शरद पवार यांचं ते विधान ज्यामुळे प्रकाश आंबेडकर यांचं टेन्शन वाढवणार?; पवार असं काय म्हणाले?

| Updated on: Jan 28, 2023 | 9:49 AM

जागा वाटपाची वेळच आली नाही. अजून अवकाश आहे. आमची आंबेडकरांशी चर्चा झालेली नाही. जिथं चर्चा नाही, तिथे हरकतीचा प्रश्न येतोच कुठे? ज्या आघाडीच्या संबंधीचा प्रस्ताव आमच्याकडे आला नाही.

शरद पवार यांचं ते विधान ज्यामुळे प्रकाश आंबेडकर यांचं टेन्शन वाढवणार?; पवार असं काय म्हणाले?
prakash ambedkar
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

कोल्हापूर: प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडी आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची युती झाली आहे. आंबेडकर यांचा महाविकास आघाडीत समावेश झालेला नाही. आमच्यासोबत येण्याबाबतचा आंबेडकर यांचा कोणताही प्रस्ताव आला नसल्याचं काँग्रेस आणि राष्ट्रवादीने स्पष्ट केलं आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही प्रकाश आंबेडकर यांच्याशी चर्चा झाली नसल्याचं सांगितलं. आघाडीत येण्याबाबतचा आंबेडकर यांचा प्रस्तावही आला नसल्याचं पवारांनी स्पष्ट केलं. तसेच आमच्या आजवर ज्या चर्चा झाल्यात त्यानुसार ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक लढणार असल्याचं ठरलं आहे, असं पवार यांनी स्पष्ट केलं आहे. पवारांच्या या विधानामुळे आंबेडकर यांचं टेन्शन वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन पत्रकारांच्या विविध प्रश्नांची उत्तरे दिली. तुमच्यावरून ठाकरे गट आणि आंबेडकर यांच्यात वाद असल्याचं चित्रं आहे, याकडे शरद पवार यांचं लक्ष वेधलं. त्यावर पवार यांनी थेट उत्तर दिलं. त्या दोघात वाद आहे की नाही, हे मला माहीत नाही, असं शरद पवार यांनी स्पष्ट केलं.

हे सुद्धा वाचा

त्या चर्चेत आम्ही नव्हतो

ठाकरे गट आणि वंचित यांच्या चर्चेत आम्ही कुठे नव्हतो. आमच्या ज्या चर्चा झाल्या त्यात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेना या सर्वांनी एकत्र निवडणुकीला सामोरे जावं अशी आमची मानसिकता आहे. तो प्रयत्न आम्ही सुरू ठेवणार आहोत.

महाविकास आघाडीने एकत्र जाण्याची स्पष्टता आहे. या पुढचे निर्णय कसे घ्यायचे याचा संवाद सुरू आहे, असं पवार यांनी सांगितलं. यावेळी पवार यांनी वंचितचा उल्लेख केला नाही. त्यामुळे तर्कवितर्क लढवले जात आहेत.

प्रस्ताव आलाच नाही

जागा वाटपाची वेळच आली नाही. अजून अवकाश आहे. आमची आंबेडकरांशी चर्चा झालेली नाही. जिथं चर्चा नाही, तिथे हरकतीचा प्रश्न येतोच कुठे? ज्या आघाडीच्या संबंधीचा प्रस्ताव आमच्याकडे आला नाही. त्यामुळे त्यांना स्वीकारायचं की स्वीकारायचं नाही हा प्रश्न येतच नाही, असंही त्यांनी सांगितलं.

ऑथेंटिक माहिती नाही

लोकसभा आणि महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका एकत्र घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. तशी चर्चा आहे. त्यावर आपलं काय मत आहे? असा सवाल पवार यांना विचारण्यात आला. त्यावर लोकसभा आणि विधानसभा एकत्र होतील असं काही लोकांचं मत आहे. पण त्याची ऑथेंटिक माहिती माझ्याकडे नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.