गुरे चारण्यासाठी गेलेल्या चौघांच्या अंगावर वीज कोसळली, एकाचा जागीच मृत्यू

मुसळधार पावसामुळे डहाणू तालुक्यात गुरे चारण्यासाठी गेलेल्या चौघांच्या अंगावर वीज पडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. (Palghar Lightning strikes on farm One Person died) 

गुरे चारण्यासाठी गेलेल्या चौघांच्या अंगावर वीज कोसळली, एकाचा जागीच मृत्यू
प्रातिनिधिक फोटो

पालघर : गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा एकदा जोर धरला आहे. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, वसई, विरार, पालघर यांसह अनेक भागात मुसळधार पाऊस कोसळत आहे. मुसळधार पावसामुळे डहाणू तालुक्यात गुरे चारण्यासाठी गेलेल्या चौघांच्या अंगावर वीज पडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तर तीन जण जखमी झाले आहेत. (Palghar Lightning strikes on farm One Person died)

एकाचा मृत्यू, तिघांची प्रकृती स्थिर

डहाणू तालुक्यातील ओसरविरा मानकर पाड्यात दुपारी 4 च्या सुमारास ही दुर्घटना घडली. यावेळी वीज अंगावर पडून रविंद्र बच्चू कोरडा (15) याचा जागीच मृत्यू झाला. तर मेहुल अनिल मानकर (12), चेतन मोहन कोरडा (11), दिपेश संदीप कोरडा (14) या तिघांना गंभीर दुखापत झाली आहे. सध्या या तिघांची प्रकृती स्थिर आहे. त्यांना जवळच्या कासा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

ही चारही मुले ओसरविरा येथील मानकर पाड्यातील आहेत. काल हे चौघेजण गुरे चारण्यासाठी शेतावर गेले होते. मात्र शेतातच वीज पडून रविंद्रचा जागीच मृत्यू झाला. तर इतर तिघे जखमी झाले.

पालघरमध्ये अनेक ठिकाणी मुसळधार

दरम्यान जून महिन्याच्या सुरुवातीपासूनच राज्यात विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस होत आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारली होती. पण काल पहाटेपासूनच पालघरमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पाहायला मिळत आहे. पालघरमध्ये अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पाहायला मिळत आहे.

भात शेतीच्या कामांना गती

गेल्या काही दिवसांपासून रिपरिप पडणाऱ्या पावसाने दमदार सुरुवात केली आहे. पालघरमधील जव्हार, विक्रमगड, मोखाडा या भागात पावसाची संततधार सुरु आहे. तर पश्चिम भागात असणाऱ्या पालघर, बोईसर, मनोर, डहाणू या परिसरात जोरदार पाऊस पाहायला मिळत आहे. यामुळे शहरातील अनेक सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. पालघर जिल्ह्यात सर्वत्र पावसाची रिपरिप पाहायला असल्याने अनेक ठिकाणी भात शेतीच्या कामांना गती आल्याचे पाहायला मिळत आहे.

(Palghar Lightning strikes on farm One Person died)

संबंधित बातम्या : 

मान्सूनने शेतकऱ्यांची काळजी वाढवली, पुढील आठवड्यात पाऊस कसा असेल? वाचा तुमच्या भागातील हवामान स्थिती

कोरोना डेल्टा विषाणूच्या पार्श्वभूमीवर नाशिक प्रशासन सतर्क, जिल्ह्यात कठोर निर्बंध लागू

VIDEO | शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी पीक कर्ज उपलब्ध करुन द्या; सदाभाऊ खोत बैल आणि नांगर घेऊन बँकेसमोर

Published On - 7:53 am, Tue, 29 June 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI