मोदींचा मंत्री मराठीच्या अभिजात दर्जाबाबत सरळसरळ खोटं बोलतो : रंगनाथ पठारे

| Updated on: Sep 07, 2021 | 2:56 PM

ज्येष्ठ लेखक आणि मराठी अभिजात भाषा समितीचे अध्यक्ष रंगनाथ पठारे यांनी मराठीच्या अभिजात दर्जाच्या मुद्द्यावर मोदी सरकारवर थेट हल्लाबोल केलाय. मराठीच्या अभिजात दर्जाविषयी मोदी सरकारचा मंत्री सरळसरळ खोटं बोलत असल्याचा आरोपही त्यांनी केला. ते टीव्ही 9 मराठीच्या एक्स्लूझिव्ह मुलाखतीत बोलत होते.

मोदींचा मंत्री मराठीच्या अभिजात दर्जाबाबत सरळसरळ खोटं बोलतो : रंगनाथ पठारे
Follow us on

अहमदनगर : ज्येष्ठ लेखक आणि मराठी अभिजात भाषा समितीचे अध्यक्ष रंगनाथ पठारे यांनी मराठीच्या अभिजात दर्जाच्या मुद्द्यावर मोदी सरकारवर थेट हल्लाबोल केलाय. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठीचा प्रस्ताव पाठवून 8 वर्षे झालीत. या काळात साहित्य अकादमीच्या समितीनेही मराठीला अभिजात दर्जा देण्याची शिफारस केलीय. मात्र, औपचारिकता शिल्लक असतानाही केंद्र सरकारकडून ही घोषणा होत नाहीये, अस मत रंगनाथ पठारे यांनी व्यक्त केलं. तसेच मराठीच्या अभिजात दर्जाविषयी मोदी सरकारचा मंत्री सरळसरळ खोटं बोलत असल्याचा आरोपही त्यांनी केला. ते टीव्ही 9 मराठीच्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत बोलत होते.

रंगनाथ पठारे म्हणाले, “आम्ही केंद्र सरकारला मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याविषयीचा अभ्यास अहवाल आणि प्रस्ताव पाठवला. केंद्र सरकारने हा प्रस्ताव साहित्य अकादमीला पाठवला. साहित्य अकादमीने देशातील नामवंत भाषातज्ज्ञांची समिती नेमली. साहित्य अकादमीच्या समितीनेही मराठी भाषेच्या अभिजात दर्जाचा मुद्दा योग्य असल्याचं सांगितलं. त्यामुळे केंद्राकडे गेल्यानंतर केंद्रानं मराठी भाषेला अभिजात दर्जा दिल्याचं सांगणं हे केवळ औपचारिकता होतं.”

“मोदी सरकारमधील हा मंत्री सरळसरळ खोटं बोलतो”

“केंद्र सरकारनं दुसऱ्या एका भाषेचा खटला सुरू आहे असं सांगितलं आणि अभिजात भाषा देण्याचा मुद्दा पुढे ढकलला. नंतर तो खटलाही संपला, मग म्हटले आम्ही त्यावर विचार करतोय, पण मोदी सरकारमधील हा मंत्री सरळसरळ खोटं बोलतो आहे. हे मंत्री संसदेत सांगतात की मराठी भाषेला आम्ही अभिजात भाषेचा दर्जा देण्यावर विचार करत आहोत. प्रत्यक्षात सांस्कृतिक खात्यानं तो प्रस्ताव साहित्य अकादमीला परत पाठवला आहे. आता केंद्र सरकार म्हणतंय दुसऱ्या एखाद्या भाषेचा प्रस्ताव आला, तर त्याच्यासोबत मराठीचा प्रस्ताव आमच्याकडे पाठवा,” अशी माहिती रंगनाथ पठारे यांनी दिली.

“अशापद्धतीने एखाद्या भाषेचा, भाषिक समुहाचा अवमान करणं बरोबर नाही”

रंगनाथ पठारे यांनी मराठी भाषेचा आणि मराठी माणसाच्या अपमानावरुन केंद्राला चांगलंच सुनावलं. ते म्हणाले, “केंद्र सरकारला मराठीला अभिजात भाषेचा दर्जा द्यायचा नाही असंच दिसतंय. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठीचा प्रस्ताव 2013 मध्ये पाठवण्यात आलाय. त्याला आज 2021 आहे म्हणजे या प्रस्तावाला एकूण 8 वर्षे झाली आहेत. अशापद्धतीने एखाद्या भाषेचा, भाषिक समुहाचा अवमान करणं बरोबर नाही. सरकार कोणत्याही पक्षाचं असो. महाराष्ट्राच्या राजकीय पक्षांनी जो दबाव निर्माण केला पाहिजे त्यात ते कमी पडले आहेत. फक्त संसदेत प्रश्न विचारुन होणार नाही, संसदेत मंत्री ठरलेली उत्तरं देतात.”

“मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यासाठी केवळ राजकीय निर्णय होणं बाकी आहे. राजकारण्यांनी तसं करण्याची हिंमत दाखवावी. आपल्या राजकीय नेत्यांनी त्यासाठी दिल्लीत दबाव निर्माण केला पाहिजे,” असं मत पठारे यांनी व्यक्त केलं.

