
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे विमान अपघातात अकाली निधन झाले. अजित पवारांच्या निधनामुळे संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली आहे. अजित दादांच्या निधनानंतर अनेक व्यक्ती त्यांच्या आठवणी सांगताना दिसत आहेत. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी एका जाहीर कार्यक्रमात दिवंगत नेते अजित पवार यांच्या आठवणींना उजाळा देत अत्यंत भावूक विधान केले. अजितदादांच्या अकाली जाण्याने राष्ट्रवादी कुटुंबावर जे संकट ओढवले आहे, त्यातून सावरणे कठीण आहे, असे प्रफुल्ल पटेल म्हणाले.
प्रफुल्ल पटेल यांनी नुकतंच एका कार्यक्रमात हजेरी लावली होती. यावेळी प्रफुल्ल पटेल यांनी अजित पवार यांच्या आठवणींना उजाळा दिला. तसेच त्यांचे शेवटचे बोलणेही सांगितले. अजितदादांच्या खंबीर नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसने महाराष्ट्रात एका वेगळ्या उंचीला स्पर्श केला होता. पक्ष अधिक मजबूत झाला होता आणि भविष्यात आपल्याला याहीपेक्षा मोठी झेप घेण्याची संधी होती. मात्र, परवा अशी एक घटना घडली ज्याने संपूर्ण चक्रच फिरवून टाकले. तुम्ही याला नियती म्हणा किंवा योगायोग, पण आज दुर्दैवाने आपल्यावर त्यांना श्रद्धांजली वाहण्याची वेळ आली आहे, असे प्रफुल्ल पटेल यांनी म्हटले.
राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना पटेल म्हणाले की, महाराष्ट्रातील राष्ट्रवादीचा मोठा परिवार आज दुःखात आहे. अशा परिस्थितीत पक्ष सावरण्यासाठी तातडीने विधानसभा आणि विधानपरिषदेच्या सदस्यांची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत सर्व आमदार आणि खासदारांनी एकमताने सुनेत्रा पवार यांचे नेतृत्व मान्य केले असून, दादांचा राजकीय वारसा त्या समर्थपणे पुढे नेतील असा विश्वास व्यक्त केला.
यावेळी प्रफुल्ल पटेल यांनी त्यांच्या शेवटच्या फोन कॉलचा उल्लेख केला. दादांच्या निधनाच्या आदल्या रात्री ८ ते ८:३० च्या दरम्यान माझे त्यांच्याशी फोनवर बोलणे सुरु होते. सार्वजनिक कामे आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आमची सविस्तर चर्चा झाली. फोन ठेवताना मी सहज विचारले की, दादा, आपण पुन्हा कधी भेटणार? त्यावर त्यांनी दिलेले उत्तर ऐकून मी सुन्न झालो.
प्रफुल्ल भाई, आता आपली भेट होणार नाही. त्यांच्या या वाक्याने मी काही काळ शांत झालो. त्यानंतर ते लगेच म्हणाले की पुढचे ७-८ दिवस मी जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी दौऱ्यावर आहे, त्यामुळे भेट होणार नाही. पण त्यांचे ते पहिले वाक्य आजही माझ्या डोक्यात घर करून आहे. नियतीला काय अपेक्षित होते, याचा अंदाज आम्हाला कोणालाच नव्हता, असा भावूक किस्सा प्रफुल्ल पटेल यांनी सांगितला.