
पंढरपूरच्या आषाढी एकादशीच्या यात्रेला अवघे काही दिवस शिल्लक आहे. आता या आषाढी एकादशी यात्रेच्या अगदी तोंडावरच एक दुर्दैवी घटना घडली आहे. चंद्रभागा नदीत बुडून एका तरुण भाविकांचा मृत्यू झाला आहे. शुभम पावले (२७) असे या तरुणाचे नाव आहे. यामुळे हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रभागा नदीत बुडून शुभम पावलेचा या तरुण भाविकाचा मृत्यू झाला आहे. तो आपल्या मित्रांसोबत विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरला गेला होता. आज सकाळी तो पुंडलिक मंदिराशेजारील चंद्रभागा नदीपात्रात आंघोळीसाठी उतरला असता. मात्र त्याला पाण्याचा अंदाज आला नाही आणि तो बुडाला असावा, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
या घटनेची माहिती मिळताच तात्काळ शोधकार्य सुरू करण्यात आले. तब्बल चार तासांच्या शोधकार्यानंतर शुभमचा मृतदेह आढळून आला. आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर ही घटना घडल्याने हळहळ व्यक्त होत आहे. सर्व प्रशासकीय यंत्रणा सज्ज असतानाही ही घटना घडल्यामुळे प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.
पंढरपूरच्या विठुरायाच्या दर्शनासाठी लाखो वारकरी पायी पालख्यांच्या माध्यमातून पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाले आहेत. संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालख्या आज पुण्यात मुक्कामी असणार आहेत. त्यामुळे पुणे शहर सध्या वारीमय वातावरणाने भारलेलं दिसत आहे. पुणे महानगरपालिकेचा आरोग्य विभाग या वारकऱ्यांच्या सेवेसाठी पूर्णपणे सज्ज झाला आहे. पालख्यांच्या मुक्कामाच्या ठिकाणी 24 तास वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
“आम्हाला जरी पंढरपूरला जाता आले नाही, तरी पंढरीची वाट चालणाऱ्या वारकऱ्यांच्या थकलेल्या पावलांची सेवा करणे म्हणजे थेट पंढरपूरच्या पांडुरंगाची सेवा करण्याचे भाग्यच आम्हाला मिळत आहे,” अशी भावना आरोग्य कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली.
आषाढी वारीच्या सोहळ्यासाठी एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. वारकऱ्यांसाठी उजनी धरणातून 1600 क्युसेक्सने पाणी भीमा नदीत (चंद्रभागेत) सोडले जाणार आहे. आज दुपारी 3 वाजल्यानंतर उजनीतून पाण्याचा विसर्ग सुरू होईल. आषाढी वारीसाठी आलेले वारकरी चंद्रभागा नदीत स्नान करूनच आपली वारी पूर्ण करतात. चंद्रभागेत स्नान करण्याचे वारकरी संप्रदायात विशेष महत्त्व आहे. वारकऱ्यांच्या सोयीसाठी आणि त्यांच्या पवित्र स्नानासाठी हा पाण्याचा विसर्ग महत्त्वपूर्ण ठरणार आहे.