ठाकरेंच्या शिवसेनेची महिन्याभरापासून तयारी, ऐनवेळी काँग्रेसकडून दगा, विधान परिषद निवडणुकीत मविआ फुटीच्या उंबरठ्यावर, बोलवली तातडीची बैठक
सध्या महायुती आणि महाविकास आघाडी दोघेही पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची तयारी करत आहेत. विधान परिषदेत या जागा आहेत. या निवडणुकीत मविआमध्ये फूट पडण्याची चिन्ह आहेत.

अक्षय मंकणी, निवृत्ती बाबर, प्रतिनिधी : विधान परिषदेतील शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांच्या जागांवरुन महाविकास आघाडीत बिघाडी निर्माण झाली आहे. सध्या महायुती आणि महाविकास आघाडी दोघेही पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची तयारी करत आहेत. दोन्हीबाजूला जागा पदरात पाडून घेण्यासाठी चढा-ओढ सुरु आहे. काँग्रेस, शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे शिवसेना हे तीन पक्ष महाविकास आघाडीमध्ये आहेत. लोकसभा आणि विधानसभा निवडणुका या तिन्ही पक्षांनी एकत्रितपणे लढवल्या होत्या. आता विधान परिषदेतील शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या जागेवरुन महाविकास आघाडीमध्ये नाराजी निर्माण झाली आहे.
शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीसाठी काल काँग्रेसकडून तीन उमेदवार जाहीर करण्यात आले. मित्रपक्षांना विश्वासात न घेता ही उमेदवारी जाहीर केल्यामुळे मविआ मध्ये नाराजी आहे. आज दुपारी 2 वाजता समन्वयाने मार्ग काढण्यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांची हयात हॉटेल मध्ये बैठक होणार आहे. अमरावती शिक्षक मतदार संघातुन महाविकास आघाडी मध्ये बिघाडी आहे. अमरावती शिक्षक मतदारसंघासाठी काँग्रेसने आधीच आपला उमेदवार जाहीर केला आहे. मात्र मित्रपक्ष शिवसेनेने अगोदर पासून तयारी केली होती.
विश्वासात घेतलं नाही
उमेदवार जाहीर करताना विश्वासात न घेतल्याचं शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. काँग्रेसने उमेदवार जाहीर केल्यानंतर अमरावती मतदार संघात ठाकरेंच्या भूमिकेकडे सर्वांच लक्ष लागलं आहे. मविआमध्ये उमेदवारीवरून नव्या वादाची शक्यता आहे. विधान परिषदेच्या अमरावती शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीमध्ये उमेदवारीवरून मतभेद निर्माण झाले आहेत. काँग्रेसने शुक्रवारी अदिती पोहरे यांना उमेदवारी जाहीर केली. मात्र, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने सुमारे महिनाभरापूर्वीच दत्तात्रय लहाने यांची उमेदवारी जाहीर केली होती. काँग्रेसने उमेदवार जाहीर केल्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेच्या भूमिकेकडे सर्वांच लक्ष लागलं आहे.
तीन जागांसाठी उमेदवार जाहीर
काँग्रेसने पाचपैकी तीन जागांसाठी उमेदवार जाहीर केले आहेत. नागपूर पदवीधर मतदारसंघातून विद्यमान आमदार अभिजित वंजारी आणि पुणे शिक्षक मतदारसंघातून विद्यमान आमदार जयंत आसगावकर यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे, तर अमरावती शिक्षक मतदारसंघातून अदिती पोहरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
