
कणकवली : निवडणूक चिन्ह आणि पक्षाचं नाव शिंदे गटाला देण्यात आल्याने ठाकरे गटात खळबळ उडाली आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयावर ठाकरे गटाने संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही निवडणूक आयोगाच्या निर्णयावर जोरदार टीका केली आहे. तीन लोकांनी खुर्च्यांवर बसून हा निर्णय घेतला आहे. निवडणूक आयोगाचा गळा दाबून निर्णय घ्यायला भाग पाडलं आहे, असं सांगतानाच हर कुत्ते के दिन आहे है; असा घणाघाती हल्लाच संजय राऊत यांनी चढवला आहे.
संजय राऊत हे कोकणाच्या दौऱ्यावर आहेत. कणकवलीत पत्रकार परिषद घेऊन त्यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयावर संताप व्यक्त करतानाच भाजप आणि शिंदे गटावर जोरदार हल्ला चढवला आहे. दिल्लीतली महाशक्ती आहे, त्यांनी यांना वचन दिलं. चिन्ह आणि पक्षाचा सातबारा तुमच्या नावावर करून देऊ. हर कुत्ते के दिन आते है… ही म्हण आहे. कोकणात जशी माकडं येतात, तसे हत्तीही घुसतात, अशी टीका संजय राऊत यांनी केली.
उद्धव ठाकरे यांनी आज मुंबईत बैठक बोलावली आहे. मी कणकवलीत आहे. त्यामुळे बैठकीला पोहोचू शकणार नाही. पण केंद्रातील सत्ताधाऱ्यांनी शिवसेनेचा प्रचंड धसका घेतला आहे. शिवसेनेला खतम करण्यासाठी त्यांचा डाव सुरू आहे.
या भीतीतून आणि सूडभावनेतून केलेलं हे कृत्य आहे. हे लोकशाही मार्गाने केलेलं कृत्य नाही. लोकशाहीच्या नावाने चाललेला राजकीय हिंसाचार आहे. जनता हे सहन करणार नाही, असा इशाराच राऊत यांनी दिला.
परिस्थिती जैसे थे ठेवून निवडणुका घेण्याची त्यांची हिंमत नव्हती. कारण त्यांना विजयाची खात्री नव्हती. म्हणूनच तुम्ही निवडणूक आयोगाचा गळा दाबून हा निर्णय घ्यायला भाग पाडलं आहे, असं सांगतानाच हिंमत असेल तर निवडणूका घ्या, शिवसेना कुणाची हा फैसला जनतेला करू द्या, असं आव्हानच त्यांनी सत्ताधाऱ्यांना दिलं.
काही आमदार आणि खासदार विकत घेतले म्हणून शिवसेना तुमची होत नाही. खरी शिवसेना ही जनतेच्या मनात आहे. बांगलादेशी देशात घुसले म्हणून देश त्यांचा होत नाही. टोळ्या येतात आणि जातात. त्यांची दखल घ्यायची गरज नाही, असंही ते म्हणाले.
काही लोकांच्या शेपट्या फुरफुरायला लागल्या आहेत. त्यांना शिवसैनिकांनी ठोकून बाहेर काढलंय. आपापसात संघर्ष व्हावा, डोकी फुटावी आणि भाजपने तमाशा पाहावा, असं सर्व चाललं आहे. ही यंत्रणा दिल्लीतून चालते. हे या लोकांना कळत नाही. महाराष्ट्राला लागलेला हा शाप आहे, दिल्ली मजा बघतेय, असा हल्ला त्यांनी चढवला.