
जालना : राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी भाजपच्या रेल्वे प्रवासासाठीच्या मागणीवर आणि त्यासाठी करण्यात येणाऱ्या आंदोलनावर टीका केलीय. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही सांगितलंय ‘जान है तो जहान है’. त्यामुळं या महामारीत भाजपनं राजकारण करू नये, असं म्हणत राजेश टोपे यांनी भाजपला टोला लगावलाय. ते जालन्यात पत्रकारांशी बोलत होते.
राजेश टोपे म्हणाले, “दोन डोस घेतलेल्यांना लोकलप्रवासाची मुभा द्यावी या मागणीसाठी भाजपनं रेल्वे आंदोलन केलंय. मात्र कुणालाही त्रास द्यायची आम्हाला हाऊस नाहीये, तर सर्व निर्णय हे टास्क फोर्सच्या शिफारशीनुसार घेतले जातात. त्यामुळं भाजपनं कायदा हातात घेऊ नये. योग्य नियोजन केल्यानंतरच लोकल सर्व सामान्यांसाठी सुरु केली जाईल.”
“महामारीत भाजपनं राजकारण करू नये. मोदींनी देखील ‘जान है तो जहान है’ असं सांगितलंय. भाजपच्या लोकांनी कायदा हातात घेवू नये. दोन लस घेतलेल्यांना लोकल प्रवासावर विचार सुरू आहे. योग्य नियोजन केल्यानंतरच लोकल सर्वसामान्यांसाठी सुरू जाईल,” असंही टोपे यांनी सांगितलं.
राजेश टोपे म्हणाले, “लस तुटवड्याअभावी लसीकरणाची गती मंदावली. केंद्रानं आणखी लस वाढवून द्यावी. भाजपच्या नेत्यांनाही मी विनंती केली. फडणवीस यांनाही बोललो आहे, की केंद्रीय आरोग्यमंत्र्यांना भेटून राज्यासाठी लस वाढवून मागा. सांगली सातारा या पूरग्रस्त भागात कोरोनाचा प्रभाव वाढू शकतो. त्या ठिकाणी आरोग्य यंत्रणेला अलर्ट होण्याच्या सूचना दिल्या आहेत. पूर प्रभावित भागात लसींचा जास्त साठा पाठवण्याच्या सूचनाही आम्ही आरोग्य विभागातील वरिष्ठांना दिल्या आहेत.”
Rajesh Tope criticize BJP protest for local train travel protest