शेतकऱ्याने जगायचं कसं? 600 किलो कांदा विकला, व्यापाऱ्यानेच वसूल केले 1500, खिसा रिकामाच राहिल्याने डोळ्यात पाणी!

Onion Farmer : गेल्या काही काळापासून कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. आता एका शेतकऱ्याला कांदा विकून व्यापाऱ्यालाच 1500 रुपये द्यावे लागले असल्याचा प्रकार समोर आला आहे.

शेतकऱ्याने जगायचं कसं? 600 किलो कांदा विकला, व्यापाऱ्यानेच वसूल केले 1500, खिसा रिकामाच राहिल्याने डोळ्यात पाणी!
Onion Price Down
Image Credit source: Google
| Updated on: May 25, 2026 | 6:03 PM

कांद्याचा उत्पादन खर्च तर दूरच, पण बाजारात नेण्यासाठी झालेला खर्चही निघत नसल्याने शेतकरी पुन्हा एकदा अडचणीत सापडला आहे. बीड जिल्ह्यातील धारूर तालुक्यातील आरणवाडी येथील शेतकऱ्याला सोलापूर बाजार समितीत कांद्याला अवघा 50 पैसे प्रतिकिलो दर मिळाला. त्यामुळे कांदा विकून नफा तर सोडाच, उलट खिशातूनच पैसे भरावे लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

50 पैसे दर…

आरणवाडी येथील शेतकरी संतोष भास्कर शिनगारे यांनी एका एकरात कांद्याची लागवड केली होती. मोठ्या मेहनतीने कांद्याचे उत्पादन घेतल्यानंतर पावसाळ्यापूर्वी टप्प्याटप्प्याने कांदा विक्री करण्याचा त्यांनी निर्णय घेतला. त्यानुसार 12 गोण्यांमध्ये 602 किलो कांदा भरून सोलापूरच्या कांदा मार्केटमध्ये पाठविण्यात आला.मात्र, बाजारात कांद्याला अवघा 50 पैसे प्रतिकिलो दर मिळाल्याने संपूर्ण कांद्याची विक्री फक्त 301 रुपयांत झाली.

व्यापाऱ्यालाच द्यावे लागले 1500 रुपये

दुसरीकडे गोण्या, वाहतूक, हमाली, तोलाई आणि इतर खर्च मिळून तब्बल 1 हजार 839 रुपये खर्च झाला. त्यामुळे मेहनतीचे पैसे मिळणे दूरच राहिले, उलट शेतकऱ्याला 1 हजार 538 रुपयांचा तोटा सहन करावा लागला. कांद्याच्या दरघसरणीमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून शासनाने तातडीने हस्तक्षेप करून कांद्याला हमीभाव द्यावा, अशी मागणी आता शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

कांदा विक्रीसाठी लागलेला खर्च

  • 12 थैलीची किंमत : 456 रुपये
  • वाहतुक भाडे : 1200 रुपये
  • हमाली : 62 रुपये
  • तोलाई : 37 रुपये
  • स्त्री हमाली : 24 रुपये
  • वारणी : 60 रुपये
  • एकुण खर्च : 1839 रुपये
  • कांदा विक्री रक्कम : 301 रुपये
  • शेतकऱ्याचे नुकसान : 1538 रुपये

याआधीही अशीच घटना

दरम्यान, याआधीही कांद्याला कवडीमोल भाव मिळाल्याचे समोर आले होते. छत्रपती संभाजीनगरमधील एका शेतकऱ्याने तब्बल एक टन कांदा विकला होता, मात्र तरीदेखील त्याच्या खिशात एकही रुपया आला नाही. उलट त्यालाच खिशातून व्यापाऱ्याला एक रुपया द्यावा लागला होता. या शेतकऱ्याने व्यापाऱ्याला 1 टन 2 क्विंटल 62 किलो कांदा विकला. या कांदा विक्रीतून शेतकऱ्याला फक्त 1 हजार 262 रुपये मिळाले. या शेतकऱ्याकडून व्यापाऱ्याने तोलाई, हमाली, भराईचा भाडे लावले. ही रक्कम 1 हजार 263 रुपये होती, त्यामुळे शेतकऱ्याला 1 रूपया द्यावा लागला होता.

Follow Us