
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात आज विधासनभेत प्रश्न उपस्थित करण्यात आला. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात उत्तर दिलं. “महिला डॉक्टरने आत्महत्या केली आणि त्यातून समाजामध्ये देखील खूप मोठ्या प्रमाणात दु:खाची लाट तयार झाली. आपण एसआयटी नेमली. न्यायिक समितीमार्फत चौकशी सुरु आहे. तीन मुद्दे सन्मानीय सदस्यांनी उपस्थित केले. आतापर्यंतच्या तपासात फॉरेन्सिक रिपोर्ट आलेला आहे. त्या रिपोर्टनुसार डॉक्टर महिलेने जे काही तिच्या हातावर लिहिलेलं आहे, ती हँडरायटिंग तिचीच आहे” अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी सभागृहात दिली. “दुसरा विषय मांडला की, या प्रकरणात आरोपी आहेत, त्या आरोपींनी दबाव आणला का? मूळामध्ये या केसमध्ये हे जे पोलीस अधिकारी बदने आहेत, या बदनेने एकप्रकारे जी काही माहिती आली, चॅट आलेले आहेत, त्या सगळ्यामध्ये बदनेने तिची फसवणूक करुन तिचं शारीरिक शोषण केलं” अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी सभागृहात दिली.
“बदनेने हे सर्व केल्याचं तपासातून निष्पन्न होतय. त्यातून मग लग्नाचं आमिष दाखवणं अशा गोष्टी आलेल्या आहेत. नंतर मात्र वेगळी भूमिका बदनेने घेतलेली दिसते. तिच शोषण केल्याचं लक्षात येतं” असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. “ती मेडीकल ऑफिसर होती, ज्या आरोपाीला अटक होते तो अटकेकरता फिट आहे का? याबाबत रिपोर्ट घ्यावा लागतो” असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं.
अनफिटचं प्रमाणपत्र दिलं जातय
“अशा प्रकारचे काही रिपोर्ट्स हे त्या महिला डॉक्टरने अनफिट म्हणून दिले. म्हणून पोलिसांनी एक मोठं पत्र हे त्यावेळी त्यांचे वरिष्ठ आहेत त्यांना लिहिलेलं. महत्वाच्या गुन्ह्यांमधील गुन्हेगारांना अनफिटचं प्रमाणपत्र दिलं जातय. मग त्यावर चौकशी झाली. तिने सुद्धा पत्र दिलं. हे सगळं पाचमहिने आधीच आहे” असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
हातावर लिहिलेलं अक्षर त्या महिलेचचं
“आत्महत्या प्रकरणामध्ये मात्र बदनेने केलेली फसवणूक आहे. त्या परिस्थितीचा फायदा उचलून दुसऱ्या आरोपीने तिची फसवणूक केली. त्या दोघांची नावं लिहून तिने आत्महत्या केली. आतापर्यंतचे जे रिपोर्ट्स आहेत, फॉरेन्सिक रिपोर्ट आहेत, त्यानुसार गळफास लावून झालेला मृत्यू आहे. हातावर लिहिलेलं अक्षर त्या महिलेचं आहे. तपासातून समोर आलय. तपास अजून संपलेला नाही. आरोपपत्र दाखल होईल. अनेक गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. त्याची स्वतंत्रपणे चौकशी करण्यासाठी न्यायाधीशाची नेमणूक केली आहे. पोलीस तपास हा महिला आयपीएस अधिकाऱ्याच्या माध्यमातून चालला आहे” असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहाला सांगितलं.