जगावं की मरावं? एवढा पूर आला की मृतदेह छतावर ठेवण्याची वेळ, तुफान पावसामुळे अखेरचा निरोप रखडला; व्हिडीओ पाहून अनेकांच्या डोळ्यात पाणी!
एका बाजूला आयुष्यभराची साथ सोडून गेलेल्या व्यक्तीचा मृतदेह आणि दुसऱ्या बाजूला पुरापासून आपल्या कुटुंबाला वाचवण्याची धडपड अशी मन हेलावून टाकणारी वेळ लिलका कुटुंबावर आली होती. या कुटुंबाने या चार तासांत अक्षरशः काळजाचा थरकाप उडवणारा प्रसंग अनुभवला.

Palghar Flood : पालघरच्या केळवे रोडमध्ये पुराच्या रौद्ररूपाचा असा काळीज पिळवटून टाकणारा प्रसंग समोर आला आहे. घरात शिरलेल्या पुराच्या पाण्यामुळे एका कुटुंबाला तब्बल चार तास मृतदेह घेऊन घराच्या छतावर बसण्याची वेळ आली. एका बाजूला प्रिय व्यक्तीचा मृतदेह.तर दुसऱ्या बाजूला स्वतःचा जीव वाचवण्याची धडपड, अशी अजब वेळ या कुटुंबावर आली होती. या प्रसंगाचा व्हिडीओ पाहून अनेकांनी हळहळ व्यक्त केली आहे.
मृतदेह खांद्यावरून घरापर्यंत आणावा लागला
पालघरच्या केळवे रोड स्थानकाच्या पूर्वेकडील देवी पाड्यात पुराच्या पाण्याने हाहाकार माजवला. या पुरात एका कुटुंबावर दुहेरी संकट कोसळलं आहे. ५५ वर्षीय अनुसया मनोहर लिलका यांच्यावर धुंदलवाडी येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान रविवारी रात्री त्यांचा मृत्यू झाला. सोमवारी पहाटे त्यांचा मृतदेह रुग्णवाहिकेतून केळवे रोड येथे आणण्यात आला. मात्र पश्चिमेकडून पूर्वेकडे जाणाऱ्या रेल्वे अंडरपासमध्ये पुराचे पाणी साचल्याने मृतदेह खांद्यावरून घरापर्यंत आणावा लागला. सकाळी पावसाचा जोर वाढला आणि काही वेळातच पुराचे पाणी घरात शिरले. पाण्याचा प्रवाह इतका वाढला की मृतदेह वाहून जाण्याचा धोका निर्माण झाला. अखेर कुटुंबीयांनी घराच्या किचन भागातील छताचे दोन सिमेंटचे पत्रे फोडले आणि मोठ्या कष्टाने मृतदेह छतावर नेला. प्लास्टिकने मृतदेह झाकून ठेवत कुटुंबीयांनी तब्बल चार तास छतावरच आसरा घेतला.
दोन तासांनंतर पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले
एका बाजूला आयुष्यभराची साथ सोडून गेलेल्या व्यक्तीचा मृतदेह आणि दुसऱ्या बाजूला पुरापासून आपल्या कुटुंबाला वाचवण्याची धडपड अशी मन हेलावून टाकणारी वेळ लिलका कुटुंबावर आली होती. या कुटुंबाने या चार तासांत अक्षरशः काळजाचा थरकाप उडवणारा प्रसंग अनुभवला. दोन तासांनंतर पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले. त्यानंतर मृतदेह पुन्हा खाली आणण्यात आला. ग्रामस्थांनी मदतीचा हात पुढे केला. लाकडांची व्यवस्था करून देवी पाडा स्मशानभूमीत अनुसया लिलका यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
निसर्गाच्या संकटासमोर माणूस किती हतबल होतो, याचं जिवंत उदाहरण केळवे रोडच्या देवी पाड्यात पाहायला मिळालं. पुराच्या पाण्याने केवळ घरंच नाही, तर कुटुंबातील एका सदस्याला शेवटचा निरोप देण्याचा प्रवासही थांबवला होता.