे.

मुंबई गोवा महामार्गावर आरटीओ विभागाच्या अधिकाऱ्यांकडून विशेषतः मद्यपान करून वाहन चालवणाऱ्यांची कसून तपासणी केली जात आहे.. त्यासाठी आरटीओची विशेष पथकं देखील तैनात करण्यात आली आहेत. दरम्यान नवीन वर्षाचे स्वागत उत्साहात करा. मात्र रस्त्यावर वाहन चालवताना स्वतःच्या आणि इतरांच्या जिवाची काळजी घ्या. मद्यपान करून वाहन चालवू नका. आनंद साजरा करताना नियमांचे पालन करा आणि सहकार्य करा असं आवाहन आरटीओ विभागाकडून करण्यात आलं आहे..