
राज्यात सध्या महानगरपालिकांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. अशातच पुण्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. प्रशांत जगताप यांनी पुणे शहर अध्यक्षपदाचा राजीनामा दिला असल्याची माहिती समोर आली आहे. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस गट एकत्र येण्यास जगताप यांचा तीव्र विरोध असल्याने त्यांनी राजीनाम्याचा निर्णय घेतला असल्याचतेहा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शरद पवार गटात खळबळ उडाली आहे. अशातच आता खासदार सुप्रिया सुळे यांनी जगताप यांचा राजीनामा माझ्याकडे आलेला नाही अशी माहिती दिली आहे. सुप्रिया सुळे यांनी नेमकं काय म्हटले ते जाणून घेऊयात.
प्रशांत जगताप यांच्या राजीनाम्यावर बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, प्रशांत जगताप यांचा राजीनामा माझ्याकजे आलेला नाही, तसेच प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी जगताप यांच्या राजीनाम्याबाबत मला माहिती दिलेली नाही. कुणाशी आघाडी करायची याच्या वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत, जोपर्यंत अंतिम निर्णय होत नाही तोपर्यंत त्यावर बोलणं योग्य नाही. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची चर्चा असल्याने जगताप नाराज आहेत का याबाबत मला माहिती नाही. पक्ष आघाडीबाबत जो काही निर्णय घेईल, तो सर्वांशी चर्चा करून घेतला जाईल. नेत्यांनी विश्वासात घेतल्याशिवाय कोणताही निर्णय घेतला जाणार नाही.
पुढे बोलताना, प्रशांत जगताप आमची काल 2 तास चर्चा झाली, ते काल मुंबईत आले होते. शशिकांत शिंदे, जयंत पाटील आणि माझ्यासोबत त्यांनी चर्चा केली. आतापर्यंत कोणत्याही पक्षाचा आघाडीसाठी प्रस्ताव आलेला नाही. मुंबईतील निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यासोबत चर्चा सुरू आहे. आज प्रशांत जगताप मुंबईला येणार आहेत. त्यांची आणि माझी भेट होणार आहे असं सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.
दरम्यान, प्रशांत जगताप हे सुप्रिया सुळे आणि पक्षातील इतर वरिष्ठ नेत्यांची आज मुंबईत भेट घेणार आहेत. या भेटीत त्यांची भूमिका समजून घेऊन त्यांची नाराजी दूर केला जाणार आहे. कारण प्रशांत जगताप हे जर राष्ट्रवादीतून बाहेर पडले तर पक्षाचे मोठे नुकसान होणार आहे. याचा परिणाम आगामी महानगरपालिका निवडणुकीवर होणार आहे.