पाच मुलींचा पार्थिवाला खांदा, लाडक्या पित्याला लेकींचा अखेरचा निरोप

| Updated on: Jun 14, 2021 | 8:31 AM

हिंदू परंपरेनुसार घरातील मुलांनी खांदा देण्याची रित आहे, मात्र लक्ष्मणराव इंगळे यांची दोन्ही मुले हयात नसल्यानं ते कर्तव्य पाच मुलींनी बजावले

पाच मुलींचा पार्थिवाला खांदा, लाडक्या पित्याला लेकींचा अखेरचा निरोप
पाच मुलांचा वडिलांच्या पार्थिवाला खांदा
Follow us on

वाशिम : वाशिम जिल्ह्यातील धोत्रा माळी येथील लक्ष्मणराव इंगळे यांच्या पार्थिवाला पाच मुलींनी खांदा दिला. दोन्हीही मुलांचं निधन झाल्यामुळे लेकींनी मुलाचा वारसा राखला. मगरुळपीर तालुक्यात धोत्रा माळी येथील लक्ष्मणराव इंगळे यांचे वृद्धापकाळाने निधन झाले, मात्र दोन्ही मुलं वारल्यामुळे जुन्या परंपरेला फाटा देत वडिलांच्या अंत्यविधीला त्यांच्या लेकींनी खांदा देऊन मुलाची कमतरता भरुन काढली. त्यांच्या या कार्यामुळे एक नवीन विचारधारा उदयास आली आहे. (Five Daughters perform last rites of father in Washim)

 85 व्या वर्षांपर्यंत सायकलनेच प्रवास

वाशिम जिल्ह्यातील धोत्रा माळी येथील लक्ष्मण इंगळे हे ज्येष्ठ समाजसेवक होते. त्यांच्या मृत्यूमुळे एका सेवाभावी वृत्तीच्या व्यक्तीला धोत्रा गावकरी मुकले आहेत. लक्ष्मणराव इंगळे यांना दोन मुलं आणि 8 मुली. त्यांनी सर्व मुलींना सुशिक्षित केलं. परिसरातील कोणत्याही सामाजिक आणि धार्मिक कार्यात ते कायम अग्रेसर राहत होते. ते शेतकरी कुटुंबातील असल्यानं त्यांची शेतीशी कायम नाळ जोडलेली होती. ते भाजीपाला आणि दुग्ध व्यवसाय करत. भाजीपाला आणि दूध विक्रीसाठी ते नित्याने मंगरुळपिर इथं जात असत. त्यांनी आपल्या वयाच्या 85 वर्षांपर्यंत धोत्रा ते मंगरुळपिर असा प्रवास आपल्या सायकलनेच केला. त्यामुळे ते शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या तंदुरुस्त होते.

कठीण काळातही कुटुंबाचा आधार

लक्ष्मणराव इंगळे यांनी आपल्या आयुष्यात अनेक चढउतार पाहले मात्र ते कधीही डगमगले नाहीत. त्यांच्या 8 मुलींपैकी 2 मुली आणि दोन्ही मुलांचं अकाली निधन झालं. त्याअगोदर त्यांच्या पत्नी अलोका यांनीही अकाली जगाचा निरोप घेतला होता. मात्र लक्ष्मणराव इंगळे परिस्थितीसमोर झुकले नाहीत. त्यांनी मुलांना आईची कमतरता भासू दिली नाही. लक्ष्मणराव इंगळे यांचं वयाच्या 95 व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झालं.

पाच मुलींचा वडिलांना खांदा

हिंदू परंपरेनुसार घरातील मुलांनी खांदा देण्याची रित आहे, मात्र लक्ष्मणराव इंगळे यांची दोन्ही मुले हयात नसल्यानं ते कर्तव्य चंदाताई क्षीरसागर, नंदिनी निलखन, नलिनी राऊत, विजया निमनेकर आणि बबिता घाटे या त्यांच्या पाच मुलींनी पार पाडले. लक्ष्मणराव इंगळे यांच्या मुलींचा कित्ता इतरही मुलींनी गिरवण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

बीडमध्ये चार सुनांचा सासूला खांदा

बीड शहरातील काशिनाथ नगर येथे वास्तव्यास असणाऱ्या सुंदरबाई नाईकवाडे यांचं वयाच्या 80 व्या वर्षी निधन झालं. त्यांच्या पश्चात चार मुलं आणि दोन मुली आहेत. मात्र सासरी असताना कधीच माहेरची आठवण येऊ न दिल्याने या सुनांनी आपल्या लाडक्या सासूला खांदा देऊन अखेरचा निरोप दिला होता.

संबंधित बातम्या :

बारा मुलींचा पार्थिवाला खांदा, लाडक्या पित्याला लेकींचा अखेरचा निरोप

आईसारखं सांभाळलेल्या सासूचं निधन, चार सुनांनी स्वतः खांदा दिला

(Five Daughters perform last rites of father in Washim)