‘गोकुळ’च्या अध्यक्ष निवडीचा वाद दिल्लीत; राहुल गांधींच्या आरोपांना चंद्रशेखर बावनकुळेंडून प्रत्युत्तर, म्हणाले…
'गोकुळ'च्या अध्यक्ष निवडीचा वाद दिल्लीत पोहोचला आहे. राहुल गांधींच्या आरोपांना चंद्रशेखर बावनकुळेंनी प्रत्युत्तर दिलं आहे.

कोल्हापुरात गोकुळच्या निवडणुकीत 13 संचालक निवडून आल्याानंतरही अध्यक्षाचा मान सतेज पाटील यांच्या समविचारी आघाडीला मिळालेला नाही. गोकुळ अध्यक्ष निवडीवरून राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. त्यात सरकारने गोकुळमध्ये 4 शासननियुक्त संचालकांची नियुक्ती केली आहे. गोकुळमधील सरकार हस्तक्षेपाचा वाद दिल्लीतही पोहोचला आहे. लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी मतोचोरीवरून सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप केला. त्यानंतर मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
कोल्हापूरमधील अध्यक्ष निवडीच्या वादावर मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं की, ‘गोकुळचा निर्णय आणि मागणीवर सहकार मंत्री, पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी राज्य सरकारचे पूरक कार्य, गोकुळला केलेली मदत, राज्य सरकारकडून होणारं सहकार्य याकरिता सरकार आणि निवडून आलेली समिती यांचा समन्वय करण्यासाठी निर्णय घेतला असेल’. तर नागपुरातील भाजपच्या लोकशाही बचाव यात्रेवर बावनकुळे म्हणाले, ‘राहुल गांधी आणि इंडिया आघाडीचं षडयंत्र हाणून पाडण्यासाठी आणि जनजागृती करण्यासाठी रॅली आयोजित केली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि हजारो नागरिक रॅलीत येणार आहे. एक ठोस प्रत्युत्तर राहुल गांधींना देणार आहेत’.
राहुल गांधींचा आरोप काय?
राहुल गांधी यांनी आरोप केला की,गोकुळमध्ये दूध उत्पादकांनी भाजपला पराभूत केले. त्यानंतर भाजपने निवडणुकीचे नियमच बदलले. त्यांनी 4 शासननियुक्त संचालक घुसवले. त्यांनी 12 संचालकांची संख्या 16 करत बहुमताची कथित चोरी केली. ही दूध उत्पादकांची चोरी केली. भाजपने लोकांकडून मिळालेल्या जनादेशात भेसळ केली आहे. भाजप इतकी निराश का झाली आहे? सत्ता वाचवण्यासाठी कोणत्याही पातळीवर जात आहेत. दूध उत्पादकांनी मत चोरी करण्यांना लक्षात ठेवावे. शेतकरी विसरत नाही’.
रोहित पवारांची पोस्ट जशीच्या तशी
रोहित पवार म्हणाले, ‘‘गोकुळ’च्या निवडणुकीत साडेपाच लाख सभासदांनी दिलेलं जनमत बाजूला सारून शासकीय सदस्य नेमत गोकुळ ताब्यात घेण्याचा डाव म्हणजे ‘विनाशकाले विपरीत बुद्धी’ असंच म्हणावं लागेल. निकालाच्या दिवशी कोल्हापुरात राहून मिरवणूक काढता आली नाही म्हणून ईगो दुखावला असेल तर मग काय शासकीय सदस्य नेमून लोकमताशी छेडछाड करण्याचा प्रयत्न करणार का? सरकारच्या हा निर्णय म्हणजे अराजकता आहे. गोकुळचा विषय केवळ बंटी पाटील आणि कोल्हापूरपुरता मर्यादित नाही, तर लोकशाही आणि संविधानावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाचा आहे. आज गोकुळमध्ये रडीचा डाव केला उद्या लोकसभा निवडणूक पराभूत झाल्यावर रडीचा डाव खेळतील. त्यामुळं हे असले विषारी साप आताच ठेचले पाहिजेत. ज्या दिवशी अध्यक्ष निवड राहील त्यादिवशी संपूर्ण लोकशाही प्रेमी संविधान प्रेमी नागरिकांनी गोकुळला घेराव घालून जनमताची ताकद मुंबईपासून दिल्लीपर्यंत दाखवून द्यायला हवी. गोकुळचे सभासद आणि बंटी पाटलांसोबत संपूर्ण महाराष्ट्र खंबीरपणे उभा आहे’.
