मोठी बातमी ! खासदार अमोल कोल्हे जखमी; ‘शिवपुत्र संभाजी’ महानाट्यावेळी घोड्यावरून एन्ट्री घेताना काय घडलं?

| Updated on: May 01, 2023 | 8:02 AM

प्रसिद्ध अभिनेते आणि खासदार अमोल कोल्हे हे शिवपुत्र संभाजी हे नाटक करताना जखमी झाले आहेत. घोड्यावरून एन्ट्री घेताना पाठीत जर्क बसून कळ आल्याने त्यांना पाठीत वेदना होत आहेत. त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला आहे.

मोठी बातमी ! खासदार अमोल कोल्हे जखमी; शिवपुत्र संभाजी महानाट्यावेळी घोड्यावरून एन्ट्री घेताना काय घडलं?
amol kolhe
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

कराड: अभिनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे हे जखमी झाले आहेत. शिवपुत्र संभाजी महानाट्याच्या प्रयोगावेळी घोड्यावर बसून एन्ट्री घेत असतानाच अमोल कोल्हे यांना दुखापत झाली आहे. त्यामुळे त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे. मात्र, डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला आहे. त्यामुळे अमोल कोल्हे यांचे या महानाट्याचे पुढील सर्व प्रयोग रद्द करण्यात आले आहेत.

छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका जिवंत करणाऱ्या डॉ. अमोल कोल्हे यांच्या पाठीला घोड्यावरुन एन्ट्री घेताना दुखापत झाली आहे. दुखापत झाली असली तरी केवळ महाराष्ट्राचा स्थापना दिन असल्याने आजचा ‘शिवपुत्र संभाजी’ महानाट्याचा कराडमधील प्रयोग होणार असून उर्वरित दोन्ही प्रयोग रद्द करण्यात आले आहेत. कराडमधील कल्याणी मैदानावर 28 एप्रिलपासून ‘शिवपुत्र संभाजी’ या महानाट्याचे प्रयोग सुरू आहेत.

हे सुद्धा वाचा

पाठीत कळ आली

कालच्या प्रयोगादरम्यान संभाजी महाराजांच्या वेषातील डॉ. कोल्हे घोड्यावरुन एन्ट्री घेत असताना घोड्याचा मागील पाय अचानक दुमडला आणि त्यामुळे पाठीला जर्क बसून त्यांच्या मणक्याला दुखापत झाली. पाठीत कळ आल्याने त्यांना तात्काळ घोड्यावरून उतरवण्यता आले. मात्र त्या परिस्थितीतही डॉ. कोल्हे यांनी वेदनाशामक औषधे घेऊन चेहऱ्यावर दुखापतीचा भाव उमटू न देता जिद्दीने प्रयोग सादर केला. मात्र, डॉक्टरांनी विश्रांती करण्याचा सल्ला दिल्याने कोल्हे यांचे उर्वरीत प्रयोग रद्द करण्याची परिस्थिती निर्माण झाली.

दोन्ही प्रयोग रद्द

दरम्यान, आज 1 मे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन आहे. या दिवसाचे औचित्य आणि महत्व वेगळं आहे. त्यामुळे दुखापत झाली असली तरी आजचा प्रयोग करण्याचा निर्धार डॉ. अमोल कोल्हे यांनी व्यक्त केला आहे. दुखापत असतानाही कराडच्या कल्याणी मैदानात अमोल कोल्हे आजचा प्रयोग करणार आहेत. मात्र उर्वरीत दोन्ही प्रयोग रद्द करण्यात आले आहेत.

मुंबईत उपचार घेणार

पाठीच्या मणक्याला दुखापत झाल्याने पाठीतून तीव्र कळा जाणवत आहेत. त्यामुळे आजचा प्रयोग संपल्यावर मुंबईत जाऊन उपचार घेणार आहे, असं अमोल कोल्हे यांनी सांगितलं. पुरेशी विश्रांती व उपचार घेऊन पिंपरी चिंचवड येथील एच. ए. मैदानावर 11 ते 16 मे कालावधीत होणारे ‘शिवपुत्र संभाजी’महानाट्याचे प्रयोग ठरल्याप्रमाणे होतील, असेही अमोल कोल्हे यांनी सांगितले.