
ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस इंडियाने साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांची जाहीर माफी मागितली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांवरील ‘शिवाजी: हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया’ या पुस्तकात असलेल्या विधानांबाबत ही माफी मागण्यात आली आहे. अमेरिकन इतिहासकार जेम्स लेन यांच्या या पुस्तकातील काही विधाने ही शिवाजी महाराज आणि त्यांच्या आई राजमाता जिजाबाई यांच्याबद्दल अपमानास्पद, बदनामीकारक आणि निराधार होती, त्यामुळे वाद निर्माण झाला होता. गेल्या काही वर्षांपासून चाललेला हा कायदेशीर वाद अखेर आता संपला असून ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस (OUP) ने जाहीर माफी मागितली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
शिवाजी: हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया हे पुस्तक फेब्रुवारी 2003 च्या सुमारास प्रकाशित झाले होते. या पुस्तकातील छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलची काही विधाने ही खोटी आणि अपमानास्पद होती. यामुळे महाराष्ट्रात वाद निर्माण झाला होता, अनेक लोक रस्त्यावर उतरले होते. त्यानंतर ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसने एका सार्वजनिक सूचनेत कबूल केले होते की, शिवाजी महाराजांबद्दलची काही विधाने पडताळणी न करता छापलेली होती. प्रेसने त्यांच्या माफीनाम्यात पृष्ठे 31, 33, 34 आणि 93 चा विशेषतः उल्लेख केला होता.
या पुस्तकातील मजकूर समोर आल्यानंतर तीव्र निदर्शने झाली. 2004 मध्ये पुण्यातील भांडारकर ओरिएंटल रिसर्च इन्स्टिट्यूट (BORI) ची तोडफोड करण्यात आली होती. निदर्शकांनी आरोप केला होती की संस्थेने पुस्तकाच्या संशोधनात आणि पाठिंब्यात भूमिका बजावली होती. नंतर हा वाद राष्ट्रीय पातळीवर पोहोचला. नंतर, राज्य सरकारने पुस्तकावर बंदी घातली आणि प्रकाशकाने पुस्तक मागे घेतले. अनेक माध्यमांनीही यावर बातम्या छापल्या होत्या.
2003/04 मध्ये वादाला सुरुवात झाली होता, मग 2026 मध्ये नवीन माफी का मागितली गेली? असा प्रश्न उपस्थित होत आहे. याचे उत्तर म्हणजे 2005 मध्ये, शिवाजी महाराजांचे वंशज आणि खासदार उदयनराजे भोसले यांनी पुस्तकाच्या प्रकाशनात सहभागी असलेल्यांविरुद्ध मानहानीची तक्रार दाखल केली. त्यानंतर कायदेशीर वाद सुरू झाला. ही कायदेशीर प्रक्रिया वर्षानुवर्षे चालली आणि डिसेंबर 2025 मध्ये, मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाने यावर निकाल दिला. यामुळे ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसला इंग्रजी आणि मराठी वृत्तपत्रांमध्ये सार्वजनिक माफीनामा प्रकाशित करावा लागला.
समोर आलेल्या माहितीनुसीर ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस इंडियाने आपल्या माफीनाम्यात पुस्तकातील शिवाजी महाराजांबद्दलची काही विधाने पडताळणी केलेली नव्हती त्यामुळे प्रकाशकाने दिलगिरी व्यक्त केली आणि ती प्रकाशित केल्याबद्दल माफी मागितली आहे. तसेच हे पुस्तक भारतात खूप मर्यादित काळासाठी उपलब्ध होते आणि ते खूप पूर्वी मागे घेण्यात आले होते असाही उल्लेख यात करण्यात आला आहे.