Tv9 मराठीचा स्पेशल रिपोर्ट | वॉशिग पावडर गुजरात? विरोधकांची भूमिका सत्ताधारी आमदाराने बजावली
भाजप आमदार रमेश पाटील यांच्या वक्तव्यामुळं त्यांचाच पक्ष अडचणीत आलाय. आमच्याकडे गुजरातची निरमा वॉशिंग पावडर आहे. आम्ही त्या पावरडरमध्ये अनेक नेते स्वच्छ करुन घेतो असं वक्तव्य आमदार पाटील यांनी केलंय. त्यांच्या वक्तव्यावर विरोधी पक्षांनी टीका केलीय.

मुंबई : निरमा वॉशिंग पावडर कपडे साफ करते. पण भाजपकडे असलेली आणि गुजरातवरुन येणारी निरमा वॉशिंग पावडर दुसरंच काहीतरी साफ करते. हे सांगितलंय खुद्द भाजपच्याच एका आमदारानं. रमेश पाटील हे भाजपचे विधानपरिषदेतले आमदार आहेत. सुभाष देसाईंचे पुत्र भूषण देसाईंनी नुकताच शिंदे गटात प्रवेश केलाय. त्यावर रमेश पाटील बोलत होते. भूषण देसाईंवर 400 कोटींच्या घोटाळ्याचे कथित आरोप असल्याचं रमेश पाटलांनीच विधानपरिषदेत सांगून टाकलं. आणि हे सांगताना त्यांनी आमच्याकडे गुजरातची निरमा वॉशिंग पावडर असल्याचंही वक्तव्य केलं.
रमेश पाटलांनी भर विधानपरिषदेत असं वक्तव्य करुन आपल्याच पक्षाला अडचणीत आणलं. कारण पाटलांच्या या वक्तव्यावर विरोधकांनी टीका करण्याची संधी सोडली नाहीच. याआधीही भाजपच्या रावसाहेब दानवेंनी आमच्याकडे गुजरातची पावडर असल्याचं वक्तव्य केलं होतं. पण तेव्हा अखंड शिवसेनेत असलेल्या गुलाबरावांनी त्यावर आक्षेप घेतला होता.सांगलीचे खासदार संजयकाका पाटील आणि हर्षवर्धन पाटलांनीही आपण भाजपमध्ये असल्यामुळं शांत झोप लागत असल्याचं सांगून टाकलं होतं. सत्ताधारी केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करुन विरोधकांना जेरीस आणतात असा आरोप विरोधी बाकांवरच्या सदस्यांनी अनेक वेळा केलाय. भास्कर जाधवांनी तर याची यादीच सभागृहात वाचली होती.
शिवसेनेत असताना प्रताप सरनाईक, भावना गवळी, यशवंत जाधव, यामिनी जाधव यांच्यावर किरीट सोमय्यांनी आरोप केले होते. पण हे नेते शिंदे गटात गेल्यावर सोमय्यांनी आरोपांची मालिका सोडून दिली असं बोललं जातंय. नारायण राणेंवरही किरीट सोमय्यांनी आरोपांची राळ उठवून दिली होती. पण राणे भाजपवासी झाले आणि त्यानंतर त्यांच्यामागचाही चौकशीचा ससेमिरा थांबला असं विरोधक सांगतायत.विरोधकांच्या या आरोपांना बळ देणारं वक्तव्य आता सत्ताधारी पक्षाच्याच एका आमदारानं केलंय. आणि तेही भर सभागृहात. विरोधकांची भूमिका एका सत्ताधारी आमदारानं अगदी चोख बजावलीय.
रमेश पाटील नेमकं काय म्हणाले?
“तिथे काय केलं ते आम्हाला माहिती नाही. कुणीतरी सांगितलं की 400 कोटींच्या एमआयडीसीच्या प्लॉटची फाईल आहे म्हणून ते इथे आले आहेत. पण त्यासाठी ते इथे आलेले नाहीत. हे सरकार चांगलं काम करतंय आणि चांगला न्याय देतंय म्हणून ते इथे आले आहेत”, असा दावा रमेश पाटील यांनी केला. रमेश पाटील एवढंच बोलून थांबले नाहीत. त्यापुढेही ते बोलू लागले. “खरं म्हणजे आमच्याकडे निरमा वॉशिंग पावडर आहे आणि ते गुजरातहून येतं. त्यामुळे आम्ही साफसफाई करुन जो माणूस आमच्याकडे जो माणूस येईल तो माणूस स्वच्छ होणार आहे”, असं रमेश पाटील म्हणाले.
