मोठी बातमी ! शिल्पा शेट्टी संकटात, बंगल्यावर आयकर विभागाचा छापा, पुढे काय होणार?
Shilpa Shetty : आयकर विभागाने बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरावर छापा टाकला आहे. यामुळे आगामी काळात शिल्पाची अडचण आणखी वाढण्याची शक्यता आहे.

बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टी सध्या संकटात सापडली आहे. आज (गुरूवार, 18 डिसेंबर ) आयकर विभागाने शिल्पाच्या मुंबईतील जुहू येथील घरावर छापा टाकला आहे. शिल्पाच्या बंगळुरूमधील प्रसिद्ध हॉटेल बास्टियन गार्डन सिटीशी संबंधित एका प्रकरणाबाबत ही कारवाई करण्यात आली आहे. आयकर विभाग केवळ मुंबईतीलच नव्हे तर बेंगळुरूमधील हॉटेलच्या ठिकाणीही छापे टाकत असल्याचीही माहिती समोर आली आहे. त्यामुळे शिल्पाची अडचण आणखी वाढण्याची शक्यता आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
शिल्पा शेट्टीच्या घरावर छापा
शिल्पा शेट्टीच्या घरावरील छाप्याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बास्टियन गार्डन सिटी हॉटेलच्या व्यवहारात आर्थिक अनियमितता आणि करचुकवेगिरीच्या तक्रारींनंतर हे छापे टाकण्यात आले आहेत. अभिनेत्री शिल्पा शेट्टीने 2019 मध्ये बास्टियन हॉस्पिटॅलिटीमध्ये 50% हिस्सा खरेदी केला होती. ही कंपनी रणजीत बिंद्रा यांच्या मालकीची आहे. आता तक्रारी आल्यानंतर आयकर विभाग बास्टियन पबच्या खात्यांची बारकाईने तपासणी करत आहे असल्याची माहिती समोर आली आहे.
17 डिसेंबरलाही छापेमारी
समोर आलेल्या माहितीनुसार काल (बुधवार, 17 डिसेंबर) आयकर विभागाने शिल्पा शेट्टीच्या कर्नाटकमधील बास्टियन रेस्टॉरंटवर छापा टाकला होता. त्यानंतर आता मुंबईतील घरावरही छापा टाकण्यात आला आहे. शिल्पा ही आपल्या अभिनयासह एक यशस्वी व्यावसायिक म्हणूनही प्रसिद्ध आहे. ती मुंबई, गोवा, बेंगळुरू आणि इतर ठिकाणी लोकप्रिय असलेल्या बास्टियन रेस्टॉरंट चेनची मालकीण आहे. आपल्या या आलिशान रेस्टॉरंटचे फोटो ती सतत सोशल मीडियावर शेअर करते. या छापेमारीच्या दरम्यान आता शिल्पाने अम्माकाई नावाचे एक नवीन रेस्टॉरंट उघडण्याचीही घोषणा केली आहे.
बास्टियन बंद होणार?
गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये शिल्पाचे मुंबईतील वांद्रे येथील बास्टियन रेस्टॉरंट बंद होणार असल्याची माहिती समोर आली होती. मात्र त्यानंतर शिल्पाने सोशल मीडियावर एक क्लिप पोस्ट केली होती, ज्यात ती फोनवर, ‘नाही, मी बास्टियन बंद करत नाही. बास्टियनमध्ये आम्ही नेहमीच नवीन पदार्थ खवय्यांसाठी आणले आहेत आणि ते काम पुढेही सुरू राहील. आम्ही एक नव्हे तर दोन नवीन ठिकाणी बास्टियन सुरू करण्याची योजना आखत आहोत.’
