निलेश घायवळ प्रकरणी गॉडफादर कोण? रवींद्र धंगेकरांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट

कोथरूड गोळीबार प्रकरणानंतर पुणे शहराचे राजकारण चांगलेच तापले आहे. रवींद्र धंगेकर यांनी भाजप नेते चंद्रकांत पाटलांवर गंभीर आरोप केले आहेत. पाटलांचे निलेश घायवळ टोळीतील गुन्हेगारांशी संबंध असून ते त्यांना पाठीशी घालत असल्याचे धंगेकरांचे म्हणणे आहे.

निलेश घायवळ प्रकरणी गॉडफादर कोण? रवींद्र धंगेकरांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट
| Updated on: Oct 12, 2025 | 12:18 PM

कोथरूडमध्ये गेल्या महिन्यात झालेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर पुणे शहरातील राजकारण चांगलेच तापले आहे. शिवसेना शिंदे गटाचे नेते रवींद्र धंगेकर यांनी भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. चंद्रकांत पाटील हे गुन्हेगारी टोळ्यांना विशेषत: निलेश घायवळ टोळीतील आरोपींना सहकार्य करत असल्याचा थेट आरोप रवींद्र धंगेकरांनी केला आहे. गेल्या आठवड्याभरापासून या आरोपांच्या फैरी सुरु झाल्या आहेत. आता याप्रकरणी रवींद्र धंगेकरांनी भाष्य केले आहे.

नेमके काय आहे प्रकरण?

कोथरूडमधील गोळीबार प्रकरणात निलेश घायवळ टोळीतील आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. या घटनेनंतर टोळीप्रमुख निलेश घायवळ परदेशात पसार झाला. या पार्श्वभूमीवर, रवींद्र धंगेकर यांनी पत्रकार परिषदेत निलेश घायवळ आणि समीर पाटील यांचे चंद्रकांत पाटील आणि त्यांच्या कार्यकर्त्यांसोबतचे अनेक फोटो सोशल मीडियावर आणले होते. या फोटोच्या आधारावर रवींद्र धंगेकर यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

धंगेकरांचा चंद्रकांत पाटलांवर थेट हल्ला

रवींद्र धंगेकर यांनी नुकतंच टीव्ही ९ मराठीशी संवाद साधला. यावेळी त्यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले. निलेश घायवळ ज्या पद्धतीने दादागिरी करतोय, खोटा पासपोर्ट तयार केला. लोकांचे मुडदे पाडले. निलेश घायवळ किंवा समीर पाटील असेल ही सर्व लोक चंद्रकांत पाटील यांच्या आसपास असतात. यामुळेच त्यांचे धाडस होत चालले आहे, असा गंभीर आरोप रवींद्र धंगेकर यांनी केला

समीर पाटील ज्यावेळेस पोलीस स्टेशनमध्ये जातो, त्यावेळेस दादांच्या चंद्रकांत पाटील यांच्या जवळचा असल्यामुळे तो पोलिसांवर दबाव टाकतो. गुन्हेगारीची सिस्टीम रन करताना समीर पाटील दिसत आहे, असेही रवींद्र धंगेकर म्हणाले. यावेळी धंगेकरांनी समीर पाटील यांच्यावर मोक्का, फसवणूक (चीटिंग) अशा प्रकारचे गुन्हे दाखल असल्याची कागदपत्रेही त्यांनी सादर केली.

यावेळी रवींद्र धंगेकरांनी कोथरूडमधील गुन्हेगारीच्या वाढत्या घटनांवरून चंद्रकांत पाटलांना आव्हान दिले. कोथरूडमध्ये ज्या पद्धतीने गुन्हेगारी चालते, रोज मुडदे पडतात, रिव्हॉल्व्हर निघतायेत. तुम्ही तिथले लोकप्रतिनिधी आहात. त्यामुळे आम्ही तुम्हाला विचारतोय, तुम्ही म्हणा एकदा की आम्ही त्यांचा खात्मा करू. गौतमी पाटीलवर ॲक्शन घेणाऱ्या चंद्रकांत पाटलांनी या गुंडांना उचला असे का म्हणत नाही? चंद्रकांत पाटील तुम्ही त्यांना घाबरत आहात का?, असा सवाल धंगेकर यांनी केला.

अजित पवार पाठीशी उभे नाहीत

गुन्हेगारी आणि निलेश घायवळवर बोलत असताना भाजप नेते किंवा पालकमंत्री अजित पवार पाठीशी उभे राहताना दिसत नाहीत. अजित पवारांचे सिस्टीममध्ये कोण ऐकत असेल, असे वाटत नाही, असे विधान रवींद्र धंगेकर यांनी केले.

दरम्यान पुण्यातील गुन्हेगारी संदर्भात मी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज भेट घेणार आहे. पुणेकरांचा आवाज म्हणून रवींद्र धंगेकर गुन्हेगारीवरती बोलत राहील. ही गुन्हेगारी मोडीत काढताना किंवा त्यासंदर्भात वक्तव्य करताना नेते मंडळी दिसत नाहीत, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.