प्रदीप पुर्णेकर याच्या हत्येत नवीन माहिती उघड, एका आरोपीने हत्येनंतर प्रेयसीला केला होता फोन
ठाण्यातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे विभाग प्रमुख प्रदीप (बाळू) पूर्णेकर यांच्या हत्या प्रकरणात मुख्य संशयित आरोपी पप्रकाश उर्फ पप्या शिंदे याला अटक करण्यात आली असून, चौकशीसाठी इतर संशयितांना ताब्यात घेतले आहे.

शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे ठाणे येथील विभाग प्रमुख प्रदीप (बाळू) पूर्णेकर यांची मंगळवारी रात्री घोडबंदर रोडवरील मानपाडा-मनोरमानगर भागात गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. त्यानंतर ठाण्यातील वातावरण तणावग्रस्त झाले होते. या प्रकरणात पप्या शिंदे या आरोपीला अटक केली आहे. आरोपी पप्या शिंदे याच्या चौकशीत त्याचे साथीदार संतोष कनोजिया उर्फ टल्ली, निखिल यादव आणि नितेश पवार अशा आरोपींची ओळख पटली आहे. आता एक नवीन माहिती उघडकीस आली आहे. या प्रकरणात आरोपी संतोष कनोजिया उर्फ टल्ली याने हत्येनंतर त्याच्या प्रेयसीला कॉल केला होता अशी माहिती उघडकीस आली आहे.
पुर्णेकर यांच्या हत्येनंतर त्यांच्या कुटुंबियांनी आरोपींना तातडीने अटक करावे या मागणीसाठी पुर्णेकर यांचा मृतदेह ताब्यात न घेण्याचा निर्णय सुरुवातीला घेतला होता. त्यानंतर शिवसेनेचे नेत्यांनी पोलिसांची भेट घेतली होती. त्यानंतर कारवाईचे आश्वासन पोलिसांनी दिले.
प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणाने ठाण्यात वातावरण ढवळून निघाले आहे. या प्रकरणात एका आरोपीला अटक झाली आहे. तर चार आरोपींची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आहे. पाचव्या आरोपीने हेल्मेट घातल्याने त्याची ओळख पटलेली नाही. या प्रकरणातील एक आरोपी संतोष कनोजिया उर्फ टल्ली याच्याबद्दल चौकशीत एक महत्वाची माहिती उघडकीस आली आहे. संतोष कनोजिया याने हत्येनंतर त्याच्या प्रेयसीला फोन केल्याचे पोलिस तपासात उघडकीस आले आहे. संतोज कनोजियाने फरार होण्यासाठी प्रेयसीकडून पैसे घेतल्याची माहिती उघड झाली आहे. संतोष याने त्याच्या प्रेयसीकडून ५ हजार ऑनलाइन घेतल्याचे तपासात समोर आहे.
आरोपी संतोष कनोजिया याने प्रदीप पुर्णेकर यांच्या हत्येनंतर प्रेयसीला फोन करुन पळून जाण्यासाठी ऑनलाईन पैसे घेतल्याचे उघडकीस आले आहे. पोलिसांनी या तरुणीची चौकशी केल्यानंतर तिने आपल्या हत्येच्या घटनेची काहीही कल्पना नव्हती. संतोषने पैसे मागितल्याने आपण दिल्याचे त्या तरुणीने पोलिसांना सागितले आहे. आरोपी संतोष कनोजिया आणि इतरांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. आतापर्यंत पोलिसांनी ८ ते १० जणांचे नोंदवले जबाब, प्रत्यक्षदर्शी, घटनास्थळाच्या आजूबाजूला असणारे रहिवासी आणि कुटुंबातील सदस्यांचे जबाब नोंदवण्यात आले आहे.