Amit Shah | मुस्लिम आरक्षण ते ट्रिपल तलाक, अमित शाह यांचे उद्धव ठाकरे यांना नांदेडमधून 4 सवाल

| Updated on: Jun 10, 2023 | 8:17 PM

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज नांदेडमध्ये जाहीर सभेतून उद्धव ठाकरे यांना चार प्रश्न विचारले. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली. भाजपने शिवसेनेला दगा दिला नाही तर उद्धव ठाकरे यांनी भाजपला दगा दिला, असा दावा अमित शाह यांनी यावेळी केला.

Amit Shah | मुस्लिम आरक्षण ते ट्रिपल तलाक, अमित शाह यांचे उद्धव ठाकरे यांना नांदेडमधून 4 सवाल
Follow us on

नांदेड : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची नांदेडमध्ये आज जाहीर सभा झाली. या सभेत अमित शाह यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना काही प्रश्न विचारत चौफेर टीका केली. उद्धव ठाकरे म्हणतात की, भाजपने आपलं सरकार पाडलं. पण ते तसं नाहीय. खरा दगा हा तर उद्धव ठाकरे यांनी भाजपला दिला आहे, अशी टीका अमित शाह यांनी केली. उद्धव ठाकरे हे सत्तेसाठी काँग्रेस, राष्ट्रवादीच्या मांडीवर जावून बसले, असाही घणाघात त्यांनी केला. यावेळी अमित शाह यांनी उद्धव ठाकरे यांना उद्देशून 4 महत्त्वाचे सवाल केले.

“मी भाजपचा अध्यक्ष होतो. मी आणि देवेंद्र फडणवीस उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी गेलो होतो. बहुमत एनडीएला मिळालं तर देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील, असं उद्धव ठाकरे यांनी मान्य केलं होतं. पण जेव्हा निवडणुकीचे निकाल समोर आले तेव्हा त्यांनी दिलेलं वचन तोडलं. सत्तेसाठी ते काँग्रेस आणि एनसीपीच्या मांडीवर जावून बसले”, अशी टीका अमित शाह यांनी केली.

“मी उद्धव ठाकरे यांना विचारु इच्छितो, हिंमत असेल तर आपली भूमिका स्पष्ट करा. ट्रिपल तलाक हटवण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला. त्यावर आपण सहमत आहात का नाही? अयोध्येत राम मंदिर बांधलं जात आहे. त्यावर तुम्ही सहमत आहात की नाहीत? राम जन्मभूमीवर मंदिर बनलं पाहिजे की नाही? भाजपचे अनेक सरकार कॉमन सिव्हिल कोर्ट आणण्याचा विचार करत आहे. तुम्ही तुमची भूमिका स्पष्ट करा तुम्हाला कॉमन सिव्हिल कोर्ट हवं की नको?”, असे प्रश्न अमित शाह यांनी ठाकरेंना विचारले.

अमित शाह यांचे उद्धव ठाकरेंना 4 सवाल

“मी उद्धव ठाकरे यांना विचारु इच्छितो की, मुस्लिम आरक्षणात व्हायला नको. मुस्लिम आरक्षणाला संविधानाची संमती नाही. धर्माच्या मुद्द्यावरुन आरक्षण मिळू शकत नाही. उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या जनतेला सांगावं की, मुस्लिम आरक्षण हवं की नको? मी उद्धव ठाकरे यांना विचारु इच्छितो की, कर्नाटकात ज्यांचं सरकार बनलं त्यांच्यासोबत तुम्ही आहात. ते वीर सावरकर यांचा धडा पाठ्यपुस्तकातून काढू इच्छितात. त्यावर आपण सहमत आहात की नाहीत?”, असा सवाल अमित शाह यांनी केला.

शाह यांची ठाकरेंवर सडकून टीका

“उद्धव जी तुम्ही दोन जहाजांवर तरंगू शकत नाहीत. महाराष्ट्राच्या जनतेसमोर मी जे प्रश्न उपस्थित केले आहेत त्यावर उत्तर द्या. त्यातून महाराष्ट्राच्या जनतेसमोर तुमची पोलखोल होईल”, अशी टीका शाह यांनी केली.

“उद्धव ठाकरे म्हणतात की आम्ही त्यांचं सरकार तोडलं. आम्ही नाही तोडलं. उद्धवजी शिवसैनिक आपल्या शिवसेनाविरोधातील भूमिकेमुळे त्रस्त झाला होता. शिवसैनिक शरद पवार यांच्या नीतीसोबत चालायला तयार नव्हता. त्या लोकांनी तुमचा पक्ष सोडला आणि तुमचं सरकार पडलं. दगा देण्याचं काम उद्धव ठाकरे यांनी केलं. भाजपसोबत निवडणूक लढवली आणि मुख्यमंत्रीपदासाठी काँग्रेसच्या मांडीवर जावून बसले”, अशा शब्दांत अमित शाह यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली.