पुण्यात चोरट्यांचा सुळसुळाट… ग्राहक बनून आलेल्या महिलांनी सोन्याचं दुकान लुटलं, हजारोंचा ऐवज लंपास

Pune Crime : सोन्याचा दर वाढल्याने आता सोने चोरीच्याही घटना पहायला मिळत आहे. अशातच आता पुण्यात ग्राहक बनून आलेल्या महिलसांनी सोन्याच्या दुकानात चोरी केली असल्याची माहिती समोर आली आहे.

पुण्यात चोरट्यांचा सुळसुळाट... ग्राहक बनून आलेल्या महिलांनी सोन्याचं दुकान लुटलं, हजारोंचा ऐवज लंपास
Gold Crime
Image Credit source: TV 9 Marathi
| Updated on: May 18, 2026 | 5:39 PM

गेल्या काही महिन्यांपासून सोन्याच्या किमतीत झपाट्याने वाढ झालेली आहे, त्यामुळे सोने खरेदीदार चिंतेत आहेत. सोन्याचा दर वाढल्याने आता सोने चोरीच्याही घटना पहायला मिळत आहे. पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर बाजारपेठेमध्ये ज्वेलरी दुकानात ग्राहक बनून आलेल्या महिलांकडून 84 हजार 600 रुपयांचे सोने लंपास केल्याची घटना घडली आहे. वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, नसरापूर मुख्य बाजारपेठेमधील पंडित ज्वेलर्स या दुकानात 13 तारखेला सायंकाळी सात ते आठ वाजण्याच्या दरम्यान ही चोरीची घटना घडली. बाजारपेठेमध्ये नेहमीप्रमाणे ग्राहकांची मोठी गर्दी होती. याच संधीचा फायदा घेत पाच महिला आणि एक लहान मुलगा ग्राहक असल्याचा बहाणा करून दुकानात आले. सुरुवातीला दोन महिला आणि त्यांच्यासोबत एक लहान मुलगा दुकानात दाखल झाले. त्यांनी विविध सोन्याचे दागिने पाहण्यास सुरुवात केली. काही वेळानंतर आणखी तीन महिला दुकानात आल्या. त्यामुळे दुकानातील कर्मचाऱ्यांचे लक्ष वेगवेगळ्या ग्राहकांकडे वळले.

या महिलांनी नाकातील नथनी पाहण्याच्या बहाण्याने दुकानदारांकडून विविध डिझाईनची पाऊच हातात घेतली. त्यावेळी एका महिलेने अत्यंत शिताफीने नथनीचे पाऊच हातात घेत ते तिच्यासोबत असलेल्या मुलीच्या हातात दिले. संबंधित मुलीने काही क्षणांतच ते आधी आलेल्या महिलांसोबत असलेल्या लहान मुलाच्या हातात दिले. हा सर्व प्रकार इतक्या वेगाने आणि नियोजनबद्ध पद्धतीने घडला की दुकानातील कर्मचाऱ्यांना कोणताही संशय आला नाही. काही वेळाने संबंधित महिला आणि लहान मुलगा कोणतीही खरेदी न करता दुकानातून बाहेर पडले.

सुरुवातीला दुकान मालकांना चोरी झाल्याचा संशय आला नव्हता. मात्र काही दिवसांनी दुकानातील नथनी पाऊचची तपासणी करताना दोन पाऊच कमी असल्याचे पंडित ज्वेलर्सचे मालक विनय पंडित यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी तात्काळ दुकानातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता संपूर्ण चोरीचा प्रकार उघडकीस आला. सीसीटीव्हीमध्ये महिलांकडून अत्यंत चलाखीने चोरी केल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. या चोरीमध्ये अंदाजे 6 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने चोरीला गेले असून, त्याची किंमत तब्बल 84 हजार 600 रुपये इतकी असल्याचे सांगण्यात आले आहे. या घटनेनंतर नसरापूर बाजारपेठेतील व्यापाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे..

स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, यापूर्वी परिसरात मेडिकल दुकाने फोडण्याच्या घटना घडल्या होत्या. त्यानंतर घरफोडी तसेच चिमुकलीवरील अत्याचारासारख्या गंभीर घटना समोर आल्याने नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. पूर्वी राजगड पोलीस स्टेशन नसरापूर परिसरात असल्यामुळे पोलिसांची गस्त नियमित होत होती. मात्र पोलीस स्टेशन बाहेर गेल्यानंतर बाजारपेठेतील पोलिसांची उपस्थिती कमी झाली असून, त्यामुळे चोरी आणि गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ होत आहे, अशी प्रतिक्रिया ग्रामस्थांकडून व्यक्त करण्यात येत आहे..

दरम्यान, नसरापूरमधील व्यापारी आणि ग्रामस्थांकडून राजगड पोलीस स्टेशन पुन्हा नसरापूर परिसरात सुरू करण्यात यावे, तसेच बाजारपेठेमध्ये रात्रीची गस्त वाढवून अशा टोळ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी प्रशासनाकडे करण्यात येत आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us