Pahalgam Attack : पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 50 लाख देणार; फडणवीस कॅबिनेटचा सर्वात मोठा निर्णय

जम्मू-काश्मीरच्या पहलगाम 22 एप्रिल झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये महाराष्ट्रातील 6 जणांचा समावेश आहे. त्यांच्या कुटुंबीयांना 50 लाख रुपये अर्थसहाय्य देण्याची मोठी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

Pahalgam Attack : पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 50 लाख देणार; फडणवीस कॅबिनेटचा सर्वात मोठा निर्णय
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 50 लाख देणार
| Updated on: Apr 29, 2025 | 1:53 PM

जम्मू-काश्मीरच्या  पहलगाम येथे गेल्या मंगळवारी (22 एप्रिल)  झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला. त्यामध्ये महाराष्ट्रातील 6 जणांचा समावेश आहे. या मृतांच्या कुटुंबीयांना 50 लाख रुपये अर्थसहाय्य देण्याची मोठी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. आज झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत मृतांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर हा निर्णय जाहीर करण्यात आला.

मृतांच्या कुटुंबीयांना 50 लाख रुपये अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. तसेच या कुटुंबियांच्या शिक्षणाकडे तसेच रोजगाराकडेही राज्य सरकार लक्ष देणार आहे. पुण्यातील संतोष जगदाळे यांचा या हल्ल्यात मृत्यू झाला, त्यांच्या मुलीला शासकीय नोकरी देण्यात येणार आहे.

जगदाळे कुटुंबातील मुलीला नोकरी देण्यासाठी आपण कालच बोललो होतो. पण आता मुख्यमंत्र्यांचा विशेषाधिकार वापरत त्यांना आता शासकीय नोकरी देणार, असा निर्णय आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ बैठकीत जाहीर केला.

महाराष्ट्रातील 6 जणांनी गमावला जीव 

22 एप्रिल मंगवार दुपारी, पहलगामच्या बैसरन व्हॅलीत फिरायला गेलेल्या पर्यटकांवर दहशतवाद्यांनी नृशंस हल्ला केला. त्यांनी पर्यटकांना बेसावध गाठलं, त्यानंतर हिंदू कोण, मुस्लिम कोण असं विचारत वेगळं व्हायला सांगितंल, अजान म्हणायला सांगितली असा दावा प्रत्यक्षदर्शींनी केला. या हल्ल्यात एकूण 26 जणांचा मृत्यू झाला, त्यापैकी 25 भारतीय तर एक नेपाळी नागरिक होता. मृतांमध्ये देशाच्या विविध भागातील पर्यटकांचा समावेश असून महाराष्ट्रातील 6 जणांनी जीव गमावला.,

डोंबिवतील 3 मावसभावांचा मृत्यू झाला. अतुल मोने, संजय लेले आणि हेमंत जोशी हे कुटुंबियांसोबत एकत्र काश्मीर फिरायला गेले, त्यांना दहशतवाद्यांनी त्यांच्या कुटुंबियांसमोरच गोळ्या घातल्या. तर पुण्यातील संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे हो दोघे लहानपणापासूनचे मित्र, तेही त्यांच्या कुटुंबासह पहलगाम येथे गेले होते. त्यांनाही दहशतावाद्यांनी डोक्यात गोळी मारून ठार केलं. तर नवी मुंबईतील दिलीप देसले यांचाही दहशतवाद्यांच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाला.

आम्ही टिकल्या काढून फेकल्या आणि अल्लाह हू अकबर म्हणायला लागलो

या दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या कौस्तुभ गणबोटे यांच्या कुटुंबियांची गेल्या आठवड्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी भेट घेतली. तेव्हा गणबोटे यांच्या पत्नीने संपूर्ण हल्ल्याच्या भयानक, जीवघेणा प्रसंग कसा घडला ते साश्रूनयनांनी सांगितले.

आम्ही पहलागामला फिरायला गेलो होतो, तेवढ्यात तिथे हे बंदुकधार दहशतवादी आले. माझ्यासमोर माझ्या पतीला गोळ्या घातल्या गेल्या. आम्हाला अजान म्हणा असं सांगण्यात आलं होतं. ते ऐकून तिथं असलेल्या सगळ्या महिलांनी मोठ्या मोठ्या अजान म्हणायला सुरूवात केली, पण अतिरेक्यांनी तिथे उभ्या असलेल्या सगळ्या पुरूषांना मारू टाकलं. आमच्या देखतंच त्यांना गोळ्या घातल्या.

माझे मिस्टर तिथे उभे होते, त्यांचा मित्र बाजूला होता, त्यालाही पुढे बोलाववून घेतलं आणि विचारलं ‘अजान पढता है क्या, पढता है क्या कुछ?’ त्यांच बोलणं ऐकून आम्ही आमच्या टिकल्या काढून फेकल्या आणि आम्ही सगळे अल्लाह हू अकबर म्हणायला लागलो, पण तरीही त्यांनी,सर्वांना मारून टाकलं असं गणबोटे यांच्या पत्नीने सांगितलं. तिथे गेटवर एक मुस्लिम होता तो म्हणत होता तुम्ही कशाला निरपराध लोकांना मारता त्यांनी काय चुकी केली आहे? असं विचारलं. दहशतवाद्यांनी त्याला सुद्धा पुढे बोलावलं आणि गोळ्या घातल्या, असं सांगताना त्यांना अश्रू अनावर झाले होते.