केंद्रात सरकार आल्यापासून पनवती लागलीय, काय म्हणाले उद्धव ठाकरे
उद्धव ठाकरे यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही जोरदार टीका केली, जर आम्ही इंडियन मुजाहिद्दीनसारखे होतो तर तुम्ही न केलेल्या शौर्याचं कौतुक जगात करायला आमच्या पक्षाचे खासदार का पाठवले असाही सवाल उद्धव ठाकरे यांनी केला आहे.

दोन्ही शिवसेनेचा वर्धापन दिनाचा सोहळा आज मुंबईत वेगवेगळ्या ठिकाणी झाला. उद्धव ठाकरे याच्या शिवसेनेचा वर्धापन दिन आज षन्मुखानंद सभागृहात झाला. या वर्धापन दिन सोहळ्यात उद्धव ठाकरे यांनी भाजपाच्या नेत्यांवर जहरी टीका केली आहे. उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यावर जोरदार टीका केली आहे. केंद्रात सरकार आल्यापासून पनवतीच लागली असल्याची बोचरी टीका शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
पण कोणी जबाबदारी घ्यायला तयार नाहीत…
आज देशात केंद्र सरकारची काय अवस्था झाली आहे. केंद्रात सरकार आल्यापासून पणवती लागली आहे. मंदिराचं छत गळतंय, विमान अपघात झाला.रेल्वे अपघात झाला पण कोणी जबाबदारी घ्यायला तयार नाहीत. मेट्रोत पाणी भरलं. आज देशाला पंतप्रधानाची गरज आहे. भाजपाला पंतप्रधान आहे. देशाला नाही. देशाला गृहमंत्र्यांची गरज आहे. घरफोड्या अमित शाहची गरज नाही. देशाला संरक्षण मंत्र्याची गरज आहे. गुंडांना संरक्षण देणाऱ्या देवेंद्र आणि राजनाथ सिंह यांची नाही. तुम्ही देशाचे संरक्षण मंत्री आहात का गुंडांचे ? तुम्ही देशाचे गृहमंत्री आहात की तुमच्या पक्षाचे घरफोडे मंत्री आहात असा टोमणा मारला.
उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की निवडणूक जिंकण्यासाठी हे माता भगिनीशी केलेला वादा. जनतेशी केलेला वादा पाळत नाहीत. मग तो पक्ष माझ्याशी केलेला वादा कसा पाळेल. अडीच अडीच वर्षाचा मुख्यमंत्रीपदाचा वादा नव्हता असे म्हणता. मग माता भगिनीला केलेला वादा खरा होता की नव्हता ? असाही हल्ला त्यांनी केला.
पंतप्रधानांना कठोर शब्दात बोलणं योग्य नाही
मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रश्न विचारतोय. आता पंतप्रधानांना कठोर शब्दात बोलणं योग्य होत नाही. इंडिया आघाडी आम्ही उभी केली तर इंडियन मुजाहिद्दीन बरोबर तुम्ही आमची तुलना करायला गेलात तेव्हा तुम्हाला लाज वाटली नाही. जर आम्ही इंडियन मुजाहिद्दीन सारखे होतो तर तुम्ही न केलेल्या शौर्याचं कौतुक जगात करायला आमच्या पक्षाचे खासदार का पाठवले असाही सवाल उद्धव ठाकरे यांनी केला आहे.
