बापरे, अकोल्यात कमोडमध्ये काळ्या नागाचा विळखा, टॉयलेटमध्ये साप आढळल्याने एकच खळबळ
Akola Cobra Found in Toilet Commode: अकोल्यात थेट घरातील टॉयलेटमध्ये नाग आढळल्याने खळबळ उडाली. कमोडमध्ये काळ्या नागाचा विळखा दिसून आला. दुष्काळी स्थिती थंड ठिकाण्याच्या शोधात साप आता मानवी वस्तीकडे वळल्याने चिंता व्यक्त होत आहे. तर रात्री काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे

गणेश सोनोने, प्रतिनिधी, टीव्ही 9 मराठी: अकोल्यातील एका घरातील टॉयलेटमध्ये नाग आढळल्याने नागरिकांमध्ये खळबळ उडाली. कमोडमध्ये काळ्या नागाचा विळखा दिसून आला. रात्री हा प्रकार समोर आला. तातडीने सर्पमित्राला बोलावण्यात आले. दुष्काळी स्थिती थंड ठिकाण्याच्या शोधात साप आता मानवी वस्तीकडे वळल्याने चिंता व्यक्त होत आहे. तर रात्री घरातील किचन, व्हरांडे आणि टॉयलेटमध्ये जाताना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. नवीन वसाहतीतील नागरिकांनी सतर्क राहण्याचेही आवाहन सर्पमित्रांनी केले आहे.
वेळीच प्रकार लक्षात आला
अकोल्यात चक्क घरातील कमोडमध्ये काळ्या नागाने ठाण मांडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तर सुधीर कॉलनी परिसरातील कांडेकर यांच्या घरात रात्री दहाच्या सुमारास हा विषारी नाग कमोडमध्ये आढळून आला असून सुदैवाने वेळीच हा प्रकार लक्षात आल्याने मोठा अनर्थ टळला. वॉशरूममधील लाईट लावल्यानंतर आणि टॉयलेटमधून आवाज येत असल्याने तसेच शेपूट दिसल्याने सदस्य सतर्क झाले. त्यांनी सर्पमित्राला लागलीच संपर्क केला.
दुष्काळी परिस्थितीचा फटका
दरम्यान, दुष्काळी परिस्थितीमुळे पाणी आणि थंड जागेच्या शोधात सरपटणारे वन्यजीव आता मानवी वस्तीकडे धाव घेत असल्याचं सर्पमित्रांचं म्हणणं आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण असून आगामी काळात सर्पमित्र आणि वनविभागासमोर वन्यजीवांच्या रेस्क्यूचं मोठं आव्हान उभं राहण्याची शक्यता आहे.
नोव्हेंबर महिन्यात साधारणपणे साप दिसण्याचे प्रमाण कमी अते. पण यंदा दुष्काळी परिस्थिती असल्याने सरपटणारे प्राणी थंड जागेच्या आणि पाण्याच्या शोधात मानवी वस्त्यांकडे येत आहेत. जमिनीचे तापमान वाढलेले असताना नैसर्गिक अधिवासात पाणी आणि थंडाव्याच्या शोधात हे प्राणी मानवी वस्तीकडे येते आहेत. यामुळे शहरालगत, गाव, वस्ती आणि वाड्यांच्या आसपास नाग, घोषण आणि अजगरही मानवी वस्त्यांकडे येत असल्याचे चित्र आहे. जलस्त्रोत आटल्याने साप, नाग आणि अजगर यांचा नैसर्गिक आधिवास धोक्यात आला आहे. अनेक गावं आणि शहरी वस्त्यांमध्ये अजगर आढळण्याचे प्रमाणही वाढले आहे, असे सर्पमित्रांचे निरीक्षण आहे.