अमित शहा यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादीच्या नेत्यांचं खलबतं, बैठकीत सुनेत्रा पवार का नव्हत्या? माजी मंत्र्याने सांगितलं कारण
अमित शहा यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत सुनेत्रा पवार नव्हत्या. त्या बैठकीला का नव्हत्या, याचे कारण आता समोर आलं आहे.

सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही वरिष्ठ नेत्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार देखील नव्हत्या. पक्षातील दोन वरिष्ठ नेत्यांची गैरहजेरीमुळे ज्येष्ठ नेत्यांच्या नाराजीची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. परंतु सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीत कुणीही नाराज नाही, असं स्पष्टीकरण माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी सांगितलं.
अमित शहा यांच्या भेटीच्या चर्चेवर माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी भाष्य केलं. राजकुमार बडोले म्हणाले, ‘अर्थखातं राष्ट्रवादीला मिळायला हवं. विविध प्रश्न घेऊन आमचे नेते अमित शहा यांना भेटले. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार इतर कामात व्यस्त होत्या म्हणून त्या काल अमित शहा यांना भेटायला गेल्या नव्हत्या. राष्ट्रवादीत सर्व काही आलबेल आहे. कुणाचीही नाराजी नाही. आज आमदारांची नियोजीत बैठक बोलावली. अजितदादा यांच्या पासून ही परंपरा सुरू आहे’.
उमेश पाटील काय म्हणाले?
सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील म्हणाले, ‘आमचे वरिष्ठ नेते अमित शहा यांना भेटले. 19 आणि 21 ऑक्टोबर रोजी सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांनी अमित शाह यांची भेट घेतली होती. पक्षाच्या अनुषंगाने आणि राज्याच्या काही प्रश्नांवर चर्चा झाली. अजितदादा एनडीएमध्ये सहभागी होताना पक्षातील प्रमुख नेते साक्षीदार आहेत, त्यांना तपशील माहीत आहे. त्यामुळे वरिष्ठ नेत्यांना काही गोष्टी माहीत आहे, ते बैठकीत आहे. मात्र चुकीच्या पद्धतीने बातम्या चालल्या आहेत. परंतु सातत्याने या चर्चा पक्षाला हानी पोचवतात. त्यामुळे खातरजमा केल्याशिवाय बातम्या देऊ नये’.
‘महत्त्वाच्या विषयाव्यतिरिक्त अशी भेट होणार नाही. काही राज्याचे, दुष्काळाचे आणि NCP घटक पक्ष असताना काही ठिकाणी येणाऱ्या अडचणींमध्ये केंद्रातील नेत्यांनी मार्ग काढावा. अनेकदा दोन किंवा तीन पक्ष एकत्र असताना काही अडचणी येतात. अनेक ठिकाणी काही विषय असतात. केंद्रातील नेत्यांनी हस्तक्षेप करावा, यासाठी आम्ही भेटतो, असे ते पुढे म्हणाले.
