
अकोला जिल्ह्यातील निंबा फाटा येथे ‘अंदुरा ऍग्रो प्रोड्युसर कंपनी’च्या वतीने ‘कुणबी स्नेहमिलन सोहळा’ आणि शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला चित्रपट अभिनेते मकरंद अनासपुरे आणि अभिनेत्री गिरिजा ओक उपस्थित होत्या. यावेळी बोलताना मकरंद अनासपुरे यांनी हुंडा घेणारे नामर्द आहेत. जर स्त्री जर टिकली नाही तर, समाज कसा टिकेल? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. मकरंद अनासपुरे आपल्या भाषणात नेमकं काय म्हणाले ते सविस्तर जाणून घेऊयात.
आपल्या भाषणात मकरंद अनासपुरे म्हणाले की, ‘जे हुंडा घेतात ते नामर्द आहेत असं माझं वैयक्तिक मत आहे. बायको लक्ष्मी म्हणून घरात आणायची. तिने आपल्या लेकरांना जन्म द्यायचा, तिने त्यांच्यावर संस्कार करायचे, मग ती घरात येताना भिकमाग्यासारखे तिच्या बापाकडे पैसे कशाला मागायचे? काय गरज आहे त्याची. उद्या जर स्त्री टिकली नाही तर समाज कसा टिकेल? आपल्या देशाचं नाव भारत. आपण काय म्हणतो, भारत माता की जय. भारत हा पुल्लिंगी शब्द आहे. पण आपण भारत माता म्हणतो त्याचे कारण म्हणजे, आदिशक्तीचे महत्त्व आपल्या सर्वांना समजलेलं आहे. जुन्या माणसांना हे समजलं त्यामुळे त्यांनी भारत माता म्हटले आहे.’
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर उत्तर शोधण्यासाठी मकरंद अनासपुरे आणि नाना पाटेकरांनी एकत्रित ‘नाम फाउंडेशन’ची स्थापना केली आहे. या कार्यक्रमात शेतकऱ्यांबाबत बोलताना मकरंद अनासपुरे म्हणाले की, ‘शेतकरी एकत्र आल्याशिवाय त्यांचे प्रश्न सुटणार नाहीत. शेतकरी बांधवांनी एकच जात यापुढे लक्षात ठेवायची ती म्हणजे शेतकरी. सगळ्यांनी मिळून काम केलं तर उभ राहण्याची शक्यता आहे. साधे मुद्दे आहेत, साधे गणितं आहेत.
पुढे बोलताना मकरंद अनासपुरे म्हणाले की, ‘1973 साली पहिला वेतन आयोग लागू झाला तेव्हा एखाद्याचा पगार 75 किंवा 100 रुपये होता. त्यावेळी सोनं 400 तोळा होतं. त्यावेळी कपाशीचा भाव 500 रुपये क्विंटल होता. आज 2025 आहे, एखाद्याचा पगार लाख-दीड लाखाच्या घरात आहे. सोन्याचा भावही लाख-दीड लाखाच्या घरात आहे. मात्र कपाशीचा भाव 3000, 4000, 5000 यातच अडकला आहे. शेतकऱ्यांची सगळीकडून चाललेली लूट थांबणं ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. या देशाला महासत्ता व्हायचं असेल तर ही लूट थांबणं गरजेची आहे.’