सलग दुसऱ्या वर्षी नवरात्र उत्सव भाविकांविनाच, तुळजापूरसह उस्मानाबादमध्ये भाविकांना प्रवेशबंदी

| Updated on: Sep 23, 2021 | 7:22 PM

महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेचे शारदीय नवरात्र उत्सव साधेपणाने भक्ताविना साजरा होणार होणार आहे. नवरात्र काळात उस्मानाबाद जिल्ह्यात व तुळजापूर शहरात भाविकांना प्रवेश बंदी असणार आहे.

सलग दुसऱ्या वर्षी  नवरात्र उत्सव भाविकांविनाच, तुळजापूरसह उस्मानाबादमध्ये भाविकांना प्रवेशबंदी
तुळजापूर
Follow us on

उस्मानाबाद: महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेचे शारदीय नवरात्र उत्सव साधेपणाने भक्ताविना साजरा होणार होणार आहे. नवरात्र काळात उस्मानाबाद जिल्ह्यात व तुळजापूर शहरात भाविकांना प्रवेश बंदी असणार आहे.नवरात्र काळात भक्तांना प्रवेश नसला तरी देवीच्या सर्व धार्मिक विधी अलंकार पूजा या विधीवत होणार आहेत. जिल्हाधिकारी, पोलीस प्रशासन, मंदिराचे प्रतिनिधी यांच्या उपस्थिती झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

50 जणांना धार्मिक विधीसाठी प्रवेश

तुळजाभवानी मंदिरात केवळ 50 जणांना धार्मिक विधीसाठी मिळणार प्रवेश आहे. लसीकरण केलेलं असेल तरच त्या पुजाऱ्याना प्रवेश मिळणार आहे. उस्मानाबाद जिल्हाधिकारी , पोलीस अधीक्षक व पुजारी मंडळ यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. नवरात्र उत्सवात देवीचे महंत,सेवेकरी,पुजारी व इतर मानकरी यांनाच प्रवेश मिळणार आहे.

भाविकांनी तुळजापूरमध्ये येऊ नये

कोविडच्या नियमानुसार तुळजाभवानी देवीच्या सर्व पूजा , अलंकार व विधी होणार आहेत. नवरात्र काळात भाविकांनी प्रवेश करू नये यासाठी उस्मानाबाद जिल्हा प्रवेश बंदी असणार आहे. तुळजापूर शहराच्या सर्व प्रवेशावर पोलीस बंदोबस्त असणार आहे. नवरात्र काळात अनेक भाविक मशाल घेऊन व पायी चालत दर्शनासाठी येतात. मात्र, त्यांना प्रवेश बंदी असणार आहे त्यामुळे भाविकांनी तुळजापूर शहरात येऊ नये व ऑनलाईन दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे.

तुळजापूर शहरामध्ये महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगणा या भागातून मोठ्या प्रमाणात भाविक तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी येत असतात. कोरोना संकटामुळे तुळजापूर प्रवेशबंदी असल्याने याची माहिती शेजारील राज्यांना दिली जाणार आहे.

जिल्हाधिकारी नेमकं काय म्हणाले?

शारदीय नवरात्रोत्सव हा उस्मानाबाद जिल्ह्यासाठी मानबिंदू आहे. तुळजापूरमधील मंदिराचे पुजाही, पोलीस अधीक्षक, नगराध्यक्ष यांची बैठक घेण्यात आली. गेल्यावर्षी प्रमाणं यंदाही तुळजाभवानी मंदिरातील शारदीय नवरात्रोत्सव साधेपणानं साजरा करण्याचं ठरलं आहे. शारदीय नवरात्रोत्सवाची एक हजार वर्षांची परंपरा खंडित होणार नाही. त्यासाठी 50 पुजाऱ्यांचं लसीकरण करण्यात आलंय का हे पाहून त्यांना परवानगी दिली जाईल, असंही जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी म्हटलं आहे.

पोलीस अधीक्षक निवा जैन काय म्हणाल्या?

