ओमराजे निंबाळकरांसाठी पोलीस प्रशासनाचा मोठा निर्णय, आता थेट…
खासदार ओमराजे निंबाळकर यांनी ठाकरे गट सोडून शिंदे गटात प्रवेश निश्चित केला आहे. या राजकीय घडामोडींमुळे निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, पोलीस प्रशासनाने ओमराजेंना Y+ सुरक्षा पुरवत त्यांच्या घराबाहेर बंदोबस्त वाढवला आहे. कुठलाही अनुचित प्रकार टाळण्यासाठी खबरदारी म्हणून हा निर्णय घेण्यात आला असून, दोन दिवसांत अधिकृत प्रवेश अपेक्षित आहे.

खासदार ओमराजे निंबाळकर यांनी ठाकरे गटाशी फारकत घेतली आहे. ठाकरे गटाने बोलवलेल्या संसदीय समितीच्या बैठकीला ओमराजे निंबाळकर उपस्थित नव्हते. त्यामुळे त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. कालच्या शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या मेळाव्यालाही ओमराजे आले नाहीत. यावरून ओमराजे निंबाळकर पक्षच सोडला असल्याचं स्पष्ट झालं आहे. ओमराजेंच्या या निर्णयामुळे शिवसैनिक संतापले आहेत. ठाकरे गटाच्या नेत्यांनीही फुटीरांना धडा शिकवण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे ओमराजेंबाबत काहीही अनुचित प्रकार घडू शकतो. हा प्रकार घडू नये म्हणून पोलीस प्रशासनाने ओमराजेंच्या घरच नाही तर कार्यालयाबाहेरही पोलीस बंदोबस्त वाढवला आहे. पोलीस प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेतला आहे.
धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांना केंद्र सरकारकडून वाय प्लस (Y+) दर्जाची सुरक्षा देण्यात आल्या नंतर धाराशिव तालुक्यातील गोवर्धनवाडी येथील त्यांच्या घरासमोर तसेच धाराशिव शहरातील संपर्क कार्यालयासमोर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दरम्यान, खासदार ओमराजे निंबाळकर हे ठाकरे शिवसेना सोडून शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. या पार्श्वभूमीवर कुठलाही अनुसूचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस विभागाकडून बंदोबस्त लावण्यात आला आहे
वाघ चालला वाघाच्या…
एकीकडे ओमराजे निंबाळकर यांच्या शिंदे गटात प्रवेशाच्या चर्चा तर दुसरीकडे त्यांचे राजकीय विरोधक आणि भाजप आमदार राणाजगजीत सिंह पाटील यांच्या मतदारसंघात तुळजापूर शहरात ओमराजे निंबाळकर यांचे शिंदे शिवसेना पक्षात स्वागताचे बॅनर लागले आहेत. वाघ चालला वाघाच्या कळपात असा मजकूर बॅनरवर लिहिला आहे. शिंदे शिवसेनेचे तुळजापूर तालुकाप्रमुख अमोल जाधव या पदाधिकाऱ्यांनी खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या स्वागताचे बॅनर लावले असून सध्या या बॅनरची जोरदार चर्चा आहे.
दोन दिवसात प्रवेश ?
दरम्यान, ओमराजे निंबाळकर हे येत्या दोन दिवसात शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचं सांगितलं जात आहे. प्रवेशाचा मोठा सोहळा आयोजित केला जाणार असल्याचंही सांगितलं जात आहे. आज ओमराजे यांचे वडील पवनराजे निंबाळकर यांच्या हत्येच्या खटल्याचा निकाल आहे. हा निकाल जाहीर झाल्यावर ओमराजे आपली राजकीय भूमिका जाहीर करणार आहेत. त्यामुळे ओमराजे पहिल्यांदाच काय भूमिका मांडतात आणि काय कारणं देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.