राजकारण एकच धंदा… पंकजा मुंडेंच्या बहीणीचं वक्तव्य

बीडच्या माजी खासदार प्रीतम मुंडे यांनी एका उद्घाटन समारंभात केलेल्या वक्तव्यानंतर त्या चर्चेत आल्या आहेत. त्यांच्या एका वक्तव्याने उपस्थितांमध्ये हशा पिकला असून राजकीय वर्तुळातही चर्चा सुरू झाली आहे.

राजकारण एकच धंदा... पंकजा मुंडेंच्या बहीणीचं वक्तव्य
Beed Politics
Image Credit source: टीव्ही९ मराठी
| Updated on: Nov 28, 2026 | 5:38 PM

बीडचा प्रमुख उद्योग राजकारण आहे आणि बाकीचे जोडधंदे आहेत, असे वक्तव्य माजी खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांनी केले आहे. अंबाजोगाई येथील एका उद्घाटन समारंभात बोलताना त्यांनी बीडच्या राजकीय वातावरणावर मिश्किल टिप्पणी केली. त्यांच्या या वक्तव्याची आता चर्चा होत आहे. मी केवळ कार्यकर्त्याच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्यासाठी या कार्यक्रमाला आले आहे. याचा कोणीही राजकीय अर्थ काढू नये, असे प्रीतम मुंडे यांनी सुरुवातीलाच स्पष्ट केले. मात्र, एवढे लोक मंचावर असताना राजकारणाची चर्चा होऊ नये, हे शक्य नसल्याचेही त्या म्हणाल्या.

बीडमध्ये राजकारण हाच प्रमुख उद्योग

बीडचा प्रमुख उद्योग राजकारण आहे आणि बाकीचे जोडधंदे आहेत. शेती वगैरे आपला प्रमुख व्यवसाय नाही, तर राजकारण हाच आपला मुख्य व्यवसाय आहे, असे प्रीतम मुंडे म्हणाल्या. इथल्या प्रत्येक गावातील प्रत्येक माणसाच्या नसानसात राजकारण भरलेले आहे. जगात इतर ठिकाणी कोणत्या गोष्टी घडतील किंवा नाही, हे सांगता येत नाही. मात्र, बीडमध्ये प्रत्येक गोष्टीचे पडसाद उमटत असतात, अशी टिप्पणी त्यांनी केली.

Loading...

कोणतेही आंदोलन असो किंवा धरणे, ते बीडमध्ये झाल्याशिवाय त्याला पूर्णत्व येत नाही, असेही त्या म्हणाल्या. त्यांच्या या वक्तव्यामुळे कार्यक्रमात उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

‘मला निवडणुकीला मत मागायचे नाही’

कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या व्यक्तींची नावे आपण आधीच घेतली आहेत. त्यामुळे आपल्याला कोणाचेही नाव घेण्याची गरज नाही. कारण मला निवडणुकीला तुमच्याकडे मत मागायचे नाही, असेही प्रीतम मुंडे यांनी स्पष्ट केले. केज मतदारसंघाचा उल्लेख करत त्यांनी सध्या कोणताही राजकीय हेतू नसल्याचे सांगितले.

मी कार्यक्रमाला येत असते, ते माझे कार्यकर्त्यांसोबत असलेले ऋणानुबंध जपण्यासाठी. मला कार्यकर्त्यांशिवाय करमत नाही आणि त्यांनाही माझ्याशिवाय करमत नाही. यामागे कोणताही राजकीय हेतू नाही, असे प्रीतम मुंडे म्हणाल्यात.

दरम्यान, २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत पक्षाने पंकजा मुंडे यांना उमेदवारी दिली होती. त्यावेळी प्रीतम यांनी एकदिलाने बहिणीसाठी प्रचारात आघाडी घेतली होती, पण तरीही विजय मात्र मिळाला नाही.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us