नवरात्र काळात भाविकांनी प्रवेश करू नये यासाठी उस्मानाबाद जिल्हा प्रवेश बंदी असणार तसेच तुळजापूर शहराच्या सर्व प्रवेशावर पोलीस बंदोबस्त असणार आहे. नवरात्र काळात अनेक भाविक मशाल घेऊन व पायी चालत दर्शनासाठी येतात मात्र त्यांना प्रवेश बंदी असणार आहे त्यामुळे भाविकांनी तुळजापूर शहरात येऊ नये व ऑनलाईन दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन पोलीस अधीक्षक निवा जैन यांनी केले आहे.

29 सप्टेंबर ते 21 ऑक्टोबर दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रम परंपरेनुसार आयोजित करण्यात आले आहेत त्यानुसार नगर परिषद प्रशासन शहरात स्वच्छता , बॅरिगेटिंग व कोरोना अनुषंगाने फवारणी करनार असल्याची माहिती नगराध्यक्ष सचीन रोचकरी यांनी दिली.

७ ऑक्टोंबर रोजी देवीच्या मूर्तीची सिंहासनावर प्रतिष्ठापनाकरून घटस्थापना होणार आहे. यावर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे जिल्ह्याच्या सर्व सीमा नवरात्र काळात भाविकासाठी बंद केल्या जाणार आहेत. 8 ऑक्टोंबर रोजी श्री देवीची नित्‍योपचार पूजा व रात्री छबीना, 9 ऑक्टोंबर रोजी रथअलंकार महापूजा, 10 ऑक्टोंबर रोजी ललित पंचमी असल्याने मुरली अलंकार महापूजा, 11 ऑक्टोंबर रोजी शेषशाही अलंकार महापूजा, 12 ऑक्टोबर रोजी भवानी तलवार अलंकार महापूजा, 13 ऑक्टोबरला महिषासुर मर्दिनी अलंकार महापूजा,14 ऑक्टोंबर रोजी घटोत्थापन व 15 रोजी विजयादशमी दसरा असल्याने पहाटे सिमोल्लंघन हा विधी होणार आहे. त्यांनतर १९ ऑक्टोबर रोजी मंगळवारी कोजागीरी पोर्णिमानंतर श्री तुळजाभवानी मंदीर संस्थानच्या वतीने अन्नदान अशा प्रकारे शारदीय नवरात्र महोत्सवाची सांगता होईल अशी माहिती महंत तुकोजी बुवा यांनी दिली.

गेल्यावर्षीही नवरात्रोत्सव साधेपणानं 

गेल्या वर्षीचा नवरात्र उत्सव साध्या पद्धतीने भक्तांच्या उपस्थितीविना साजरा झाला होता.  देवीचे सर्व पूजा धार्मिक विधी आणि कुलाचार  करण्यात आले होते. तुळजाभवानी मंदिर नवरात्र काळात पूर्णपणे बंद असल्याने पुजारी, मानकरी आणि सेवेकरी यांच्या उपस्थितीत धार्मिक कार्यक्रम करण्यात आले होते. गतवर्षी पुजाऱ्यांची कोरोना चाचणी करुन सर्व धार्मिक विधी पार पडले होते. नवरात्र महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तुळजापूर शहरात दुचाकी चारचाकी वाहनांसह पायी चालत येणाऱ्या भक्त आणि नागरिकांना प्रवेश बंदी घालण्यात आली होती.

उस्मानाबादचे जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रशासनानं नागरिकांना तुळजापूरच्या शारदीय नवरात्रोत्सवाच्या काळात सहकार्य करण्याचं आवाहन केलं आहे.

इतर बातम्या:

दार उघड बये दार उघड, तुळजाभवानी मंदिरासमोर पुजारी-व्यापाऱ्यांचं लाक्षणिक उपोषण सुरू

यंदाचा नवरात्र उत्सव भाविकांविनाच, कोजागिरी पौर्णिमेपर्यंत तुळजापुरात भाविकांना प्रवेशबंदी

Osmanabad Tuljapur Tuljabhavanidevi Navratri utsav will be celebrated with simplicity no entry for pilgrimage