82 वर्षाच्या नेत्याचा बीआरएसमध्ये प्रवेश, नगर जिल्ह्याच्या राजकीय समीकरणांचा विचका; कुणाचा डाव उधळला जाणार?

एकीकडे राज्यात राष्ट्रवादी, शिवसेनेत अंतर्गत संघर्ष सुरू आहे. राज्यातील राजकीय परिस्थिती सतत बदलत असताना BRS मुळे एक नवा पर्याय समोर येत आहे.

82 वर्षाच्या नेत्याचा बीआरएसमध्ये प्रवेश, नगर जिल्ह्याच्या राजकीय समीकरणांचा विचका; कुणाचा डाव उधळला जाणार?
bhanudas murkute
Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Aug 13, 2023 | 8:32 AM

नगर | 13 ऑगस्ट 2023 : अहमदनगरमधील दिग्गज नेते आणि श्रीरामपूरचे माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्यासह नगर जिल्ह्यातील 35 सरपंचांनी तेलंनाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या बीआरएस या पक्षात प्रवेश केला आहे. वयाच्या 82 व्या वर्षी मुरकुटे यांनी दुसरी राजकीय इनिंग सुरू केली आहे. त्यामुळे नगर जिल्ह्यातील राजकीय समीकरणांचा विचका होणार आहे. मुरकुटे हे नगरमधून लोकसभा निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. त्यामुळे त्याचा फटका भाजपचे खासदार सुजय विखे पाटील यांना बसण्याची शक्यता आहे. मुरकुटे हे मैदानात उतरल्याने केवळ लोकसभाच नव्हे तर विधानसभेतही त्यांच्यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांना फटका बसू शकतो, असं राजकीय सूत्रांचं म्हणणं आहे.

राज्यातील अनेक नेत्यांनी बीआरएसची वाट धरली आहे. अहमदनगर जिल्हयातील सहकारातील दिग्गज नेते त‌सेच श्रीरामपुरचे माजी आमदार भानुदास मुरकूटे यांनी तेलंगणा येथे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या उपस्थित बीआरएसमध्ये प्रवेश केला आहे. अशोक सहकारी कारखान्याचे संचालक, विविध कार्यकारी सोसायटींचे पदाधिकारी तसेच 35 हून अधिक सरपंचांनी देखील बीआरएसचा झेंडा हाती घेतला आहे. त्यामुळे जिल्हयात बीआरएसची ताकद अधिकच वाढली आहे.

श्रीरापूरमधील ग्रामपंचायतींवर वर्चस्व

काही दिवसांपूर्वी सोलापूर जिल्ह्यातील अनेक माजी सरपंच उपसरपंचांनी थेट तेलंगणात जात बीआरएसमध्ये प्रवेश केला. आता अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातीलही अनेक सरपंच बीआरएसमध्ये सामिल झाले आहेत. राष्ट्रवादी आणि शिवसेना असा राजकीय प्रवास केलेले श्रीरामपूरचे माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी नुकताच बीआरएसमध्ये प्रवेश केला आहे.

तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शंभरहून अधिक कार्यकर्त्यांसह त्यांनी हा प्रवेश केलाय. श्रीरामपूर तालुक्यातील 70 टक्के ग्रामपंचायतींवर आपलं राजकीय वर्चस्व असून 35 हून अधिक सरपंच हे बीआरएसमध्ये सामिल झाल्याचे मुरकुटे यांनी म्हटलंय.

आधी कामे पाहिली, मगच पक्षप्रवेश

पक्षात प्रवेश दिल्यावर पैसे दिले जातात हा अपप्रचार केला जात असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. तेलंगणातील विकास कामे आधी पाहण्यासाठी गेलो. त्यानंतर कार्यकर्त्यांनाही दाखवली आणि मगच बीआरएसमध्ये जाण्याचा निर्णय घेतल्याच भानुदास मुरकूटे यांनी स्पष्ट केलं.

मुरकुटेंच्या पाठी उभे राहणार

दरम्यान, श्रीरामपूर तालुक्यातील अनेक सरपंच भानुदास मुरकुटे यांच्या निर्णयाबरोबर असून त्यांच्या पाठीशी राहणार आहेत. आम्ही अनेकजण तेलंगाणा राज्यात जाऊन आलो. तिथे सुरू असलेली विकास कामे आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी असलेल्या योजना खूप महत्वाच्या आहेत. तेथील सुरु असलेल्या योजना आपल्याकडे सुरू व्हाव्यात यासाठी भविष्यात काम करणार असल्याचं सरपंच गणेश भाकरे आणि गणेश छल्लारे यांनी सांगितलं.

एकीकडे राज्यात राष्ट्रवादी, शिवसेनेत अंतर्गत संघर्ष सुरू आहे. राज्यातील राजकीय परिस्थिती सतत बदलत असताना BRS मुळे एक नवा पर्याय समोर येत आहे. त्यातच ग्रामीण भागातून BRS ला वाढणार समर्थन पाहिलं तर आगामी काळात महाविकास आघाडी आणि महायुतीच्या विरोधात BRS हा मोठा पर्याय ठरणार का हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय.