पुणे शिक्षक मतदारसंघावरून महायुतीत रस्सीखेच; कोणती जागा कोणाच्या पदरात पडणार? महत्त्वाची अपडेट समोर
पुणे शिक्षक मतदारसंघावरून महायुतीत रस्सीखेच पाहायला मिळत आहे. तर महायुतीत कोणती जागा कोणाच्या पदरात पडणार, यावरून जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

राज्यात विधानपरिषदेच्या पाच जागांवरील निवडणुकीमुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे. पुण्यातील शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीसाठी महाविकास आघाडी आणि महायुतीनेही जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. महायुतीमधील तिन्ही पक्षांनी पुणे शिक्षक मतदारसंघात निवडणूक लढवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. यामुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे.
महायुतीत नेमकं कशावरुन घोडं अडलं?
महायुतीत पुणे शिक्षक मतदारसंघावरुन घोडं अडलं आहे. पुणे शिक्षक मतदारसंघावर महायुतीतील तिन्ही पक्षांचा दावा केला आहे. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी कांग्रेसची पुण्याच्या शिक्षक मतदारसंघासाठी मागणी केली आहे. एका जागेसाठी पुन्हा एकदा वरिष्ठ पातळीवर चर्चा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पुणे आणि नागपूर पदवीधर भाजपकडे तर संभाजीनगर राष्ट्रवादी कांग्रेसकडे जाणार असल्याचे बोलले जात आहे. तर अमरावती शिक्षक मतदारसंघ शिंदेंची शिवसेना लढवणार आहे. मात्र, अद्याप पुणे शिक्षक मतदारसंघावर तिन्ही पक्षांचा दावा असल्याने निश्चिती नाही. विधान परिषदेच्या ५ जागांच्या निवडणुकांसाठी ६ ऑक्टोबर रोजी अर्ज भरण्याची अंतिम मुदत आहे.
निवडणुकीसाठी भाजपने थोपटले दंड
राज्यातील पाच जागांवरील विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपनेही दंड थोपटले आहेत. या निवडणुकीसाठी भाजपने बैठकांचा धडाका लावला आहे. या बैठकींच्या सत्रानंतर भाजप विधानपरिषद उमेदवारांची यादी आज शनिवारी जाहीर होण्याची शक्यता आहे. यासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण दिल्ली दौऱ्यावर आहेत. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांची भेट घेणार आहेत. या भेटीनंतर भाजपच्या उमेदवारांची यादी जाहीर होण्याची शक्यता आहे.
महाविकास आघाडीत बिघाडी?
तत्पूर्वी, अमरावती शिक्षक मतदारसंघातून महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झाल्याची चर्चा आहे. अमरावती शिक्षक मतदारसंघासाठी काँग्रेसकडून उमेदवार जाहीर करण्यात आला आहे. परंतु मित्रपक्ष शिवसेनेनेआधीच तयारी केली होती. उमेदवार जाहीर करताना विश्वासात न घेतल्याचं शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. काँग्रेसने उमेदवार जाहीर केल्यानंतर अमरावती मतदार संघात ठाकरेंच्या भूमिकेकडे लक्ष लागलं आहे. यामुळे मविआमध्ये उमेदवारीवरून नव्या वादाची शक्यता आहे.
