झारखंड सरकारने महाराष्ट्रातील ‘त्या’ योजनेची केली कॉपी, अजित पवारांची टीका, म्हणाले ‘महाविकासआघाडी…’

महाराष्ट्र सरकारच्या घोषणेनंतरच झारखंड सरकारने याबद्दलची घोषणा केली आहे. याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी झारखंड सरकारवर सडकून टीका केली आहे.

झारखंड सरकारने महाराष्ट्रातील त्या योजनेची केली कॉपी, अजित पवारांची टीका, म्हणाले महाविकासआघाडी...
उपमुख्यमंत्री अजित पवार
| Updated on: Aug 04, 2024 | 2:48 PM

Ajit Pawar on Jharkhand Government scheme : महाराष्ट्र शासनाने गेल्या महिन्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केली. या योजनेला राज्यभरातील महिलांचा भरभरुन प्रतिसाद मिळत आहे. या योजनेद्वारे राज्य सरकार महिलांना दर महिन्याला १५०० रुपये देणार आहेत. या योजनेसाठी १ कोटीहून अधिक अर्ज प्राप्त झाले आहेत. सध्या या अर्जांची तांत्रिक पडताळणी केली जात आहे. आता झारखंडमध्येही अशीच योजना सुरु करण्यात आली आहे. यावरुन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी टीका केली आहे.

झारखंडमध्ये महिलांना आर्थिक मदत देण्यासाठी ‘मैय्या सन्मान योजना’ सुरु करण्यात आली आहे. यात महिलांना दरवर्षी 12 हजार रुपये दिले जाणार आहेत. महाराष्ट्र सरकारच्या घोषणेनंतरच झारखंड सरकारने याबद्दलची घोषणा केली आहे. याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी झारखंड सरकारवर सडकून टीका केली आहे. यात त्यांनी ही योजना म्हणजे लाडकी बहिन योजनेची नक्कल असल्याचे म्हटले आहे.

अजित पवारांचे ट्वीट

“झारखंडमधील महाविकास आघाडी सरकारनं लाडकी बहीण योजनेची नक्कल केली आहे हे सपशेल दिसतंय. भक्कम अर्थव्यवस्था आणि महसुलाच्या बाबतीत महाराष्ट्र हे भारतातील पहिल्या क्रमांकावर असणाऱ्या राज्यांपैकी एक आहे. आम्ही योजना दीर्घकाळ राबवूच. मात्र महाविकास आघाडीनं झारखंडमध्ये ही योजना प्रभावीपणे कशी राबवता आणि टिकवता येईल याची काळजी करावी”, असे ट्वीट अजित पवार यांनी केले आहे.

झारखंडमध्ये ‘मैय्या सन्मान योजना’

येत्या काही महिन्यात महाराष्ट्र आणि झारखंड अशा दोन्हीही राज्यांमध्ये निवडणुका होणार आहेत. महाराष्ट्रात या योजनेची घोषणा झाल्यानंतर विरोधीपक्षांनी यावर जोरदार टीका केली होती. तर दुसरीकडे झारखंडमध्ये महाविकासआघाडीच्या मित्रपक्षांच्या सरकारने अशाप्रकराची योजना सुरु केली आहे. चंपाई सोरेन यांनी मुख्यमंत्री असताना ‘मुख्यमंत्री बहिण-मुलगी स्वावलंबन प्रोत्साहन’ योजनेची घोषणा केली होती. यात २५ ते ५० वर्षे वयोगटातील महिलांना दरमहा १००० रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, हेमंत सोरेन यांनी पदभार स्वीकारल्यानंतर ‘मैय्या सन्मान योजना’ जाहीर केली आहे.