
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे हे स्वगृही परतणार आहेत. त्यांचा लवकरच पक्षप्रवेश होणार आहे. त्यांच्या पक्षप्रवेशावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रफुल्ल पटेल यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी खडसेंबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. एकनाथ खडसे यांचं मन राष्ट्रवादीत रमत नव्हतं, असा दावा प्रफुल्ल पटेल यांनी केला आहे. “आम्हाला माहीत होतं की एकनाथ खडसे हे भाजपमध्ये जाणार आहेत. त्यांचं मन रमत नव्हतं. शरद पवार यांनी त्यांना विधान परिषदेची जागा दिली. पण त्यांचं मन त्यात रमलं नाही. बरं झालं ते पुन्हा भाजपात जात आहेत. आता आम्ही एकत्र काम करू, अशी प्रतिक्रिया प्रफुल्ल पटेल यांनी दिल्ली.
एकनाथ खडसे यांना राज्यपालाची संधी मिळणार का? असा प्रश्न प्रफुल्ल पटेल यांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी “खडसेंना कोणती संधी मिळते हे मला माहीत नाही. पण महाराष्ट्रमध्ये भाजप रुजवण्यात त्यांच्या फार मोलाचा वाटा आहे. भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि एकनाथ खडसे यांनी त्या काळात भाजप वाढवण्यासाठी खूप मेहनत घेतली. त्यामुळे त्यांचं मन भाजप आहे”, असं प्रफुल्ल पटेल म्हणाले.
यावेळी प्रफुल्ल पटेल यांनी विविध प्रश्नांवर प्रतिक्रिया दिली. नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांची जागा का सोडावी? असं शिवसेना नेते संजय शिरसाट म्हणाले. याबाबत प्रफुल्ल पटेल यांना प्रश्न विचारला असता, “शिरसाट काय बोलले हे मला माहीत नाही. पण पक्षश्रेष्ठी बसून प्रत्येक जागेवर विचार करून निर्णय घेतात. लोकसभेनुसार पक्षाच्या इच्छेनुसार कोणत्याही जागा देता येत नाही. युतीचा एक धर्म असतो आणि त्याप्रमाणे ठरल्यानुसार प्रत्येकाला काम करावं लागतं”, असं प्रफुल्ल पटेल म्हणाले.
काँग्रेसमधून निलंबित झालेले नेते संजय निरुपम शिंदे गटात प्रवेश करण्याची चर्चा असताना भाजपचे मोहित कंबोज आणि मनसे दोघांनी याला विरोध केला आहे. यावर बोलताना प्रफुल्ल पटेल म्हणाले की, “संजय निरुपम इतके वर्ष काँग्रेसमध्ये राहिले कसे हेच मला माहीत नाही. ते माझे मित्र आहेत. पण आता लवकरात लवकर त्यांना इतरत्र कुठेतरी योग्य स्थान मिळेल. ते चांगले काम करत आहेत आणि मुंबईमध्ये त्यांचं चांगलं काम आहे. त्यांनी लवकरात लवकर एखादा पक्षात जावं, अशी माझी त्यांना सदिच्छा”, असा सल्ला प्रफुल्ल पटेल यांनी दिला.