
काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पुन्हा एकदा सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे, ते पुण्यात बोलत होते. पावसाळी अधिवेशन सुरू असताना विधानसभेच्या लॉबीमध्ये जोरदार राडा झाला होता, आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांचे समर्थक आपसात भिडल्याचं पाहायला मिळालं, यावर प्रतिक्रिया देताना चव्हाण यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.
नेमकं काय म्हणाले चव्हाण?
विधिमंडळाला एक दर्जा आहे, लोकशाहीच्या मंदिरात जे चालू आहे ते लज्जास्पद आहे. सत्ताधारी पक्षांकडून बेशिस्त वर्तन होत आहे हे दुर्दैवी आहे, सभागृहात वापरली जाणारी भाषा मुलांच्या कानावर पडली तर काय परिणाम होतील? सभागृहाच्या बाहेर गुंड आणून मारामाऱ्या होत आहेत, असं यावेळी चव्हाण यांनी म्हटलं.
दरम्यान कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा सभागृहात मोबाईलवर रमी खेळत असतानाचा एक व्हिडीओ समोर आला होता, या व्हिडीओवरून वातावरण चांगलंच तापलं, विरोधकांनी कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी करत सरकारची कोंडी केली. यावर देखील पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
रमी खेळणाऱ्या मंत्र्यांना दोष द्यायचा की ऑनलाईन रमी सुरु करणाऱ्या मोदी सरकारला दोष द्यायचा ? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे. ऑनलाइन रमीमधून कर गोळा करण्याची व्यवस्था सरकारने केली आहे, मंत्री पदावरची माणसंही ऑनलाइन जुगाराचा मोह टाळू शकत नाहीत, ऑनलाइन जुगारामुळे पिढ्यान् पिढ्या उद्ध्वस्त होत आहेत. कोकाटेंचा राजीनामा घ्यायचा की नाही? हे त्यांना ज्यांनी मंत्री केलं त्यांनी ठरवावं. फॅसिस्ट प्रवृत्तीमुळे लोकशाहीला धोका निर्माण झाला आहे, असं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे.
सत्ताधारी पक्षानं काही केलं तर विरोधकांनी प्रत्युत्तर देणं साहाजिकच आहे. मात्र दोन्ही बाजूंच्या नेत्यांनी अशा पद्धतीचं वर्तन करू नये, काँग्रेसची आत्ताच्या सत्ताधाऱ्यांशी तुलनाच होऊ शकत नाही, हे अगदी निर्ढावलेली लोक आहेत, यांना कशानेच काही फरक पडत नाही, असा जोरदार हल्लाबोल यावेळी चव्हाण यांनी केला आहे.