निलेश घायवळविरोधात सुप्रिया सुळेंची मोठी मागणी, थेट दिल्लीत अमित शाहांना भेटणार

कुख्यात गुंड निलेश घायवळ याने बनावट पासपोर्ट वापरून देशातून पळ काढल्याने राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी या गंभीर प्रकरणाची केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्याकडे सखोल चौकशीची मागणी केली आहे.

निलेश घायवळविरोधात सुप्रिया सुळेंची मोठी मागणी, थेट दिल्लीत अमित शाहांना भेटणार
| Updated on: Oct 12, 2025 | 3:33 PM

कुख्यात गुंड निलेश घायवळ याने बनावट पासपोर्ट तयार करुन देशातून पळ काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेनंतर आता निलेश घायवळप्रकरणी नवनवीन खुलासे होताना दिसत आहेत. सध्या याप्रकरणाचे तीव्र पडसाद उमटताना पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या संपूर्ण प्रकरणाची केंद्रीय स्तरावर सखोल चौकशी करावी, अशी मागणी केली आहे. हे प्रकरण राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित असून मी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्याकडे हा विषय नेणार असल्याचे स्पष्ट मत सुप्रिया सुळेंनी व्यक्त केले.

सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया

सुप्रिया सुळेंनी नुकतंच याप्रकरणी भाष्य केले. यावेळी त्यांनी निलेश घायवळ प्रकरणी सुप्रिया सुळे यांनी चिंता व्यक्त केली. निलेश घायवळ खोटा पासपोर्ट घेऊन या देशातून फरार होऊ शकतो, हे धक्कादायक आणि चिंताजनक आहे. त्यामुळे अर्थातच याबद्दलची चौकशी होईलच. पण मी केंद्र सरकारकडे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत दिल्लीत हा विषय नक्कीच नेणार आहे. दिल्लीतूनही याची सखोल चौकशी झाली पाहिजे. जो कोणी याच्या मागे असेल त्याला अर्थातच शिक्षा झाली पाहिजे. कारण हा राष्ट्रीय सुरक्षेचा विषय आहे. फक्त एका व्यक्तीचा नाही. हे राष्ट्रीय सुरक्षेला घातक आहे, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

रवींद्र धंगेकर काय म्हणाले?

सुप्रिया सुळे यांच्या मागणीचे शिवसेना नेते रवींद्र धंगेकर यांनी समर्थन केले आहे. धंगेकर यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याची जबाबदारी मुख्यमंत्री तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची असल्याचे स्पष्ट केले. ते म्हणाले, “सुप्रिया ताई जे बोलतात ती वस्तूस्थिती आहे. याची नक्कीच काहीतरी चौकशी व्हायला हवी. या प्रकरणाची चौकशी करण्याची जबाबदारी फडणवीसांची आहे. ते ही चौकशी करत नसतील. त्यामुळे ताई वर दिल्लीत अमित शाहांकडे जात असाव्यात, हा त्यांचा कामाचा भाग आहे.” असे रवींद्र धंगेकर यांनी मह्टले.

कसून चौकशी होणार का?

दरम्यान मोक्का लावलेला गुन्हेगार अशाप्रकारे बनावट कागदपत्रांच्या आधारे पासपोर्ट मिळवून परदेशात पळ काढत असेल तर या घटनेमुळे पोलीस यंत्रणा, पासपोर्ट कार्यालय आणि राजकीय संबंधांवर अनेक प्रश्नचिन्हे निर्माण झाली आहेत. सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारकडे केलेल्या मागणीमुळे आता दिल्लीतून या प्रकरणाची कसून चौकशी होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.