“अभिजात भाषेचा दर्जा मिळाला, तर मराठी भाषेसाठी मोठं काम करता येईल”

रंगनाथ पठारे यांनी मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यास नेमका काय फायदा होईल तेही सांगितलं. ते म्हणाले, “कर्नाटकातील मराठी लोकांना मराठीला लिपी असते हेच माहिती नाही. महाराष्ट्र देशभर पसरलाय. मराठी माध्यमाची कॉलेजेस ग्वालियर, इंदोर, बडोदामध्ये होती. कराचीत मराठी पाठशाळा होती, तिथं अरविंद गोखलेंसारखे लेखक शिकले. अभिजात भाषेचा दर्जा मिळाला, तर कर्नाटकातील मराठी, हरियाणातील रोड मराठा यांच्यासाठी काम करता येईल. मराठीच्या प्रचंड बोली भाषा आहेत. या बोली भाषांवर काम करता येईल, त्यावर प्रकल्प करता येतील. भाषा जितकी व्यापक होईल, वाढेल, तितकी ती समृद्ध होईल.”

“तुकारामासारखा कवी कोणत्याच भाषेत नाही”

“मराठी माणसाचा मराठी भाषेविषयीचा आत्मविश्वास कमी झालाय, तो परत आणणं गरजेचं आहे. जगातील मोजक्या 8-10 भाषांमध्ये मराठीचा समावेश आहे. 12 कोटी लोक बोलतात ती मराठी भाषा लहान नाही, तर खूप मोठी आहे. प्रश्न केवळ संख्येचा नाही, तर मराठी भाषेत वाङमयाची समृद्ध परंपरा आहे. तुकारामासारखा कवी मराठीत होऊन गेलाय. त्याचा किमान एखादा अभंग प्रत्येकाला माहिती असतो. तुकारामासारखा कवी कोणत्याच भाषेत नाही. शेक्सपियर जगप्रसिद्ध आहे, पण त्याच्या नाटकातील एखादी ओळ प्रत्येकाला माहिती नाही, पण तुकारामाचा अभंग आपल्याकडे प्रत्येकाला येतो,” असंही रंगनाथ पठारेंनी नमूद केलं.

“इंग्रजी माध्यमात टाकणं हे मराठी लोकांचं आत्मविश्वास हरवल्याचं लक्षण”

“कवी भाषेत सहजासहजी रुजत नाही, पण तुकाराम महाराज भाषेत रुजलेत. मराठीत सर्वात मोठं कोषवाङमय आहे. ही साधी भाषा नाही. मुलांना मराठी शाळेतून काढून इंग्रजी माध्यमात टाकणं हे मराठी लोकांचं आत्मविश्वास हरवल्याचं लक्षण आहे,” असं निरिक्षण पठारे यांनी मांडलं.

“सातवाहन राजांचं अफगाणिस्तानपर्यंत सलग 400 वर्षे राज्य”

रंगनाथ पठारे म्हणाले, “आ. ह. साळुंखे म्हणाले अभिजात भाषा आणायची म्हणजे ब्राह्मणांची भाषा आणायची का? पण ते तसं नाही. अभिजात म्हणजे क्लासिकल या अर्थाने अभिजात भाषा आहे. मराठीची प्राचीनता स्वयंस्पष्ट आहे. गाथा सप्तशती सातवाहनांच्या काळातील 2000 वर्षांपूर्वीची आहे. हाल सातवाहन राजांची राजधानी जशी पैठणला होती, तशी त्यांची उपराजधानी पेशावरला होती. सातवाहन राजांचं अफगाणिस्तानपर्यंत सलग 400 वर्षे राज्य होतं. मराठी भाषेला प्राचीनता आहे, श्रेष्ठ वाङमयाची सलग परंपरा आहे.”

“मी रामदारांच्या नाही, तर तुकाराम, फुले, साने गुरुजींच्या परंपरेचा”

“देशीवादात परंपरेला महत्त्व आहे हे खरं आहे, पण कोणती परंपरा हे महत्त्वाचं आहे. मी रामदास, चिपळूणकरांच्या परंपरेचा नाही, तर तुकाराम, फुले, साने गुरुजींच्या परंपरेचा आहे. मराठीपणाला अडथळा होणारी उच्च निचतेची भावना रुजवणारी जात टाकली पाहिजे. फक्त एकत्र जेवणावळी घालणं पुरेशा नाहीत, तर एकमेकांमध्ये आंतरजातीय लग्नं झाली पाहिजे,” असंही पठारे यांनी नमूद केलं.

संबंधित व्हिडीओ पाहा :

हेही वाचा :

‘तथाकथित लेखकांनी ब्राह्मण वाचकांसाठी लिहिलं, पाटलाला बाईबाजी करणारं दाखवलं’

”बरेच लेखक सार्वजनिकपणे एक बोलतात आणि खासगीत वेगळंच बोलतात”

Writer Rangnath Pathare criticize Modi government over Classical status to Marathi language