
राज्यातील 29 महानगर पालिकांच्या निवडणुकीची घोषणा झाली आहे. यात पुणे महानगर पालिकेच्या निवडणुकीचाही समावेश आहे. गेल्या काही दिवसांपासून पुण्यात अजित पवार आणि शरद पवारांची राष्ट्रवादी एकत्र लढणार असल्याची चर्चा आहे. मात्र या युतीबाबत शरद पवार गटाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप नाराज असल्याची माहिती समोर आली आहे. अशातच आज शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषद घेत महत्त्वाची माहिती दिली आहे. त्यामुळे शरद पवार आणि अजित पवार पुन्हा एकदा एकत्र येण्याच्या चर्चांना उधाण आले आहे. सुप्रिया सुळे नेमक्या काय म्हणाल्या याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत युती करण्याबाबत प्रश्न विचारला असता, सुप्रिया सुळे म्हणाल्या की, ‘असा कुठलाही निर्णय अद्याप झालेला नाही. आमची सर्वच पक्षांसोबत युतीची चर्चा सुरू आहे. मात्र अंतिम निर्णय अद्याप झालेला नाही. मात्र याबाबत शरद पवार जो निर्णय घेतील तो आम्हा सर्वांना मान्य असेल.’ सुप्रिया सुळेंच्या या विधानामुळे आगामी निवडणुकीसाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
ठाकरे बंधुंकडून शिवसेना ठाकरे गट आणि मनसेच्या युतीची अधिकृत घोषणा झाली आहे. यावर बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले याचा आनंद झाला आहे. जागावाटप कसे होईल याची माहिती लवकरच समोर येईल. आमची युतीबाबत चर्चा सुरू होती असंही सुळे यांनी म्हटले आहे.
मुंबईत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती झाल्यानंतर आता राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिवसेना ठाकरे गटासोबत युतीची बोलणी थांबवली असल्याची माहिती समोर आली आहे. आता राष्ट्रवादी शरद पवार गट मुंबई महापालिकेमध्ये काँग्रेस सोबत युती करण्याची शक्यता आहे. मुंबई महापालिकेसाठी मनसे, शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गट युती करणार असल्याची माहिती सुरुवातीला समोर आली होती. शिवसेना ठाकरे गटानं आपल्या कोट्यातून शरद पवार गटाला जागा देण्याची तयारी दर्शवली आहे, अशी देखील माहिती समोर येत होती. मात्र आता या युतीची चर्चा थांबली आहे अशी माहिती समोर आली आहे.